लेख – ब्रेस्ट मिल्क दान आणि मातृत्व, समज-गैरसमज

>> गणेश सुरेखा मारूती वाडकर

भारताची स्टार बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा हीने मैदानात नव्हे तर आता मैदानाबाहेर सर्वांनीच कौतुक करावं अशी कामगिरी केली आहे. तिने एक उपक्रम सुरू केला असून या उपक्रमामुळे अनेक निष्पाप जीवांना नवसंजीवनी मिळाली आहे. या उपक्रमासाठी ज्वाला गुट्टाने मागील चार महिन्यांपासून अनेकवळा सरकारी रुग्णालयाच्या चकरा मारल्या आणि जवळपास 30 लिटर ब्रेस्ट मिल्क दान (Breast Milk Donation) केलं आहे. त्यामुळे तिच्या या उपक्रमाच सर्व स्तरातून तोंड भरून कौतुक केलं जात आहे. परंतु आजही भारतात ‘ब्रेस्ट मिल्क दान’ संदर्भात अनेक गैरसमज आहेत. याच गैरसमजुतेमुळे महिला या उपक्रमात सहभागी होताना कचरतात. परिणामी अनेक नवजात मुलं आईच्या दुधाला मुकतात. UNICEF, च्या मते दरवर्षी सुमारे 7.6 दशलक्ष बाळांना आईच्या दुधापासून वंचित राहावे लागते. 

मुलांच्या सुखासाठी जन्मापासून ते मुलं मोठं होईपर्यंत शक्य अशक्य अशा सर्व गोष्टी करण्याची धमक आईमध्ये असते. प्रसंग कितीही बाका असला तरी आई मुलांच्या सुखासाठी कोणत्याही आव्हानचा सामना करण्याची तयारी ठेवते. आपल्या बाळासाठी आई जे काही करू शकते त्यामध्ये स्तनपान हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. कारण हे दूध नैसर्गिक, पोषणमूल्यांनी युक्त आणि बाळाच्या आरोग्यासाठी अत्यावश्यक असतं. परंतु अनेक वेळा आरोग्याच्या समस्येमुळे किंवा अन्य काही कारणांमुळे आई नवजात बाळाला दूध देण्यास सक्षम नसते किंवा दूध देता येत नाही. अशा परिस्थितीत Breast Milk Donation ही संकल्पना नवजात बालकांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरते. भारतामध्ये ही संकल्पना अजून म्हणावी तशी समाजात रुळलेली नाही. परंतु परदेशात अनेक स्त्रिया मोठ्या प्रमाणात ब्रेस्ट मिल्क डोनेट करतात. परंतु याबद्दल सुद्धा अनेक गैरसमज समाजात पसरले आहेत. हेच गैरसमज दुर करण्याचा प्रयत्न या विशेष लेखामध्ये आपण केला आहे. टप्याटप्याने सर्व गोष्टी आपण समजून घेऊ. 

ब्रेस्ट मिल्क दान म्हणजे काय? What Is Breast Milk Donation

ब्रेस्ट मिल्क दान म्हणजे काय तर, मातांनी आपल्या बाळासाठी तयार झालेले अतिरिक्त दूध इतर नवजात बाळांसाठी उपलब्ध करून देणे. आईचं दूध हे बाळाच्या सुदृढतेसाठी अत्यंत गरजेचं असतं. बऱ्याच वेळा काही बाळांचा जन्म हा वेळेपूर्वीच होतो, बाळाचं वजन कमी भरतं किंवा नवजात बाळाच्या आईला दूध देता येत नाही, अशा परिस्थितीत डोनेट केलेलं ब्रेस्ट मिल्क हे नवजात बाळांसाठी आमृतासमान ठरतं. सोशल मीडिया आणि इंटरनेमुळे गेल्या काही वर्षांपासून ब्रेस्ट मिल्क दान करण्यासंदर्भात जनजागृती केली जात आहे. भारतासह जगभरातील अनेक रुग्णालयांमध्ये मिल्क बँक (Human Milk Bank) सुरू करण्यात आलेल्या आहेत. या ठिकाणी मातांनी दान केले दूध तपासून सुरक्षित केलं जात आणि बाळांना दिलं जातं.  

आईच्या दुधात कोणकोणत्या घटकांचा समावेश असतो?

