गोठ्यात गुरांचं हंबरणं, खुराड्यात कोबड्यांचा धिंगाणा, आकाशात चिमण्यांचा चिवचिवाट सुरू झाला की पहाट झाल्याची चाहूल लागते. प्राण्यांच्या सहवासात राहणाऱ्या गावच्या शेतकऱ्याला सकाळी लवकर उठण्यासाठी आजही घड्याळाची आवश्यकता भासत नाही. सकाळी उठल्यावर गाय आणि म्हशीची धार काढण्यापासून दिवसाला सुरुवात होते. त्यानंतर शेतीच्या इतर कामांचा सपाटा सुरू होतो. शेतकऱ्यांची ही मेहनत नित्यनियमाने सुरू असते. परंतू आजही त्यांच्या मेहनतीचं फळ त्यांना मिळत नाही. कधी कधी अशी परिस्थिती निर्माण होते की, की दुधाला भावच मिळत नाही आणि लाखोंच नुकसान शेतकऱ्यांना सहन कराव लागत. अनेक शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कस धरल्यामुळे बिकट परिस्थितही शेतकरी शड्डू ठोकून मैदानात उभा राहतो. परंतू एक काळ होता, जेव्हा दुधाला भाव मिळत नव्हता, दुग्धउत्पादक शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय होती. या दयनीय अवस्थेतून दुध उत्पादक शेतकऱ्यांना खंबीर पाठिंबा देण्यासाठी डॉ. वर्गिस कुरियन (Dr Verghese Kurien) यांनी जीवाच रान केलं. भारत हा दुधाच्या पुरवठ्यात स्वयंपूर्ण व्हावा, हे स्वप्न त्यांनी पाहिलं आणि सत्यात उतरवलं. या महान व्यक्तिमत्वाचा आणि भारताच्या दुग्धक्रांतीच्या जनकाचा जन्म दिवस संपूर्ण भारतात राष्ट्रील दुध दिवस (National Milk Day) म्हणून साजरा केला जातो.
डॉ. वर्गीस कुरियन हे नाव घेतलं की भारतातील दुग्धक्रांती, अमूल, शेतकरी स्वावलंबन, सहकारी चळवळ आणि श्वेतक्रांती हे शब्द आपोआप ओठांवर येतात. “Father Of White Revolution” म्हणून ओळखले जाणारे डॉ. कुरियन हे तंत्रज्ञान, नेतृत्व, व्यवस्थापन, शेतकऱ्यांच हित आणि सामाजिक बदल या सर्व घटकांचे मुर्तीमंत उदाहरण होते. शेतकरी म्हणून घेणाऱ्या आणि दुध पिणाऱ्या प्रत्येकाला डॉ. वर्गीस कुरियन यांचा जीवन प्रवास माहित असला पाहिजे.
प्रारंभिक जीवन व शिक्षण
डॉ. वर्गीस कुरियन यांचा जन्म 26 नोव्हेंबर 1921 रोजी केरळमधील कोझिकोड (काळिकट) येथे एका ख्रिश्चन कुटुंबात झाला. त्यांचे वडील डॉक्टर आणि आई शिक्षक होत्या. वडील आणि आई दोघांचेही शिक्षण उच्च दर्जाचे असल्यामुळे शिक्षणाचे बाळकडू त्यांना जन्मत:च मिळाले होते. त्यामुळे वर्गीस कुरियन यांना शिकवण्यात आई-वडिलांनी कोणतीही कमतरता भासू दिली नाही. त्यांचा शैक्षणिक प्रवास अगती उत्तमरित्या पार पडला.
