Bhushangad Fort म्हणजे खटाव तालुक्यातील निसर्ग सौंदर्याने नटलेला गड. ग्रामस्थांच्या पुढाकाराने गडाचा संपूर्ण परिसर हिरवागार झाला आहे. या भूषणगडाचे वैशिष्ट्य म्हणजे खटाव तालुक्यात दुरवर पसरलेल्या मैदानी प्रदेशात भूषणगडाचा एकमेव डोंगर अगदी उठून दिसतो. गावकाऱ्यांनी पुढाकार घेत गडावर जाण्यासाठी पायऱ्या बांधल्या आहेत. त्याच गडावर आणि गडाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षरोपण केले आहे. त्यामुळे भूषणगड खटाव तालुक्याचे भूषण आहे असं म्हटल तर चुकीचे ठरणार नाही.
सातारा जिल्हा म्हटल की, हिरवागार शालू पसरलेला सह्याद्री आपसूक डोळ्या समोर येतो. खळखळून वाहणार्या नद्या, पांचगणी-महाबळेश्वर सारखी थंड हवेची ठिकाणं याच सातारा जिल्ह्यामध्ये आहेत. एकीकडे वाई, खंडाळा, पाटण आणि कराड या तालुक्यांमध्ये निसर्गाची मुक्त उधळणं झालेली पहायला मिळते. तर, दुसरीकडे माण, खटाव, फलटण आणि कोरेगाव या तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती पहायला मिळते. पावसाच्या कमतरतेमुळे मोठ्या प्रमाणात या भागातील डोंगर ओस पडलेले आहेत. अशा परिस्थितीतही काही गावांनी एकत्र येत श्रमदानाच्या माध्यमातून डोंगर हिरवागार करण्याचा विडा उचलला. गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी पुढाकार घेतला.
भूषणगड आणि इतिहास
खटाव तालुक्याच भूषण म्हणून भूषणगड तालुक्यासह महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. या गडाचा इतिहास फरा जूना असून देवगिरीचा सम्राट राजा सिंघण दूसरा याने 1210-1247 या कालखंडामध्ये भूषणगड बांधून घेतल्याची नोंद आढळून येते. त्यानंतर जवळपास इ.स 1676 पर्यत भूषणगड परकियांच्या ताब्यात होता. मात्र, कोणत्या घराण्यांनी किंवा सत्तांनी गडावर राज्य केले याची ठोस नोंद आढळून येत नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्य विस्तार करण्याची मोहिम हाती घेतली होती. त्याच वेळी इ.स 1676 मध्ये शिवरायांनी आदिलशाहीच्या ताब्यातून भूषणगड जिंकून घेतला व गडावर स्वराज्याचा भगवा ध्वज फडकवला.
त्यानंतर गड बराच काळ स्वराज्यात होता. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर औरंगजेबाने भूषणगड जिंकून घेतला होता. त्यानंतर औरंगजेबाने गडाचे नाव ‘इस्लामतारा’ असे ठेवले होते. त्यानंतरच्या काळात पंतप्रतिनिधींची गडावर सत्ता होती. जवळपास इ.स 1818 पर्यंत गड पंतप्रतिनिधींच्या ताब्यात होता. इंग्रजांनी 1818 साली स्वराज्यातले अनेक गड आपल्या ताब्यात घेतले. त्याच काळात भूषणगड सुद्धा त्यांनी जिंकून आपल्या ताब्यात घेतला.
भूषणगडावर पाहण्यासारखे काय आहे
ग्रामसथ्थांच्या पुढाकारामुळे भूषणगड सुस्थितीत आहे. गडावर जाणाऱ्या लक्ष वेधून घेणाऱ्या आहेत. तसेच ग्रामस्थांनी गडावर आणि गडाच्या आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे लावली आहेत. त्यामुळे गडाच्या सौंदर्यात चांगली भर पडली आहे. भूषणगडावर जाताना सिमेंटमध्ये बांधलेली कमान लक्षवेधक आहे. त्याच ठिकाणी एक मोठी घंटी बांधलेली पहायला मिळते. याच वाटेने आपण गडावर जातो. गडावर जाणारी पायऱ्यांची वाट अगदी सुस्थितीत आहे.
