लेख – एक गाव – एक संघ! अंतिम फेऱ्यांचा बादशाह वयगांव; सलग 8 स्पर्धांमध्ये विजयी गुलाल

>>गणेश सुरेखा मारूती वाडकर<<

“आमची ऐकी हेच आमचं बळ” ही केवळ घोषणा नाही, तर प्रत्येक वयगांवकराच्या मनात बसलेली भावना आहे. मुंबई-पुणे सारख्या शहरांमध्ये राहून, वेगवेगळ्या भागात नोकरी, व्यवसाय, शिक्षण करत असूनही जेव्हा क्रिकेटचा विषय येतो, तेव्हा सगळे मतभेद बाजूला ठेवून मुलं एकत्र येतात आणि वयगांवचा झेंडा उंचावण्यासाठी जिद्दीने मैदानात उतरतात. या एकीमुळेच आज वयगांव संघ यशाच्या शिखरावर पोहोचला आहे. 8 स्पर्धांच्या अंतिम फेरीत धडक मारली आणि आठही वेळा अंतिम विजेतेपद पटकावण्याची किमया संघाने साधली आहे. 

वयगांव संघाने सलग आठ स्पर्धांच्या अंतिम फेरीत विजय मिळवत एक वेगळीच परंपरा निर्माण केली आहे. सातत्य, मेहनत आणि जिद्दीच्या बळावर त्यांनी प्रतिस्पर्धी संघांवर आपला दबदबा निर्माण केला आहे. प्रत्येक स्पर्धेत अंतिम फेरी गाठणे हेच मोठे यश असते, पण वयगांवने त्यापुढे जाऊन विजेतेपद आपल्या नावावर कोरले. नवी मुंबईसारख्या शहरामध्ये विविध स्पर्धांमध्ये खेळताना वयगांवचा खेळ गेल्या काही वर्षांमध्ये चांगला बहरला आहे. या बहरलेल्या खेळाचं बक्षीस म्हणजे सलग 8 स्पर्धांमध्ये अंतिम फेरीत धडक मारल्यानंतर मिळवलेला विजय होय . 

या सुवर्ण यशामध्ये खालील मानाच्या स्पर्धांचा समावेश आहे –



GCC गोळेवाडी (2024), बावऱ्या फॅन्स क्लब जोर (2025), दोस्ती चषक वाई प. अंतर्गत (2025), जय हनुमान धाराबे (भोर) (2025), JCC दह्याट (2025), आदर्श विकास मंडळ नांदगने (2025), KCC धावली (2025), आणि जन्नी कुंभळजाई चषक (2026). प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे आव्हान, वेगवेगळे प्रतिस्पर्धी; पण निकाल मात्र एकच – विजेता वयगांव! 

या प्रवासातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गावाची एकी. गावात तीन मंडळं असली तरी स्पर्धेच्या वेळी कुठेही गट-तट दिसत नाहीत. सर्व खेळाडू, मार्गदर्शक, ज्येष्ठ मंडळी आणि चाहते एकत्र येऊन संघाला पाठिंबा देतात. कोणाचं वैयक्तिक नाव मोठं व्हावं यापेक्षा गावाचं नाव मोठं व्हावं ही भावना प्रत्येकाच्या मनात असते. वयगांव संघाच्या यशामागे खेळाडूंचा नियमित सराव, वरिष्ठांचे मार्गदर्शन, तरुणांची मेहनत आणि चाहत्यांचा उत्साह हे मोठे घटक आहेत. अंतिम सामन्यांमध्ये दडपण असतानाही खेळाडू शांतपणे, नियोजनबद्ध खेळ करतात. त्यामुळेच कठीण प्रसंगातही ते विजय खेचून आणतात.

या विजयी मालिकेमुळे लहान मुलांनाही प्रेरणा मिळत आहे. गावातील नव्या पिढीसमोर एक आदर्श उभा राहिला आहे – मेहनत केली, एकी ठेवली तर अशक्य काहीच नाही. वयगांवच्या प्रत्येक विजयात गावकऱ्यांचा आशीर्वाद आणि प्रेम सामावलेले आहे. आज प्रतिस्पर्धी संघांसाठी वयगांव म्हणजे मजबूत आव्हान बनले आहे. मैदानावर उतरताना त्यांना माहीत असतं – समोर आहे एकजुटीने खेळणारा, शेवटपर्यंत लढणारा संघ.

विजयाची ही परंपरा पुढेही अशीच कायम राहो, नव्या स्पर्धांमध्येही वयगांवचा झेंडा दिमाखात फडकत राहो आणि “एक गाव – एक संघ” हा आदर्श सर्वांसाठी प्रेरणादायी ठरो, अशीच सर्वांची अपेक्षा आहे.

error: Content is protected !!