Wai News वाई तालुक्याचं रनमशीन म्हणून नावारुपाला आलेला धीरज ड्रायव्हर वाईकर याचा छकड्यावरून पडून अपघात झाला होता. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. पण अखेर त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. त्याच्या अचानक जाण्यामुळे तालुक्यातील बैलगाडा प्रेमींना मोठा धक्का बसला आहे. मनमिळाऊ स्वभावामुळे प्रचलित असणारा धीरज आता आपल्यात नसणार या भावनेने वाशिवली गावावर दु:खाचा डोंगर कोसळला असून पंचक्रोशीतून हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धीरज एकनाथ वाशिवले असे त्याचे पूर्ण नाव असून तो वाई तालुक्यातील वाशिवली गावचा सुपूत्र आहे. बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून त्याने भागात आपल्या नावाच डंका वाजवला होता. त्यामुळेच वाई तालुक्याचं रनमशीन आणि धीरज ड्रायव्हर वाईकर या नावांनी तो प्रचलित होता. बैलगाडा शर्यतीदरम्यान चालू शर्यतीत छकड्यावरुन पडल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न करत धीरजला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु अखेर त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. धीरजच्या अकाली मृत्यूमुळे वाशिवले कुटुंब पूर्ण हादरून गेलं आहे.