Wai News अतिदुर्मीळ असलेल्या खवले मांजराची तस्करी केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका व्यक्तीला अटक केली आहे. सापळा रचून सुरुर गावाच्या हद्दीतून संबंधित व्यक्तिला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, खवले मांजराची तस्करी करण्यासाठी एकजण येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना मिळाली होती. माहित मिळताच पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी तात्काळ एक पथक तयार केलं आणि पथक सुरुरला रवाना झालं. सुरुर गावाच्या हद्दीमध्ये एकजण संशयास्पतरीत्या पोलिसांना आढळून आला. त्यामुळे पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याच्याकडे असलेल्या पोत्यामध्ये खवले मांजर आढळून आलं. पोलिसांनी तात्काळ संशयीत आरोपी दीपक श्रीरंग मोहिते (वय 44, वहागांव) याला अटक केली आहे. वहागांवच्या डोंगरात खवले मांजर पकडल्याची आणि एका व्यक्तीला मांजर विकणार असल्याची कबुली त्याने दिली आहे. भुईंज पोलीस ठाण्यात त्याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच खवले मांजराची सुटका करण्यात आली असून त्याला त्याच्या अधिवासात सोडण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रोहित फार्णे, फौजदार विश्वास शिंगाडे, हवालदार अतिष घाडगे, अजित कर्णे, शिवाजी भिसे, स्वप्निल दौंड, केतन शिंदे, सचिन ससाणे, प्रवीण पवार, दलजित जगदाळे यांनी या कारवाईत भाग घेतला.