Rangana Fort – अल्लाहच्या कृपेने रांगणा ताब्यात आला, अस का म्हणाला महम्मद गावान? वाचा सविस्तर…
छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांच्या दूरदृष्टीने स्वराज्यातील प्रत्येक गडाची रचना थोड्याफार प्रमाणात वेगवेगळ्या स्वरुपाची केली आहे. शत्रूंपासून स्वराज्य सुरक्षित रहावं आणि स्वराज्य सुरक्षित करण्यासाठी गड सुरक्षित असावे हा त्यामागे शिवरायांचा मुख्य हेतू होता. शत्रूला गडावर चढता येऊ नये आणि चढून आलाच तर आपलं सैन्य शत्रूवर कसं वरचढ ठरेल. त्यासाठी सर्व गड त्याच पद्धतीने बांधण्यात आले आहेत. भूषणगडाची रचना सुद्धा तशीच आहे. भूषणगडाचे प्रवेशद्वार पूर्वाभिमुख असून त्याची बांधणी ‘गोमुखी’ पद्धतीने करण्यात आली आहे. प्रवेशद्वाराच्या आत पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. या गडाचे वैशिष्ट्य म्हणजे गडाची तटबंधी आजही सुस्थितीत आहे.
गडावरील बुरुजावर तोफेसाठी जंग्या आहेत. त्याच बरोबर गडावर एक भव्य बांधीव कुंड असून या कुंडाजवळ महादेवाचे छोटे मंदिर आहे. या मंदिरामध्ये महादेवाचे दर्शन घेतल्यानंतर त्याच मार्गे पुढे जावे. थोडं पुढे चालत आल्या नंतर तुम्हाला गडाची अधिष्ठात्री हरणाई देवीचे मंदिर आहे. मंदिराचा ग्रामस्थांनी जिर्णोद्धार केला आहे. मंदिरामध्ये हरणाई देवीची, सिद्धनाथाची मुर्ती आहे. या व्यतिरिक्त गडावर एक साचपाण्याचा तलाव सुद्धा पाहण्यासारखा आहे. भूषणगड पूर्ण फिरण्यासास साधारण एक ते दीड तास लागू शकतो.
गडावर जायचे कसे
भूषणगडाच्या पायथ्याला असणारे भूषणगड हे गाव तुम्हाला गाठावे लागणार आहे. त्यासाठी तुम्हाा फलटणमधून भूषणगड मार्गे जाणारी गाडी पकडावी लागणार आहे. तसेच पुण्यावरून सातारा मार्गे भूषणगडला जाणारी गाडी तुम्हाला पकडावी लागेल. गडावर जाण्यासाठी भूषणगडे हे एकच पायथ्याचे गाव आहे. भूषणवाडीतून गडावर जाण्यासाठी साधारण अर्धा तास लागतो.
गडावर जेवणाची राहण्याची सोय आहे का
गडाची भूषणगड गावातील ग्रामस्थांनी चांगल्या पद्धतीने काळजी घेतली आहे. तसेच गडावर असणाऱ्याचा मंदिराचा जिर्णोद्धार केला आहे. त्यामुळे हरणाई देवीच्या मंदिरासमोर असणाऱ्या शेडमध्ये राहण्याची व्यवस्था होऊ शकते. त्याच बरोबर गडावर पिण्याच्या पाण्याची सोय आहे. तरीही आपण गडावर जाताना मुबलक प्रमाणात पिण्याचे पाणी घेऊन जावे. मात्र, गडावर जेवणाची कोणतीही सोय नाही. त्यामुळे जेवणाची सोय तुमची तुम्हाला करावी लागणार आहे.
हे लक्षात ठेवा
1) शक्यतो जास्त पावसाच्या वातावरणात गडावर जाणे टाळावे.
2) आपला कचरा आपली जबाबदारी आहे. त्यामुळे गडावर कचरा करू नका आणि करून देऊ नका.
3) गडावरून खाली उतरताना शक्य होईल तितका कचरा गडाखाली आणण्याचा प्रयत्न करा.
4) अतिउत्साहाच्या भरात चुकीचे धाडस करू नका.
5) पावसाळी वातावरणामध्ये लहाण मुलांना गडावर घेऊन जाणे आरोग्याच्या दृष्टीने धोक्याचे ठरू शकते.
आपले गड हे मंदिरा समान आहेत, त्यामुळे गड स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर वेळ न दवडता आपल्या ग्रुप किंवा मित्राला शेअर करा, हा सह्याद्री तुमची वाट पाहत आहे.
Discover more from मराठी चौक विशेष
Subscribe to get the latest posts sent to your email.