शिक्षणाचा एक टप्पा पूर्ण केल्यानंतर त्यांनी मॅकेनिकल इंजिअरिंग क्षेत्रांची निवड केली आणि मद्रास विद्यापीठातून आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रतन टाटा यांच्या टाटा स्टीलमध्ये काम करण्यास त्यांनी सुरुवात केली. करिअरमध्ये भरारी घेण्याच्या वळणावर ते आले असता भारत सरकारच्या माध्यमातून अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी त्यांना शिष्यवृत्ती मिळाली. शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर त्यांनी अमेरिका गाठली आणि डेलावेल विद्यापीठातून डेअरी इंजिनिअरिंगमध्ये (Dairy Engineering) मास्टर्स पदवी मिळवली. मास्टर्स पदवी मिळवल्यानंतर एका चांगल्या कंपनीत आणि मोठ्या शहरामध्ये आपल्या करिअरला नव्याने सुरुवात होईल, अशी त्यांना त्यांच्या कुटुंबीयांना अपेक्षा होती. पण त्यांच्या नशिबाच्या डायरीत छोट्या गावाची नोंद झाली होती. याच छोट्या गावातून भारताच्या कृषी इतिहासातील एका सूवर्ण पुस्तकाची सुरुवात झाली.
क्रांतीची बीजे पेरली गेली
अमेरिकेतून डेअरी इंजिनिअरिंगमध्ये मास्टर्स पदवी मिळवल्यानंतर भारत सरकारने त्यांची बदली गुजरातमधील अनंद येथील सरकारी डेअरी फार्ममध्ये केली. जेव्हा डॉ. वर्गीस कुरियन यांची बदली गुजरातमधील अनंद येथे झाली, तेव्हा ती जागा निरुत्साही होती, सोईसुविधांचा अभाव होता. दुध उत्पादक शेतकऱ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत होता. कंपन्यांनी आपलं वर्चस्व निर्माण केलं होतंं, शेतकऱ्यांचा व्यापाऱ्यांकडून गैरफायदा घेतला जात होता, दुधाला दर मिळत नव्हता, बाजार अस्थिर होता. या परिस्थितीत डॉ. वर्गीस कुरियन यांचा परियच झाला त्रिभुवनदास पटेल आणि स्थानिक दूध उत्पादक शेतकऱ्यांशी. शेतकऱ्यांनी जेव्हा आपल्या भावना व्यक्त केल्या तेव्हा कुरियन यांच्या मनात क्रांतीची ठिणगी पेटली.
AMUL ची स्थापना | What is The Full Form of Amul
कायर डिस्ट्रीक्ट को-ऑपरेटिव्ह मिल्क प्रोड्युसर्स यूनियन लिमिटेडची 1946 साली स्थापना झाली होती. मात्र, डॉ. वर्गीयस कुरियन यांच्या येण्याने कंपनीला नवी झळाळी मिळाली. पुढे हेच नाव झाले AMUL – Anand Milk Union Limited अमूल हे फक्त नाव नाही हा एक ब्रँड आहे, ज्याचे चाहते जगाच्या कानाकोपऱ्यात आहेत. अमूल हे नाव ग्रामीण भारताच्या सामूहिक शक्तीचं प्रतीक आहे. कुरियन यांनी केलेल्या उपाययोजनांमुळे शेतकऱ्यंच्या जीवनामध्ये अमुलाग्र बदल झाला. जसे की,
- दूध संकलन करण्यासाठी ग्रामस्तरावरील संग्रह केंद्रे
- पारदर्शक तोलण व्यवस्था
- योग्य दर आणि बोनसची पद्धत
- आधुनिक डेअरी तंत्रज्ञान
- दूध पावडर, बटर, चीज, आइस्क्रीम यांचे उत्पादन
- देशभर वितरित करणारी मजबूत कोल्ड-चेन
या सर्वांमुळे अमूलकडे पुरवठा वाढू लागला आणि शेतकऱ्यांचे जीवनमान झपाट्याने बदलू लागले. शेतकऱ्यांना एक निश्चित रक्कम मिळू लागली त्यामुळे शेतकऱ्यांना बराच फायदा झाला.
श्वेतक्रांती – भारताला जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश बनविणारी मोहीम
भारत सरकार आणि कुरियन यांच्या नेतृत्वाखाली 1970 मध्ये सुरू झाली ‘ऑपरेशन फ्लड’ (White revolution) ही जगातील सर्वात मोठी दुग्धविकास योजना. या योजनेमुळे लाखो शेतकऱ्यांना रोजगार मिळाला. दूध उत्पादनाला चालना मिळाली, ग्रामीण भागामध्ये शेतकरी दूध उत्पादनाच्या दिशेने वळला. म्हशी आणि गायींच्या मागणीत वाढ झाली. प्रामुख्याने ऑपरेशन फ्ल्डमुळे पुढील बदल दिसून आले.
