RUBBER TEST CHAMPIONSHIP 2025 ला धुमधडाक्यात सुरुवात झाली आहे. पहिला सामना चंदन 11 रायगडविरुद्ध ताई पॅकर्स पालघर या संघांमध्ये खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्याच दिवशी पालघरच्या विनायक भोईरने विस्फोटक अंदाजात फलंदाजी करत शतक ठोकले आहे. गुरुवारी (11 सप्टेंबर 2025) पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत रायगडच्या संघाने 5 गड्यांच्या मोबदल्यात 118 धावा केल्या होत्या.
टेनिस क्रिकेटच्या बातम्यांसाठी आताच या (मराठी चौक विशेष) लिंकवर क्लिक करून आपले व्हॉट्सअॅप चॅनल फॉलो करा
प्रथम फलंदाजी करताना पालघरच्या संघाची सुरुवात थोडी निराशाजनक झाली. दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी परतल्यानंतर 19 वर 2 विकेट अशी पालघर संघाची अवस्था झाली होती. मात्र त्यानंतर विनायक भोईरने मैदानात येत आक्रमक अंदाजात फलंदाजीला सुरुवात केली आणि 41 चेंडूंमध्ये 7 चौकार आणि 1 षटकार ठोकत अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर त्याने आपल्या धारधार फलंदाजीच्या जोरावर 141.67 च्या स्ट्राईक रेटने चौफेर धावा कुटून काढल्या. 72 चेंडूंमध्ये 6 षटकार आणि 10 चौकारांच्या मदतीने त्याने आपलं शतक साजर केलं. याचसोबत अर्नाळ्याचा विनायक भोईर रबर टेस्ट चॅम्पियनशिप 2025 चा पहिला शतकवीर ठरला. त्याच्या व्यतिरिक्त इतर फलंदाजांना लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. पालघरने 42.2 षटकांमध्ये सर्वबाद 237 धावा केल्या. आव्हानाचा पाठलाग करताना रायगडच्या उस्मान पटेलने 46 चेंडूंमध्ये 5 षटकार ठोकत 36 धावांची तुफानी खेळी केली. त्याची विकेट पडल्यानंतर एका मागे एक विकेट पडत गेल्या. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा रायगडने 5 गड्यांच्या मोबदल्यात 118 धावा केल्या होत्या. आकाश तरेकर (नाबाद 38) आणि रवी सोलंकी (नाबाद 15) फलंदाजी करत होते.
टेनिस क्रिकेटच्या बातम्यांसाठी आताच या (मराठी चौक विशेष) लिंकवर क्लिक करून आपले व्हॉट्सअॅप चॅनल फॉलो करा