राज्यामध्ये खोटी कागदपत्रे काढण्यासाठी विविध क्लुप्त्यांचा वापर केला जातो. प्रामुख्याने फक्त आधार कार्डच्या मदतीने अनेक खोटी कागदपत्रे काढली जात असल्याचं तपासात उघड झालं आहे. त्यामुळे महसूल विभाग अॅक्शन मोडमध्ये आला असून खोट्या कागदपत्रांच्या आधारे काढण्यात आलेले जन्म-मृत्यूचे दाखले (Birth and death certificate ) रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामध्ये फक्त आधार कार्ड हा पुरावा ग्राह्य धरून काढण्यात आलेले संशयास्पद जन्म-मृत्यू दाखल्यांचा सुद्धा समावेश आहे. महसूल विभागाने याबाबत परिपत्रक जाहीर केले असून 16 मुद्द्यांवर तपासणीचे आदेश दिले आहेत.
नेमकं काराण काय आहे?
गेल्या काही वर्षांमध्ये केवळ आधार कार्डच्या जोरावर अनेकांनी जन्म-मृत्यू दाखले काढले आहेत. अशा सर्वांना याचा फटका बसणार आहे. कारण जन्म-मृत्यू दाखल्यासाठी फक्त आधार कार्डला पुरावा म्हणून मान्यता नाही. आधार कार्ड हे केवळ ओळखपत्र म्हणून काम करते. त्यामुळे अशा नोंदी ज्यांच्या आढळून येतील. त्यांचे जम्म-मृत्यू दाखले रद्द करण्यात येणार आहेत. जन्म-मृत्यू नोंदींची तपासणी करताना अर्जाची तारीख, नोंदणी प्रकार, रुग्णालयातील रेकॉर्ड, स्थानिक पुरावे, पालकांची माहिती, पूर्वीच्या नोंदींची सुसंगती, आदी बाबींचा बारकाईने अभ्यास केला जाणार आहे, कारण तसे आदेशच देण्यात आले आहेत. मूळ कागदपत्रे तपासण्यावर अधिक भर दिला जाणार आहे. बोगस दाखल्यांना आळा घालण्यासाठी ही सर्व प्रक्रिया पार पडणार आहे. विविध निकषांवर संशयास्पद दाखल्यांची छाननी केली जाणार आहे.
ज्यांचे जन्म-मृत्यू दाखले बोगस आढळून येतील अशे दाखले रद्द करून परत घेतले जाणार आहेत. तसेच त्या दाखल्यांचा पुढील कोणत्याही सरकारी सेवेत किंवा शासकीय लाभ घेण्यासाठी वापर करता येणार नाही. तशा प्रकारची नोटीस संबंधित व्यक्तीला देण्यात येणार आहे.