सातारा ते Mount Elbrus वाया अजिंक्यतारा, पाच दिवसांचा खडतर प्रवास आणि धैर्या कुलकर्णीची वयाच्या तेराव्या वर्षीच गरुडझेप

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला सातारा शुरवीरांचा जिल्हा म्हणून अखंड भारतात प्रसिद्ध आहे. आव्हानांचा सामना करून यशाची चव चाखण्यासाठी लागणारी जिद्द, मेहनत आणि संघर्ष करण्याची तयारी सातारकरांनी वेळोवेळी दाखवून दिली आहे. आता पुन्हा एकदा सातारच्या लेकीने आपल्या नावाची दखल साऱ्या जगाला घेण्यास भाग पाडलं आहे. युरोप खंडातील रशियाचे Mount Elbrus शिखर वयाच्या तेराव्या वर्षी उणे 14 अंश सेल्सिअस तापमानात जवळपास पाच हजार 642 मीटर उंचीचे हे शिखर धैर्या कुलकर्णीने सर केलं आहे. तिचा हा थक्क करणारा प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.

अजिंक्यतारा, यवतेश्वर, जानाई-मळाई डोंगर, जरंडेश्वरचा डोंगर आणि सांबरवाडी सुळका ही धैऱ्या कुलकर्णीची आवडती ट्रेकिंग ठिकाणं. याच ठिकाणी तिने ट्रेकिंग करत आपला सराव केला. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर आज तिने युरोप खंडातील माउंट एलब्रुस शिखर सर केलं. समुद्र सपाटीपासून 5 हजार 641 मीटर (18 हजार 510 फूट) एवढ्या उंचीवर असलेलं माउंट एलब्रुस हे शिखर दोन मृत ज्वालामुखींपासून बनलेलं आहे. बर्फाने वेढलेल्या या शिखरावर जाण्यासाठी तिचा प्रवास पाच दिवस सुरू होता. पहिल्या दिवशी मिनरली ओडी, दुसऱ्या दिवशी आजाऊ, तिसऱ्या दिवशी बेस कॅम्प माउंटन हंट, चौथ्या दिवशी 4 हजार 600 मीटर उंची सर केली आणि पाचव्या दिवशी धैऱ्या माउंट एलब्रुस शिखरावर पोहचली व तिने अभिमानाने शिखरावर तिरंगा फडकावला. धैऱ्याने दाखवलेल्या धैर्य प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.

वयाच्या सहाव्या वर्षापासून धैर्याचा ट्रेकिंगचा प्रवास सुरू झाला आहे. धैर्या कुलकर्णीने वयाच्या 12 व्या वर्षी एव्हरेस्ट बेस कॅम्पची मोहिम मागच्या वर्षी एप्रिल महिन्यात पूर्ण केली होती. विशेष म्हणजे आई-वडिलांशिवाय तिने ही मोहिम फत्ते केली होती. आणि पालकांशिवाय अशी कामगिरी करणारी ती देशातली पहिली मुलगी ठरली होती. त्यानंतर धैऱ्याने आफ्रिका खंडातील पाच हजार 650 मीटर उंचीवर असणारे किलीमंजारो हे शिखर सर केलं आणि आता युरोप खंडातील माउंट एलब्रुस हे शिखर सरं केलं आहे. या तिन्ही शिखरांवर जाण्याचा मार्ग खडतर, आव्हानात्मक आणि परीक्षा घेणार आहे. कमी तापमान, हाडं गोठवणारी थंडी, बर्फ, ऑक्सिजनचे कमी-जास्त प्रमाण या सर्व परिस्थितीचा सामना करत धैऱ्याने केलेले कामगिरी सर्वांसाठी प्रेरणा देणारी आहे.

धैर्या कुलकर्णीच्या या प्रवासात तिची आई ज्योती कुलकर्णी आणि वडील विनोद कुलकर्णी यांचा महत्त्वाचा पाठिंबा राहिला आहे. त्याचबरोबर गिर्यारोहक प्रियंका मोहिते आणि कैलास बागल यांच्या मार्गदर्शनाखाली ती गिर्यारोहणाचे धडे गिरवत आहे. धैऱ्याची आई ज्योती कुलकर्णी या शिक्षिका आहेत. तर वडील विनोद कुलकर्णी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष आणि सातारा जनता सहकारी बँकेचे बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष आहेत.