नऊ महिने बाळ आईच्या पोटात वाढतं त्यामुळे आईचं आणि बाळाचं नातं हे फक्त जैविक राहत नाही, तर ते भावनिक, मानसिक आणि सामाजिक असतं. बाळासाठी आईचे दूध हे फक्त पोषणापूर्त मर्यादीत राहत नाही. आईच्या दुधामध्ये बाळाच्या रोगप्रतिकारक शक्तीचा पाया दडलेला असतो. त्यामुळेच नवजात बाळांसाठी आईचे दूध हे सर्वात जास्त महत्त्वाच असतं. त्यामुळे जेव्हा एक आई दुसऱ्या एखाद्या बाळासाठी आपलं दूध दान करते. तेव्हा ती माऊली केवळ त्या बाळाचे प्राणच वाचवत नाही, तर त्या बाळाला जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या आणि रोगप्रतिकारक शक्तीशी लढायला बळ देत असते. त्यामुळे हे दान खूप गरजेच आणि तितकंच महत्त्वाच आहे. 

आईच्या दुधात प्रोटीन, फॅट्स, जीवनसत्वे आणि खनिजे असतात. इम्युनोग्लोब्युलिन्स हा रोगप्रतिकारक घटक आईच्या दुधात असतो, त्याचबरोबर बाळाच्या वाढीसाठी आवश्यक असणारे एन्झाइम्स व मानिसक शांतता आणि सुरक्षिततेची भावना निर्माण करणारे घटक सुद्धा मुबलक प्रमाणात असतात. 

ब्रेस्ट मिल्क दान कोण करू शकते?

ब्रेस्ट मिल्क दान करण्यासाठी सर्वात महत्त्वाची अट म्हणजे माता ही निरोगी असावी. निरोगी मातेच्या दुधात नवजात बाळासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व घटकांचा समावेश असतो. तसेच ज्या मातांना आपल्या बाळाला दूध पाजताना कोणतीही अडचण येत नाही, अशा माता दूध दान करू शकतात. डॉक्टरांचा सल्ला घेऊनच दूध दान करता येऊ शकतं. या सर्व प्रक्रियेसाठी डॉक्टरांकडे सर्व प्रथम तपासणी करावी लागते आणि त्यानंतर डॉक्टर दूध देण्यास सक्षम असलेल्या मातांना प्रमाणपत्र देतात आणि त्यानंतर संबंधित माता दूध दान करू शकते. 

ब्रेस्ट मिल्क दान करण्याची प्रक्रिया नेकमी कशी आहे?

ब्रेस्ट मिल्क दान करण्यासाठी सर्वप्रथम संबंधित मातेची नोंदणी केली जाते आणि त्यानंतर डॉक्टरांच्या माध्यमातून तपासणी केली जाते. या तपासणीमध्ये प्रामुख्याने रक्त तपासणी, औषधांचा वापर व कोणता संसर्ग आहे का, या सर्व गोष्टींचा तपासल्या जातात. 

नोंदणी आणि तपासणी झाल्यानंतर स्तनपान करणाऱ्या मातेला दूध दान करण्याबाबत मार्गदर्शन दिले जाते. 

जेव्हा दूध संकलनाची वेळ येते तेव्हा संकलित दूध थंड तापमानात साठवले जाते. त्यानंतर त्याची गुणवत्ता तपासून त्यावर निर्जुंतकीकरण प्रक्रिया केली जाते. 

निर्जुंतकीरकरणाची प्रक्रिया पार पडल्यानंतर योग्य तपासणी करून नवजात बाळांना दूध उपलब्ध करून दिले जाते. 

ब्रेस्ट मिल्क दानाचे आई, बाळ आणि समाजासाठी काय फायदे आहेत?

ब्रेस्ट मिल्क दान केल्यामुळे मातेच्या दूधाअभावी असणाऱ्या नवजात बाळांचे प्राण वाचण्याची शक्यता कैकपटीने वाढते. ज्या बाळांचा जन्म वेळेपूर्वी झालेला आहे, अशा बाळांच्या आरोग्यामध्ये चांगली सुधारणा होते. आईच्या दुधात इम्युनोग्लोब्युलिन्स हा रोगप्रतिकारक घटक असतो, यामुळे रोगांपासून बाळांना संरक्षण मिळते. थोडक्यात काय तर आईच्या दुधाला मुकलेल्या बाळांची वाढ आणि विकास हा वेगाने होतो.  

