Wai News – वयगांवने पटकावला माझी वसुंधरा अभियान – E pledge मध्ये राज्यात प्रथम क्रमांक; बलकवडी, दह्याट आणि गोळेगाव अव्वल दहामध्ये

विविध समाज उपयोगी उपक्रम आणि निसर्गाच्या संवर्धनासाठी गेल्या काही वर्षांमध्ये वाई तालुक्यातील वयगांव गावाने उल्लेखनीय प्रगती केली आहे. गावातील प्रत्येक नागरिक गावाच्या विकासासाठी आणि निसर्गाच्या संवर्धनासाठी जबाबदारीने काम करत आहेत. याचचं फळ म्हणजे वयगांवने माझी वसुंधरा अभियान – E pledge तिमाहीच्या पहिल्या टप्प्याच्या सर्वेक्षणात राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायत बलकवडी, ग्रामपंचायत दह्याट आणि ग्रामपंचाय गोळेगाव यांनी सुद्धा उल्लेखनीय कामगिरी करत अव्वल दहामध्ये आपली जागा पक्की केली आहे. बलकवडीने पाचवा, दह्याटने सातवा आणि गोळेगावने आठवा क्रमांक पटकावला आहे. त्याचबरोबर विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं मान्याचीवाडी हे गाव या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

काय आहे माझी वसुंधरा अभियान?

“माझी वसुंधरा” अभियान हे महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व हवामान बदल विभागाच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेले एक महत्वाचे अभियान आहे. याचा उद्देश पर्यावरण संरक्षण, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन आणि शाश्वत जीवनशैलीचा प्रसार करणे हा आहे.

E-Pledge म्हणजे काय?

E-Pledge (ई-प्रतिज्ञा) ही एक डिजिटल प्रतिज्ञा आहे, जिच्या माध्यमातून नागरिक, शाळा, महाविद्यालये, संस्था आणि कंपन्या पर्यावरण संरक्षणासाठी आपली बांधिलकी जाहीर करतात.

ई प्रतिज्ञा कशी द्यायची?

  • https://majhivasundhara.in या अधिकृत संकेतस्थळावर जा.
  • “Take E-Pledge” किंवा “ई-प्रतिज्ञा द्या” या पर्यायावर क्लिक करा.
  • आपली माहिती भरा (नाव, जिल्हा, वयोगट इ.)
  • पर्यावरण संरक्षणासाठी दिलेल्या प्रतिज्ञा वाचा आणि “मी मान्य करतो” वर क्लिक करा.
  • तुम्हाला प्रमाणपत्र देखील मिळते जे तुम्ही डाउनलोड किंवा शेअर करू शकता.

E-Pledge मध्ये काय प्रतिज्ञा असते?

  • मी पाणी, वीज, इंधन यांचा जपून वापर करेन.
  • मी झाडे लावीन आणि त्यांचे संरक्षण करेन.
  • प्लास्टिकचा वापर टाळेन.
  • सायकल वापरणे, चालणे किंवा सार्वजनिक वाहतूकचा वापर करेन.
  • इतरांनाही पर्यावरण संरक्षणासाठी प्रेरित करेन.

याचे उद्दीष्ट काय आहे?

राज्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत ही संकल्पना पोहोचवून पर्यावरणपूरक वागणुकीचा प्रसार करणे.