Wai News – पुन्हा जुळून आल्या रेशीम गाठी! आजी-आजोबा अडकले विवाह बंधनात, वयगाव ग्रामस्थांचा अनोखा उपक्रम

एक उपक्रमशील गाव म्हणून वाई (Wai News) तालुक्यातील वयगांव गावाने तालुक्यासह जिल्ह्यात आपल्या नावाचा डंका वाजवला आहे. मुख्यमंत्री पंचायतराज अभियानांतर्गत गावामध्ये विविध सामाजिक एकोपा वाढवणारे उपक्रम राबवले जात आहेत. असाच एक उपक्रम पुन्हा एकदा गावाने राबवला असून याची सध्या तालुक्यात जोरदार चर्चा होत आहे.

सध्या विवाह सोहळ्यांची लगबग सुरू आहे. परंतू सध्या तरुण-तरुणींचे विवाह फार काळ टिकत नसल्याच्या घटना घडत आहे. नात्यातला गोडवा आणि एकमेकांना कोणत्याही परिस्थितीत खंबीर साथ देण्याची भावना आपले आई-वडील आणि आजी-आजोबांच्या पिढीने जपली. मात्र, आताच्या पिढीला या सर्व गोष्टींचा सामना करत असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे घटस्फोटांचे प्रमाण वाढले आहे. या सर्व गोष्टींना डोळ्यासमोर ठेवत तरुणांचे डोळे उघडणारा आदर्श विवाह सोहळा वयगांव गावातील दत्त मंदिरामध्ये पार पाडला. सामाजिक कार्यकर्त्या रुपाली परिट यांच्या संकल्पनेतून हा सामाजिक उपक्रम यशस्वीरित्या राबवण्यात आला. या उपक्रमाला सरपंच अश्विनी सुतार, उपसरपंच प्रशांत वाडकर, ग्रामपंचायत अधिकारी श्रीदेवी नुले आणि ग्रामपंचायत सदस्यांचा विशेष सहभाग लाभला.

फोटो क्रेडिट – सरपंच अश्विनी सुतार

श्री दत्त जयंतीच्या मंगल दिनी हा अनोखा विवाह सोहळा गुरदत्तांच्या आशीर्वादाने पार पडला. वयाची साठी ओलांडलेल्या गावातील निवडक ज्येष्ठ नागरिकांना पुन्हा एकदा विवाहबंधनाचा तोच अनुभूतीमय क्षण देऊन पारंपरिक पद्धतीने ‘शुभमंगल सावधान’ म्हणत त्यांच्या वैवाहिक गाठी अधिक दृढ करण्यात आल्या. या उपक्रमात विठ्ठल कोंडीबा वाडकर – कमल विठ्ठल वाडकर, शंकर भैरू वाडकर – वेणाबाई शंकर वाडकर, आनंदा सत्तू वाडकर – बनाबाई आनंदा वाडकर, रामचंद्र महादेव वाडकर – भागाबाई रामचंद्र वाडकर, नामदेव कृष्णा वाडकर – सुमल नामदेव वाडकर या ज्येष्ठ दांपत्यांचा पुनर्विवाह सोहळा थाटात पार पडला.

अभियानाच्या काळात राबवलेल्या या उपक्रमाने गावातच नव्हे तर तालुक्यात चांगलीच चर्चा रंगवली आहे. ज्येष्ठ दांपत्यांचा सन्मान, कौटुंबिक बंध अधिक दृढ करण्याचा संदेश आणि पुढील पिढींना सामाजिक एकतेचे महत्त्व समजावणारा हा उपक्रम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

error: Content is protected !!