दूध दान केल्याचा जसा बाळांना फायदा होतो, तसाच फायदा दूध दान करणाऱ्या मातेला सुद्धा होतो. दूध दान केल्यामुळे माता एकप्रकारे आपल्या मातृत्वाचा विस्तार इतरापर्यंत करत असते. त्यामुळे मातेच्या मनात सुद्धा एक समाधानाची भावना निर्माण होते. या समाधानामुळे थकवा जाणवत नाही आणि मन सुद्धा प्रसन्न राहतं. त्यामुळे स्तनपान करताना होणारा ताण सुद्धा आपोआप कमी होतो. तसेच स्तनाच्या काही समस्या (जसे की दुधाचा साठा) टाळण्यास मदत होते. 

एका मातेच्या पुढाकारामुळे अनेक बाळांचे प्राण वाचतात आणि यामुळे नवजात बाळांचा मृत्यूदर कमी होतो. मातेच्या दुधाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या बाळांसाठी दान केलेलं दूध हे संजीवनीसमान असतं. एका मातेने पुढाकार घेतला तर, त्याची सकारात्मक चर्चा होते आणि त्यामुळे इतर स्त्रिया सुद्धा दूध दान करण्यासाठी पुढे सरसावतात.  

ब्रेस्ट मिल्क दानाबाबत असलेले काही गैरसमज

  1. “हे फक्त आर्थिक फायद्यासाठी असते” – चुकीचे; आईने केलेलं दान हे पूर्णतः निःस्वार्थ असतं.
  2. “दान केलेले दूध असुरक्षित असते” – योग्य तपासणी आणि प्रक्रिया केल्यास ते पूर्णतः सुरक्षित असतं.
  3. “हे फक्त मोठ्या शहरांसाठी आहे” – आता जिल्हा व ग्रामीण भागातही मिल्क बँक सुरू होत आहेत.
  4. “दान केल्यास स्वतःच्या बाळासाठी दूध कमी पडते” – योग्य आहार, विश्रांती आणि वैद्यकीय मार्गदर्शनाने हे टाळता येते.

भारतात आणि महाराष्ट्रात काय स्थिती आहे?

भारतामध्ये ह्युमन मिल्क बँक सुरू करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. काही मोठ्या हॉस्पिटल्समध्ये यशस्वीरित्या ही योजना राबवली जात आहे. महाराष्ट्रातही मुंबई, पुणे यांसारख्या शहरांमध्ये मिल्क बँक कार्यरत आहेत आणि आता जिल्ह्यांमध्येही ही सेवा पोहोचत आहे. आरोग्य विभाग आणि स्वयंसेवी संस्था यामुळे मदतीसाठी पुढे येत आहेत. 

ब्रेस्ट मिल्क दानाने मातृत्वाची संकल्पना अधिक व्यापक होते. एका आईचे ममत्व दुसऱ्या बाळाच्या जीवनात आशेचा किरण बनते. जेव्हा एखादी माता आपल्या दुधाचा अंश दुसऱ्या बाळासाठी दान करते, तेव्हा ती मातृत्वाला सेवा, सहानुभूती आणि सामाजिक जबाबदारीचा अर्थ देते. आजच्या आधुनिक काळात जिथे जीवनशैली बदलत आहे, कामाचा तान वाढला आहे, अशा परिस्थितीत अनेक मातांना स्तनपान करताना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो. तिथे ब्रेस्ट मिल्क दान ही एक मजबूत सामाजिक आधारव्यवस्था ठरू शकते.

ब्रेस्ट मिल्क दान ही फक्त वैद्यकीय प्रक्रिया नाही, तर ती मातृत्वाचा साक्षात्कार आहे. ती स्त्रीच्या शक्तीला, तिच्या सहृदयतेला आणि समाजासाठी योगदान देण्याच्या इच्छेला नवा अर्थ देते. प्रत्येक बाळाला आरोग्यदायी जीवन मिळावे, प्रत्येक मातेला आधार मिळावा आणि मातृत्वाचे नाते केवळ जैविक न राहता सामाजिक आणि मानवी सहकार्याच्या रूपात फुलावे यासाठी ब्रेस्ट मिल्क दान ही अतिशय महत्त्वाची पायरी आहे.

त्यामुळे प्रत्येक मातेला या मोहिमेत सहभागी होण्यासाठी प्रेरित करणे हे समाजाचे आणि आरोग्यव्यवस्थेचे कर्तव्य आहे.