Diwali 2025 – दिव्यांच्या प्रकाशात मुलांची कल्पनाशक्ती, चला किल्ले सिंधुदुर्ग पाहूया

दीपावली (Diwali 2025 ) म्हटलं की महाराष्ट्रातल्या मुलांची किल्ले बनवण्याची लगबग सुरू होते. ग्रामीण भागांमध्ये नाही म्हटलं तरी प्रत्येक घरामध्ये एक किल्ला आजही बनवला जातो. परंतू मुंबईमध्ये जागे अभावी प्रत्येक घरामध्ये किल्ला उभा करणं शक्य होत नाही. त्यामुळे सर्व मुले एकत्र येऊन एकाच ठिकाणी भव्य दिव्य किल्ला उभा करतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला दिलेला हा वारसा आपल्याला सुद्धा जपायला हवा, आपला इतिहास येणाऱ्या पिढीलाही समजायला हवा. त्यासाठी प्रत्येक बिल्डींगमध्ये, मंडळामध्ये, चाळीमध्ये किल्ला बनवला पाहिजे. नेरूळ येथील सुरानंद ग्रुपच्या मुलांनी सिंधुदुर्ग किल्ल्याची सुंदर प्रतिकृती उभी केली आहे. विराज विकास गाढवे, राज विकास गाढवे आणि पृथ्वी जितेंद्र केळकर या मुलांनी मिळून सिंधुदुर्ग किल्ला उभा केला आहे. 

चला सिंधुदुर्ग किल्ल्याची माहिती पाहू

छत्रपती शिवाजी महाराजांचे आवडते सागरी शहर असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये सिंधुदुर्ग किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या सिंधुदुर्ग किल्ल्याला जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोचे मानांकन मिळाले आहे. सिंधुदुर्ग हा जलदुर्ग असून 25 नोव्हेंबर इ.स 1664 साली किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात झाली होती.

थोडक्यात माहिती:

  • मुख्य वास्तुशिल्पकार: हिरोजी इंदुलकर.
  • सिंधुदुर्ग किल्ल्यावर जवळपास 52 बुरुज आणि 45 दगडी जिने आहेत
  • बांधकाम साहित्य: मोठमोठे दगड, चुन्याची बांधणी, आणि सागरी परिस्थितीला तोंड देणारी रचना.
  • किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील दूध विहीर, साखर विहीर व दही विहीर या गोड्या पाण्याच्या दगडी विहिरी आहेत.
  • विशेषता: किल्ल्यात प्रवेशासाठी असलेले मुख्य द्वार (दुर्गद्वार) समुद्रातून दिसत नाही – हे किल्ल्याच्या सुरक्षेसाठी हुशारीने बांधलेले आहे.
  • आतील रचना: किल्ल्यात शिवाजी महाराजांचा स्वहस्ते ठेवलेला हाताचा ठसा व पावलांचे ठसे असलेले श्री शिवराजेश्वर मंदिर आहे. हे महाराष्ट्रातील एकमेव मंदिर आहे जेथे शिवाजी महाराजांची पूजा केली जाते. या मंदिराची निर्मिती इ.स 1695 साली छत्रपती राजाराम महाराज यांनी केली होती. 
  • महत्त्व: हा किल्ला मराठा साम्राज्याच्या सागरी सामर्थ्याचे प्रतीक आहे. सिंधुदुर्ग किल्ला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचा, सागरी संरक्षणाचा आणि अभिमानाचा जिवंत पुरावा आहे.

आपल्या कुटुंबासह सिंधुदुर्ग किल्ल्याला एकदा आवर्जून भेट द्या, आपला इतिहास मुलांनाही समजला पाहिजे