दत्त दत्त दत्ताची गाय… श्री गुरुदेव दत्त आणि गौमाता यांचा सुरेख संगम असणारे हे वाक्य कानावर पडताच मनतृप्त झाल्याचा भाव आपसूकच मनामध्ये येतो. दर गुरुवारी मोठ्या संख्येने भाविक दत्तांच्या दर्शनासाठी गर्दी करत असतात. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचे एकत्रित रूप असलेल्या श्री गुरुदेव दत्तांची जयंती हिंदू धर्मातील एक महत्त्वपूर्ण आणि प्राचीन सण आहे.
मार्गशीर्ष महिन्याची चाहूल लागताच दत्त जयंतीच्या उत्सवाची लगबग सुरू होते. मार्गशीर्ष महिन्याच्या पोर्णिमेला त्रिदेवांच्या शक्तीचे प्रतीक असणारा हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
दत्तात्रेयांचे आयुष्य इतिहास आणि पुराणातील वर्णन
महाभारत, भागवतपुराण, मार्कंडेय पुराण, शिवपुराण आणि विविध आख्यायिकांचा वाचनरूपी प्रवास तुम्ही अनुभवलात तर तुम्हाला दत्तात्रेयांचे जन्मवर्णन आढळून येईल. पुराणांमध्ये करण्यात आलेल्या उल्लेखानुसार अत्रि ऋषी आणि अनसूया माता यांनी केलेव्या तपश्चर्येने या दिव्य बालकाचा अवतार प्रकट झाला. दत्तांचे भक्त तुम्हाला अखंड भारतात पाहायला मिळतील. दत्तांच्या सोबतीने अनसूये मातेला मानणाऱ्यांची संख्या सुद्धा अगणित आहे.
खुद्द देवांनी अनसूया मातेची परीक्षा घेतली होती. देवांनी घेतलेली परीक्षा म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी बालकाच्या रूपाने अनसूया मातेच्या पोटी जन्म घेण्याची केलेली कृपा होय, अशी प्रसिद्ध कथा सांगितली जाते. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचे एकत्रित रूप म्हणजे दत्तात्रेय.
ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचे रूपात जन्म झाला असला तरी दत्तात्रेयांचे आयुष्य अत्यंत विलक्षण आणि अवघड होते. जंगलात भ्रमण करणारे योगी, तपस्वी आणि ज्ञानयोगाचे आचार्य म्हणून त्यांनी आपली ओळख समाजात निर्माण केली होती. जंगल भ्रमण करत असताना प्राण्यांना, पक्षांना आणि वृक्षांना त्यांची गुरूचा दर्जा दिला. ‘२४ गुरु’ या संकल्पनेद्वारे जगातील प्रत्येक वस्तूंतून आपण शिकू शकतो हे शिकण्याचा अमुलाग्र संदेश दत्तांनी दिला. पृथ्वी, पाणी, अग्नी, आकाश, वायू पासून ते पक्षी, प्राणी, समाज सर्वकाही त्यांच्या दृष्टीने गुरू समान होते.
दत्त संप्रदाय आणि त्याची परंपरा
नाथसंप्रदाय, अवधूत व दत्त संप्रदाय यांचा उगम दत्तांच्या तत्त्वज्ञानातून झाल्याचे मानले जाते. एवढेच नव्हे तर दत्तात्रेयांना भारतातील विविध संप्रदायांचे आधारस्थान मानले जाते. यामुळे अखंड भारतात दत्तभक्तांची मोठी संख्या पाहायला मिळते. दत्तभक्तीचा प्रसार दक्षिण तसेच पश्चिम भारतात मोठ्या प्रमाणात झाला आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की कसा काय? तर याचं उत्तर अगदी सोपं आहे. श्रीपाद श्रीवल्लभ आणि नरसिंह सरस्वती यांना दत्तात्रेयांचे अवतार मानले जाते. त्यामुळे दक्षिण आणि पश्चिम भारतात मोठ्या संख्येने दत्तभक्त आहेत.
नरसोबाची वाडी, औदुंबर, गाणगापूर, गिरनार, त्रंबकेश्वर, करंजा या ठिकाणी दत्त भक्तीची परंपरा आजही अत्यंत जोमाने टिकून आहे. दरवर्षी दत्त जयंतीनिमित्त भाविकांची गर्दी या देवस्थानांवर पाहायला मिळते. तुम्ही सुद्धा या सर्व ठिकाणांना एकदा तरी आवर्जून भेट द्या.
दत्त जयंती आणि धार्मिक अर्थ
दत्त जयंती हा केवळ जन्मोत्सव नसून आध्यात्मिक उन्नतीचा दिवस मानला जातो. या दिवशी भक्तांनी व्रत, पारायण, जप आणि दत्त जयंतीची रात्रजागरण पूजा करण्याची परंपरा आहे. ‘दत्त बवनी’, ‘गुरुचरित्र’ वाचन, दत्त मंत्र जप, हे सर्व त्या दिवशी विशेषतः केले जाते. दोन ते तीन दिवस दत्त मंदिरांमध्ये भाविकांची दत्तांचे दर्शन घेण्यासाठी एकच झुंबड उडालेली पाहायला मिळते.
दत्तात्रेयांचा मुख्य संदेश “गुरुतत्त्व” आहे. खरा गुरु हा आपल्याला अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा असतो आणि प्रत्येक व्यक्तीने आपल्या आयुष्यात कमीतकमी एका गुरुच्या मार्गदर्शनाखाली आत्मिक प्रगती साधावी, हा संदेश दत्त जयंतीच्या दिवशी स्मरणात ठेवला जातो. हजारो भाविक दत्तांच्या या गुरूसंदेशाला मनात बिंबवून आपल्या सोबतीने आपल्या जोडीदाराच्या विकासासाठी धडपड करत असतात. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या जगात “गुरूतत्व” समाजाला दिशा देण्याचं काम करत आहे. फक्त आपल्याला हा गुरू संदेश ओळखून आत्मसात करता आला पाहिजे.
सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व
भारतात दत्त जयंतीच्या निमित्ताने अनेक धार्मिक यात्रा, भजन, किर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. ग्रामीण भागात विशेषतः हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. या दिवशी दानधर्म, अन्नदान, आणि सत्वयुक्त आचरण यांचे विशेष महत्व मानले जाते.
दत्तात्रेयांचे तत्त्वज्ञान “निसर्गातून शिकणे” आणि “साधेपणा” हे मानवी जीवनासाठी उपयुक्त मार्गदर्शक मानले जाते. आजच्या आधुनिक काळात, ताणतणावपूर्ण जीवनशैलीत दत्तांनी दिलेला योगमार्ग, मन:शांती आणि संतुलन याकडे मार्गदर्शन करतो.