छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ऐतिहासिक भूमी म्हणजे सातारा जिल्हा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून अनेक ऐतिहासिक निर्णय घेण्यात जिल्ह्याने पुढाकार घेतला. पुस्तकांच गाव, मधाचं गाव, यंदाच्या वर्षातील सर्वाधिक पावसाचं ठिकाण सुद्धा याच सातारा जिल्ह्यात आहे. आता पुन्हा एकदा जिल्ह्यातील सज्जनगडाच्या पायथ्याला असलेल्या गजवडी गावाच्या ऐतिहासिक उपक्रमामुळे जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे. जमीन असो अथवा घराच्या उतारा या सर्व कागदपत्रांवर पुरुषांच्या बरोबरीने महिलांची नावे जोडण्याचा अभिनव उपक्रम गावाने राबवला आहे. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यात सध्या गजवडी गावाची जोरदार चर्चा सुरू आहे.
सातारा तालुक्याती सज्जनगडाच्या पायथ्याला निसर्गाच्या कुशीत गजवडी हे गाव वसलेलं आहे. जवळपास 1500 हून अधिक गावाची लोकसंख्या आहे. पुरुषांसोबत महिलांना समान अधिकार देण्याचा ऐतिहासिक निर्णय गावाने घेतला आहे. या उपक्रमामुळे ‘आठ अ’ चा उतारा, जमिनीचा सातबारा आणि घरांवर देखील पुरुषांसोबत महिलांचे नावे लावण्यात आली आहेत. कागदपत्रांवर नाव असल्यामुळे महिलांना व्यावसाय करण्यासाठी बँकेकडून कर्ज सुद्धा सहज उपलब्ध होत आहे. तसेच साडेतीनशेहून अधिक महिलांच्या नावावर संपत्ती करण्यात आली आहे. 600 हून अधिक महिला या उपक्रमामुळे स्वावलंबी बनल्या आहेत. अनेक महिलांनी स्वत: कर्ज काढून आपला व्यवसाय सुरू केला आहे. गावातील बऱ्याच महिलांना या उपक्रमाचा फायदा झाल्याचं स्वत: महिलांनी सांगितलं आहे. ABP ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
अशी झाली सुरुवात
या ऐतिहासिक उपक्रमाची सुरुवात 2010 साली झाली. जनजागृती करण्यासाठी आणि गावातील नागरिकांनी पुढाकार घ्यावा म्हणून सुरुवातीला कारच्या मदतीने लाऊड स्पीकर लावून सर्व ग्रामस्थांना या उपक्रमाची माहिती देण्यात आली. सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या पुढाकारामुळे शेतजमिनीवर महिलांची नावं लावण्यास सुरुवात झाली, अशी माहिती गजवडी गावच्या सीमा बळीप यांनी दिली.