महाबळेश्वत तालुक्यातील सोनाट गावात रानगव्याने (Indian Gaur) एका शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या हल्ल्यात शेतकरी राघू जानू कदम यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे कोयना विभागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाविरोधात नागरिकांनी रोष व्यक्त केला.
मुंबई तकने दिलेल्या वृत्तानुसार, सकाळच्या सुमारास शेतातील काम करण्यास गेले असता राघू जानू कदम यांच्यावर रानगव्याने हल्ला केला. या भयंकर हल्ल्यात राघू कदम यांचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे कोयना विभागातील नागरिक संतप्त झाले आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा कोयना परिसरातील 105 गावांच्या रोषाला सामोरे जावे लागले. यावेळी रानगव्यांचा वाढता त्रास लक्षात घेता प्रशासनाने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. तसेच कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा सुद्धा सर्व गावांनी दिला आहे.
डोंगराळ आणि हिरवळीच्या ठिकाणी रानगव्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रानगव्यांमुळे असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे रानगव्यांचे असे जीवघेणे हल्ले होण्याचा धोका वाढतो. पण काही गोष्टी नित्यनियमाने पाळल्यास रानगव्याच्या हल्ल्यापासून तुम्ही तुमची सुरक्षा करू शकता. कशी ते आपण थोडक्यात जाणून घेऊ.
१. रानात जाताना खबरदारी घ्या
- शक्यतो एकटं रानात किंवा शेतात जाऊ नका. नेहमी सोबतीला कोणी तरी असेल याची खात्री करा.
- संध्याकाळी आणि पहाटेच्या वेळेस रानात जाणं टाळा, कारण त्या वेळी रानगवे अधिक सक्रिय असतात.
- मोबाईलचा फ्लॅश, मोठा आवाज, किंवा अचानक हालचाल करू नका. त्यामुळे ते भडकू शकतात.
२. रानगवा दिसल्यास काय करावे
- रानगवा तुम्हाला लांबून दिसला तर शांत राहा, थांबा, आणि मागे व्हा आणि हळू हळू तिथून निघून जा.
- पळण्याचा वेडेपणा करू नका. कारण रानगवा माणसापेक्षा वेगाने धावू शकतो आणि त्यामुळे तो पाठलाग करू तुम्हाला सहज गाठू शकतो.
- झाडे, दगड किंवा उंच जागा दिसल्यास तिथे हळूच आश्रय घ्या.
- वारा कोणत्या दिशेने येतोय हे पाहा. वार्याच्या दिशेने उभं राहू नका, कारण त्यामुळे प्राण्याला तुमचा वास येतो.
३. हल्ला झाल्यास स्वतःचा बचाव
- रानगवा हल्ल्याच्या उद्देशाने जवळ आल्यास मोठा आवाज करा (ढोल, काठी आपटणे) कधी कधी त्यामुळे रानगवा मागे हटतो.
- तुमच्या आजूबाजूला झाड किंवा मोठा दगड असल्यास त्यामागे लपण्याचा प्रयत्न करा.
- शक्य असल्यास उंच जागेवर चढा, रानगवा फार उंच जागा चढू शकत नाही.
४. अशा गोष्टी करू नका
- रानगव्याला त्रास देऊ नका, फोटो काढण्यासाठी जवळ जाऊ नका.
- त्याच्या पिलांच्या जवळ जाऊ नका. मादी गवा अत्यंत आक्रमक होते.
- शेतात किंवा रानात मीठ किंवा अन्न टाकून गवे आकर्षित करू नका.
५. शेतकऱ्यांसाठी विशेष सूचना
- शेतात सोलर लाईट, घंटा, वाजणारे उपकरण, किंवा कुंपणात कपड्यांचे झेंडे लावल्यास गवे दूर राहतात.
- रात्रभर पाळी ठेवताना आग पेटवून ठेवा किंवा टॉर्च वापरा.
- रानगवे वारंवार दिसत असल्यास वनविभागाला त्वरित कळवा.
रानगवा आक्रमक दिसतो, पण तो साधारणपणे माणसावर हल्ला करत नाही. जेव्हा रानगव्याला धोका जाणवतो तेव्हाच तो हल्ला करतो. म्हणून शांत राहा, त्याच्यापासून सुरक्षित अंतर ठेवा आणि त्याच्या परिसरात आदराने वागा.