Wai – श्रावण महिना आणि निसर्ग सौंदर्याने उजळून निघालेला वाई तालुक्याचा पश्चिम भाग

श्रावण महिना सुरू झाला की, सह्याद्रीने जणू हिराव शालू पांघरून घेतल्याचा भास होतो. पर्यटकांसाठी नेहमची आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या Wai तालुक्याच्या पश्चिम भागाला निसर्गाने नटलेल्या देवघराचे रूप येते. धुक्यात हरवलेली डोंगररांग, कमळगड किल्ला, धोम आणि बलकवडी धरणाचा विस्तीर्ण जलाशय, खळखळ वाहणारे लहान-मोठे झरे हे दृश्य थकलेल्या मनाला प्रफुल्लित करणार असतं. त्यामुळे आपसूक पर्यटकांची पावलं महाबळेश्वर, पाचगणीसह वाईच्या पश्चिम भागाकडे वळतात.  

(सर्व फोटो – अनिकेत वाडकर)

वाई तालुक्याच्या पश्चिम भागात आणि अगदीच केट्सपॉईंटच्या पायथ्याला असणाऱ्या वयगांव, दह्याट, बलकवडी, गोळेवाडी, उळूंब, जोर या गावांच्या आजूबाजूच्या परिसराचं सौंदर्य वयगांवचे सुपूत्र अनिकेत वाडकर यांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपलं आहे. 

श्रावणात पडणारा मधूनमधून हलकासा सरींसरींचा पाऊस, वाऱ्यावर डुलणारी भातशेती, आणि आभाळातून बरसणारे शुभ्र जलदाणे हे सारं काही निसर्गप्रेमींना आणि छायाचित्रकारांना मोहवून टाकते.

या भागात सध्या भात लावणी जोरात सुरू असून शेतकरी आणि महिला शेतमजूर श्रावणातल्या पावसासोबत मिळून हिरवळीत रमताना दिसतात. श्रावणातील ही निसर्गमय कामगिरी, कष्ट आणि उत्साहाचा सुंदर संगम जणू एका कलाकृतीसारखा वाटतो.

याच काळात डोंगरांच्या कुशीतून वाहणारे लहान झरे, रस्त्यांच्या कडेला फुलणारी वनफुले, आणि ढगांच्या सावलीतून डोकावणारे सूर्यकिरण, हे सारं काही वाई तालुक्याच्या सौंदर्यात भर टाकतात. श्रावणात याच भागात फिरायला गेल्यास, आपण निसर्गाच्या कुशीत हरवून जातो, आणि मन शांततेच्या, ताजेपणाच्या एका अनोख्या अवस्थेत पोहोचतं.

वाई तालुक्याचा पश्चिम भागावर श्रावण महिन्यात निसर्गाने सुंदरतेचा केवळ साज चढवलेला नसतो, तर ती एक सजीव कविता वाटते ज्यात हिरवळ, पाऊस, माणसं आणि माती यांचं सुंदर नातं दिसून येतं.