- भारतातील दूध उत्पादन तिप्पट वाढले
- शहरी भागात स्वस्त आणि पौष्टिक दूध उपलब्ध झाले
- लाखो शेतकऱ्यांना रोजगार मिळाले
- डेअरी उद्योगाचे तंत्रज्ञान आधुनिक झाले
- देशभर सहकारी चळवळीचे जाळे उभे राहिले
- यालाच पुढे White Revolution म्हटले गेले.
White revolution मुळे शेतकरी सुखावला. कुरियन यांनी सिद्ध करुन दाखवलं की जर योग्य व्यवस्थापन, तंत्रज्ञान आणि पारदर्शकता देण्यात आली तर गावातील शेतकरी जगातला सर्वोत्तम उद्योजक ठरू शकतो. शेतकऱ्यांनी सुद्धा कुरियन यांच्या या योजनेला भरभरून पाठिंबा दिला.
राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाची स्थापना | National Dairy Development Board
डॉ.वर्गीस कुरियन फक्त अमुलची सुरुवात करून थांबले नाहीत. त्यांनी 1965 साली राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाची स्थापना (NDRB) केली. NDRB च्या स्थापनेमुळे देशभरातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा झाला. NDRB मुळे अमूल मॉडेलनुसार सहकारी डेअरी विकसित करण्यास मदत मिळाली. यामुळे दूध संस्थांचे एक जाळे देशभरात निर्माण झाले आणि राज्या राज्यांमधाल शेतकरी एकमेकंशी जोडला गेला. NDRB च्या पाठिंब्यामुळे महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश, गुजरात अशा राज्यांमध्ये दूध सहकारी संस्थांचे जाळे निर्माण झाले. देशभरात राष्ट्रव्यापी ब्रँड्स उभे राहिले आणि यामुळे दुधाचा बाजारा आर्थिकदृष्ट्या मजबूत होण्यास मदत झाली.
सन्मान आणि पुरस्कार
डॉ. वर्गीस कुरियन यांनी आपले जीवन एका अर्थी शेतकऱ्यांसाठी खर्ची केले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात त्यांच्याप्रती प्रचंड आदर आणि सन्मान तेव्हाही होता आणि आजही आहे. डॉ. वर्गीस कुरियन यांच्या या राष्ट्रीय कार्याची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली. यामुळे त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांना सन्मानित करण्यात आले.
- पद्मश्री (1965)
- पद्मभूषण (1966)
- पद्मविभूषण (1999)
- रॅमन मॅगसेसे पुरस्कार
- वर्ल्ड फूड प्राईज (1989)
हे पुरस्कार त्यांच्या कार्याची जागतिक पातळीवरील दखल होते.
अन् मिल्कमॅन हरपला
ग्रामीण भारतासाठी झटणारा मिल्कमॅन 2012 साली हरपला. 9 सप्टेंबर 2012 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांनी आयुष्यभर ग्रामीण भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी काम केले. त्यांची देण म्हणूनच आज भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे. अमूल जगातील सर्वात मोठ्या सहकारी ब्रँड्सपॅकी एक आहे. लाखो शेतकरी डॉ. वर्गीस कुरियन यांच्या योगदानामुळे समृद्ध झाले, श्रीमंत झाले. कुरियन यांनी दिलेली सहकारी चळवळ, व्यवस्थापनातील पारदर्शकता आणि शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवण्याची विचारसरणी पुढील पिढ्यांसाठी दीपस्तंभ आहे.
डॉ. कुरियन यांचे वैयक्तिक आयुष्य अत्यंत साधे होते. त्यांनी भौतिक सुखाला कधी महत्त्व दिले नाही. ते म्हणायचे की:
“I am not a milkman. I am a people’s man.”


