शाहुपूरी पोलिसांनी घरफोडी प्रकरणी धडक कारवाई करत नवी मुंबईतील कोपरखैरणेमधून आरोपीला अटक केली आहे. तसेच त्याच्याकडून 9 लाख 20 हजार रुपये किंमतीचे 13.5 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. आरोपीला बेड्या ठोकल्या असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 13.5 तोळे सोने लंपास करुन पसार झालेल्या आरोपीची तक्रार 4 सप्टेंबर रोजी शाहुपूरी पोलिसांनी मिळाली होती. तक्रार मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जावून तक्रादाराकडून सविस्तर माहिती घेतली. तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या घरी संशयित नातेवाईक दोनवेळा आला होता. त्यानुसार पोलिसांनी मुंबईत जाऊन ऋषीकेश पांडुरंग देटे (29) याला कोपरखैरने सेक्टर 15 येथून ताब्यात घेतले आणि चौकशी केली. सुरुवातीला त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. परंतु नंतर त्याने चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी 9,20,000 रुपये किंमतीचे 13.5 तोळ्याचे दागिने जप्त केले आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी. अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले आणि पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी ढेरे, ढमाळ, गोवेकर पोलीस अंमलदार सुरेश घोडगे, मनोद मदने, निलेश काटकर, जोतीराम पवार, महेश बनकर, अभय साबळे, सचिन पवार, स्वप्निल सावंत, स्वप्निल पवार, सुमित मोरे आणि संग्राम फडतरे यांनी केली आहे.