टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये सध्या नवी मुंबईतील डी.वाय.पाटील स्टेडियमवर ICC Women’s World Cup 2025 ची फायनल खेळली जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला 299 धावांचे आव्हान दिले आहे. दोन्ही संघांतले खेळाडू वर्ल्ड कप पहिल्यांदा उंचावण्यासाठी जीवाचे रान करत आहेत. टीम इंडियाच्या दीप्ति शर्माने सुद्धा नाबाद 58 धावांची खेळी करत टीम इंडियासाठी महत्वपूर्ण कामगिरी केली. तसेच एक विक्रम सुद्धा तिने आपल्या नावावर केला आहे.
दीप्ति शर्माने या सामन्यात 58 चेंडूंमध्ये 58 धावांची नाबाद खेळी केली. चौथ्या विकेटसाठी दीप्तिने कर्णधार हरमनप्रीत कौरसोबत 52 धावांची भागीदारी केली. त्यामुळे टीम इंडियाचा मधल्या फळीतल्या डावाला धार मिळाली. दीप्ति शर्माने टीम इंडियाचा डाव सावरलाच पण त्याचबरोबर वर्ल्ड कपमध्ये 200 धावांचा टप्पाही पार केला. दीप्तिच्या नावावर वर्ल्ड कपमध्ये 15 हून अधिक विकेट सुद्धा आहेत. त्यामुळे दीप्ति शर्मा आता एकाच वर्ल्डकपमध्ये 200 धावा आणि 15 हून अधिक विकेट घेणारी पहिली खेळाडू ठरली आहे. अशी कामगिरी यापूर्वी कोणत्याही खेळाडूला करता आली नाही.