Delhi Car Blast Ashok Kumar – घरी जातानाच स्फोट झाला; तीन चिमुकल्यांना बाप कायमचा सोडून गेला, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

दिल्लीमधील लाल किल्ल्याजवळ (Delhi Car Blast Ashok Kumar) काल (09 नोव्हेंबर 2025) एका कारमध्ये स्फोट झाला आणि संपूर्ण देश या स्फोटामुळे हादरून गेला. या स्फोटामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे. स्फोट इतका भीषण होता की, मृतांच्या शरीराचे तुकडे छिन्नविछिन्न अवस्थेमध्ये पडलेले आढळून आले. या भयंकर स्फोटामध्ये 34 वर्षीय अशोक कुमार यांचा सुद्धा मृत्यू झाला आहे. आपलं काम संपवून तीन लेकरांच्या ओढीने घराच्या दिशेने निघालेले अशोक कुमार यांचा या स्फोटामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कुटुंबाचा आधार हरपल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

अशोक कुमार मुळ उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील मंगरौल गावातली रहिवासी आहेत. वडिलांचं निधन झाल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी अशोक कुमार यांच्या खांद्यावर होती. त्यामुळे दिल्लीमध्ये बस कंडक्टर म्हणून ते रूजू झाले होते. पत्नी, तीन मुलं आणि आईच्या सोबतीने त्यांचा दिल्लीतील एका भाड्याच्या घरामध्ये संसार सुरू होता. मात्र, काल झालेल्या स्फोटात त्यांचा संसार उद्ध्वस्त झाला आहे. कुटुंबाचा आधारच हरपल्याने तिन लेकरांच्या पुढील भविष्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अशोक कुमार यांच्या आईला मुलाच्या मृत्यूची माहिती अद्याप देण्यात आली नव्हती. अशोक कुमारचा मृत्यू झाल्यामुळे मंगरौल गाव शोकसागरात बुडालं आहे. दिल्लीत शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह गावी नेऊन अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान, कुटुंबियांनी भरपाईची मागणी केली असून दोषींना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.