Songe Miravnuk Ozarde – गावकुसातील जिवंत परंपरा! बावधनचं थरारक बगाड आणि ओझर्डेचा रंगतदार सोंगे उत्सव

>>गणेश सुरेखा मारूती वाडकर

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बावधन बगाड यात्रा (Bavdhan Bagad Yatra) आणि ओझर्डे गावचा सोंगे (Songe Miravnuk Ozarde) उत्सव म्हणजे वाई तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेचा खजिनाच. शेकडो वर्षांची परंपरा असलेली ही बगाड यात्रा आजही लोकांना तितक्याच उत्साहाने आकर्षित करते. बावधनच्या बगाड यात्रेशी अगदीचा जवळचा संबंध असलेला ओझर्डेचा सोंगे उत्सव म्हणजे अद्भुत परंपरेचा अनुभव. या दोन्ही उत्सवांना हजारोंच्या संख्येने भाविक, ग्रामस्थ आणि पर्यटक हजेरी लावतात. यंदा आम्हीही हा योग साधला आणि ओझर्डेचा सोंगे उत्सव आणि बावधनच्या बगाड यात्रेचा थरार अगदी जवळून अनुभवला. या ब्लॉगमध्ये विशेष करून ओझर्डेच्या सोंगे उत्सवाचा इतिहास, परंपरा आणि बावधन बगाडाशी असलेली नाळ समजून घेणार आहोत. 

महाराष्ट्रातील पारंपरिक यात्रांमध्ये बावधन बगाड यात्रेला विशेष स्थान आहे. रंगपंचमीच्या दिवशी पहाटेच्या वेळी हा बगाड सोहळा पार पडतो. या दिवशी हजारो भाविक आणि पर्यटक बावधन येथे एकत्र येऊन याचा अनुभव घेतात. एका काळ होता जेव्हा वाहतूक आणि मनोरंजनाची साधने नव्हती, त्याच काळापासून ही परंपरा सुरू झालीये. बगाड यात्रा पाहण्यासाठी वाई तालुक्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यांमधून मोठ्या संख्येने लोक येत असतं. बैलगाडीतून प्रवास करत एक दिवस आधीच लोकं ओझर्डे गावात येऊन मुक्काम करत. ओझर्डे हे गाव या परंपरेत महत्त्वाचे ठरते, कारण बगाड यात्रेची सुरुवात ओझर्डे गावाला अगदी खेटून संथ वाहणाऱ्या कृष्णामाईच्या काठावरून होते. 

ओझर्डे गावचा सोंगे उत्सव

बगाड यात्रेसाठी येणाऱ्या पाहुण्यांचे मनोरंजन व्हावे आणि गावातील लोकांचा उत्साह वाढावा यासाठी ओझर्डे गावात सोंगे उत्सवाची परंपरा सुरू झाल्याचे सांगतिले जाते. साधारणपणे या काळात शेतातील सुगी जवळपास संपलेली असते. शेतकऱ्यांच्या घरात नवीन धान्य आलेले असते आणि मेहनतीनंतर मिळालेल्या आनंदाचे उत्सवात रूपांतर होते. 

सोंगे उत्सव नेमका कधी सुरू झाला याची अचूक नोंद नाही. आजच्या पिढीतील ज्येष्ठांनाही त्याची सुरुवात कधी झाली हे सांगता येत नाही. मात्र वर्षानुवर्षे चालत आलेली ही परंपरा आजही तितक्याच जोमाने साजरी केली जाते. सोंगे उत्सवाची मिरवणूक भल्या पहाटे चारच्या दरम्यान ओझर्डे गावच्या दोन आळ्या म्हणजेच माळ आळी आणि साळ आळी या दोघांमध्ये पार पडते. या दोन आळ्यांमधून शोभा यात्रा पद्मावती देवीच्या मंदिरामध्ये जाते. या मंदिर परिसरात साळ आळीची देवी आणि माळ आळीची देवी या दोन्ही देवींच्या भेटीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडतो. हा कार्यक्रमही पाहण्यासारखा असतो. 

पूर्वीची सोंगे आणि पारंपरिक साज

पूर्वी सोंगे काढण्याची पद्धत खूप वेगळी होती. बैलगाडीतून विविध सोंगे काढली जात. प्रकाशासाठी मशाली पेटवल्या जात आणि कंदिलांच्या उजेडात संपूर्ण मिरवणूक निघत असे. पारंपरिक ढोल-ताशे आणि लेझीम पथकांच्या तालावर सोंगांची शोभा आणखी वाढत असे.

त्या काळात सोंगांमध्ये ऐतिहासिक आणि पौराणिक व्यक्तिरेखा अधिक असत. राम, लक्ष्मण, सीता, श्रीकृष्ण, पांडव, श्रावणबाळ तसेच देवी-देवतांची सोंगे साकारली जात आणि लोक मोठ्या उत्साहाने ती पाहत असत. या सोंगे उत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये स्त्रियांचा प्रत्यक्ष सहभाग नसतो. म्हणजेच स्त्रियांची पात्र सुद्धा पुरुष कलाकारच भुषवतात. 

आधुनिक काळातील सोंगे उत्सव

काळ बदलत गेला तसे सोंगे उत्सवातही आधुनिकतेची भर पडली. परंपरा जपत त्यात नवे विषय आणि आधुनिक सादरीकरण आले. आज सोंगांमध्ये सैनिक, सामाजिक विषय, तसेच सध्याच्या चित्रपटांमधील पात्रेही पाहायला मिळतात. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, महात्मा ज्योतिबा फुले यांसारख्या महान व्यक्तिमत्त्वांची सोंगेही काढली जातात. तसेच बाळासाहेब ठाकरे यांसारख्या प्रभावी नेत्यांची रूपेही साकारली जातात. याशिवाय ग्रामस्वच्छता, हुंडाबळीविरोधी जनजागृती, साक्षरता अभियान, लेक वाचवा, लव जिहाद अशा सामाजिक आणि ज्वलंत विषयांवर आधारित देखावे सादर करून लोकांमध्ये जनजागृतीही केली जाते.

उत्सवाची वाढलेली भव्यता

आधुनिक काळात या उत्सवाची भव्यता आणखी वाढली आहे. प्रकाशयोजनेसाठी मोठमोठे जनरेटर, हॅलोजन दिवे, रंगीबेरंगी लाइट्सच्या माळा आणि फुलांची सजावट यांचा वापर केला जातो. कार्यक्रमात रंगत आणण्यासाठी तरुणांची आवडती डॉल्बी सिस्टीमही असते. आणि या डॉल्बीच्या तालावर तरुणाई बेभान होऊन थिरकताना पाहायला मिळते.

खरं तर सोंगे उत्सव तब्बल पाच दिवस चालतो. होळी पौर्णिमेच्या रात्रीपासून गावातील बाळगोपाळ सोंगे काढण्यास सुरुवात करतात आणि पुढील काही दिवस संपूर्ण गाव उत्सवाच्या आनंदात न्हाऊन निघते.

बावधन बगाड आणि ओझर्डे गावचा सोंगे उत्सव हा केवळ एक पारंपरिक कार्यक्रम नाही, तर ग्रामीण संस्कृती, सामाजिक संदेश आणि लोकांच्या एकोप्याचे जिवंत प्रतीक आहे. वर्षानुवर्षे चालत आलेली ही परंपरा आजही नव्या उत्साहाने पुढे चालत आहे आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाची ओळख जपते.

कधी योग आला तर आवर्जून या दोन्ही गावांच्या उत्सवात सहभागी व्हा….

error: Content is protected !!