सातारा जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव 2025’ या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील अनेक गावांनी हिरहिरीने या उपक्रमात आपला सहभाग नोंदविला. अखेर 11 तालुक्यांमधील 12 गावं या उपक्रमात बाजी मारण्यात यशस्वी ठरली. या सर्व गावांचा सत्कार सोहळा पालकमंत्री शंभुराज देसाई आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते गुरुवारी (11 सप्टेंबर 2025) पार पडला. त्याचबरोबर जिल्हाधिकारी याशनी नागराजन यांनी मोलाच्या सहकार्याबद्दल सर्व गावांचे अभिनंदन केले.
वाई तालुक्यातून वयगांवने या उपक्रमात प्रथम क्रमांक पटकावला आहे. वयगांव गावाने गेल्या काही महिन्यांमध्ये ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत विविध उपक्रम राबवून पर्यावरणाला अनुकूल असे काही धाडसी निर्णय घेतले आहेत. या सर्व उपक्रमात सरपंच, उपसरपंचांसह ग्रामस्थांनी सुद्धा मोलाची कामगिरी बजावली आहे. दर रविवारी स्वच्छता मोहिम राबवणे असो अथवा गणपतींचे नदीमध्ये विसर्जन न करता विहिरीमध्ये विसर्जन करणे असो, ग्रामस्थांनी स्वत:हून या सर्व उपक्रमांमध्ये आपला सहभाग नोंदवला आहे. वयगांव गावच्या सरपंच अश्विनी एकनाथ सुतार आणि ग्रामपंचयात अधिकारी श्रीदेवी नुले यांनी पालकमंत्री शंभुराज देसाई आणि मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सन्मान स्वीकारला. याचबरोबर सातारा तालुक्यातून वर्ये, महाबळेश्वर तालुक्यातून गुरेघर, कोरेगाव तालुक्यातून काळोशी, खटाव तालुक्यातून पुसेगाव आणि सातेवाडी, माण तालुक्यातून मलवडी, फलटण तालुक्यातून सुरवडी, जावली तालुक्यातून रायगाव, खंडळा तालुक्यातून विंग, कराड तालुक्यातून रेठरे बु. आणि पाटण तालुक्यातून ढोरोशी या गावांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सर्व गावांचे सरपंच, उपसरंपचांसह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामपंचायत अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Wai News – ना डीजे, ना गुलाल, ना फटाके; वयगांवमध्ये पार पडला पर्यावरणपूरक विसर्जन सोहळा
यंदाचा गणेशोत्सव जिल्ह्यासाठी खऱ्या अर्थाने पर्यावरणपूरक ठरला आहे. जिल्ह्यात तब्बल 54 टन निर्माल्याचे संकलन करण्यात आले असून ते कंपोस्ट खतनिर्मितीसाठी पाठविण्यात आले आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील सार्वजनिक गणपती आणि 46,559 घरगुती गणपतींचे पर्यावरणपूरक विसर्जन करण्यात आले. तसेच 4,511 गणेश मूर्ती कुंभारांकडे दण्यात आल्या. 47,439 मूर्ती ग्रामपंचायतींकडे जमा करून विधिवत पुनर्विसर्जन करण्यात आल्या. अशाप्रकारे एकूण 62,137 मूर्तींचे पर्यावरणपूरक व्यवस्थापन यशस्वीरित्या पार पडले.