सातारा (Satara News) तालुक्यात भयंकल घटना घडली आहे. त्यामुळे दोन गावं शोकसागरात बुडाली आहेत. सातारा तालुक्यातील कारी गावात एका गर्भवती मातेने आपल्या दोन मुलींसह विहिरीत उडी मारली. यामध्ये आई व एका तीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. सुदैवाने एक मुलगी झुडपात अडकल्याने बचावली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवासाठी विशाल मोरे आणि श्रद्धा मोरे (27) हे पती पत्नी आपल्या दोन मुलांसह गावी आले होते. शनिवारी (6 सप्टेंबर 2025) मोरे कुटुंब मुंबईला परतणार होते. परंतु काल श्रद्धा मोरे यांनी स्पृहा मोरे (3) आणि त्रिशा मोरे (5) या दोघींसह विहिरीत उडी मारली. सुदैवाने त्रिशा मोरे ही मुलगी झुडपात अडकल्याने बचावली आहे. मात्र श्रद्धा मोरे आणि स्पृहा मोरे या तीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. या धक्कादायक घटनेमुळे कारी गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. सकाळने यासंदर्भात वृत्त दिले आहे.