साताऱ्यामध्ये (Satara News) एक दुर्मीळ घटना घडली असून एका महिलेने क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात एकाच वेळी चार बाळांना जन्म दिला आहे. विशेष म्हणजे या 28 वर्षीय महिलेची ही तिसरी प्रसूती असून पहिल्या प्रसूतीवेळी जुळ्या मुलांना आणि त्यानंतर एका मुलीला जन्म दिला होता. मात्र, या मातेने आता तीन मुलींना आणि एका मुलाला जन्म दिला आहे. ही अवघड शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडल्याबद्दल डॉक्टरांचं कौतुक केलं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील सासवड येथील काजल विकास खोक्रादिया (28) ही गर्भवती महिलेला शनिवारी (13 सप्टेंबर 2025) पोटात दुखत असल्यामुळे अर्जुन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉ. नितीन जाधव यांनी महिलेची तपासणी केली असता अधिक सुविधांच्या दृष्टीने सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. जेव्हा महिला रुग्णालयात दाखल झाली, तेव्हा तिच्या प्रसुती वेदना अत्यंत तीव्र होत्या. त्यामुळे डॉक्टरांनी तपासणी केली असता गर्भाशयात एकाच वेळी चार अपत्ये असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे डॉ. सदाशिव देसाई यांनी मातेची स्थिती नाजूक असल्याचे पाहून सिझर करण्याचा निर्णय घेतला आणि तातडीने शस्त्रक्रिया पार पाडली. यावेळी महिलेला प्रथम मुलगी (1100 ग्रॅम), दुसरा मुलगा (1200 ग्रॅम) आणि त्यानंतर 1300 ग्रॅम आणि 1600 ग्रॅम वजनाच्या दोन मुलींना जन्म दिला.
क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ञ डॉ. सदाशिव देसाई, डॉ. तुषार मसरान, भूलतज्ञ डॉ. नीलम कदम, डॉ. दीपाली राठोडे-पाटील, बालरोगतज्ञ व स्ताफ या सर्वांनी मिळून ही अवघड शस्त्रक्रीया यशस्वी पार पाडली आणि गर्भवती महिलेसह चार बाळांचे प्राण वाचवले. त्यामुळे डॉक्टरांचे सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे.