लाडक्या गणरायाचा विसर्जन सोहळा मंगळवारी (02 सप्टेंबर 2025) सातारा जिल्ह्यात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. भक्तीमय वातावरणात घरगुती गणपती बाप्पााला निरोप देण्यात आला. वाई (Wai News) तालुक्यात सुद्धा घरगुती गणपतींचे विसर्जन वाजत गाजत करण्यात आले. परंतु सध्या तालुक्यात चर्चा आहे ती वयगांव गावातील विसर्जन सोहळ्याची. कारण ध्वनीप्रदूषण, फटाक्यांचा धूर आणि गोंगाटाला वयगावकरांनी नकार दिला. फुलांची उधळणं आणि पारंपरिक वाद्यांच्या तालावर पहिल्यांदाच विहिरीमध्ये गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं. पर्यावरणाला अनुकूल असा हा विसर्जन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला.
“माझी वसुंधरा” अभियानांतर्गत सध्या गावामध्ये विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबवविले जात आहेत. या सर्व उपक्रमांमध्ये गावातील सर्व नागरिक हिरहिरीने सहभागी होत आहेत. गणपती उत्सवानिमित्त अनेक घरांमध्ये गणपती बाप्पासाठी पर्यावरणपूरक देखावे साकारण्यात आले होते. गावातील त्रिमूर्ती मित्रमंडळाने “माझी वसुंधरा”चा पर्यावरणपूरक देखावा साकारत विविध पर्यावरणपूरक संदेश दिले होते. तसेच द ग्रेट मराठा मंडळाने सुद्धा पेपरच्या मदतीने गणपतीसाठी देखावा साकारला होता. गणपती आणि गौरी विसर्जन सोहळ्यानिमित्त गावाच्या एकीचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. बैठक बसली आणि पर्यावरणाला हाणी न पोहचवणार विसर्जन सोहळा करण्यास गावातील सर्वच नागरिकांचे एकमत झाले. गावाच्याचं विहिरीमध्ये विसर्जन सोहळा पार पडला. विशेष म्हणजे पारंपरिक वाद्य हलगीच्या तालावर तरुणांनी जल्लोष केला आणि गुलालाच्या ऐवजी फुलांची उधळणं केली. त्याच बरोबर सर्व निर्माल्य जमा करण्यासाठी ग्रामस्थांची एक टीम तयार ठेवण्यात आली होती. निर्माल्य पाण्यामध्ये न टाकता त्याची योग्य ती व्यवस्था यावेळी करण्यात आली होती. सर्व महिलांनी झिम्मा फुगडीच्या ठेक्यावर गौराईला निरोप दिला. हा उपक्रम यशस्वी करण्यामध्ये सरपंच, उपसरपंच, ग्रामसेविका आणि पोलीस पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील सर्वच नागरिकांनी मोलाची कामगिरी बजावली. त्यामुळे या पर्यावरणपूरक अशा विसर्जन सोहळ्याची तालुक्यात चर्चा रंगताना पाहायला मिळत आहे.