देशसेवेचं (Indian Army Vacancy) स्वप्न उराशी बाळगून दिवस-रात्र मेहनत करणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. अग्निपथ योजनेअंतर्गत, कोल्हापूर येथील सैन्य भरती कार्यालयातर्फे सातारा येथे भरती मेळावा आयोजित केला जाणार आहे. महाराष्ट्रातील आणि गोव्यातील तरुणांचे या सैन्य भरती मेळाव्यामध्ये नशीब उजळणार आहे. संपूर्ण भरती प्रक्रिया अतिशय निष्पक्ष आणि पारदर्शक असल्याने उमेदवारांनी दलालांना बळी न पडण्याचे आवाहन लष्करी अधिकाऱ्यांनी केले आहे.
कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी ही भरती प्रक्रिया असणार आहे.
- महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी
- गोवा राज्यातील उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा हे दोन जिल्हे
कोणकोणत्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
- जनरल ड्यूटी (सर्व शस्त्रे)
- अग्निवीर टेक्निकल (सर्व शस्त्रे)
- अग्निवीर ऑफिस असिस्टंट (सर्व शस्त्रे)
- अग्निवीर ट्रेड्समन (सर्व शस्त्रे
अग्निपथ योजनेअंतर्गत १० वी आणि ८ वी उत्तीर्ण असणाऱ्या तरुणांसाठी या भरती मेळाव्यामध्ये संधी दिली जाणार आहे. दि. १५ नोव्हेंबर २०२५ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत जिल्हा पोलीस परेड ग्राउंड, सातारा या ठिकाणी पार पडणार आहे. जिल्हा माहिती कार्यालय, सातराच्या फेसबुक पेजवर यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
ऑनलाइन कॉमन एन्ट्रन्स परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचे प्रवेशपत्र नोव्हेंबर २०२५ च्या पहिल्या आठवड्यात आर्मी वेबसाइट www.joinindianarmy.nic.in द्वारे त्यांच्या वैयक्तिक ई-मेल आयडीवर पाठवले जातील. वैध प्रवेशपत्र, प्रतिज्ञापत्र आणि कागदपत्रे असलेल्या उमेदवारांनाच भरतीच्या ठिकाणी परवानगी असेल. सातारा जिल्हा जिल्हा प्रशासन आणि पोलिस दलाकडून आवश्यक ती मदत आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
उमेदवारांनी सर्व आवश्यक मूळ शैक्षणिक प्रमाणपत्रे, जातीचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, पोलीस पडताळणी, पुरेशा संख्येने छायाचित्रांच्या प्रती, अधिसूचनेत दिलेल्या नमुन्यानुसार योग्यरित्या भरलेले वैध प्रतिज्ञापत्र सोबत बाळगावीत. योग्यरित्या भरलेले प्रतिज्ञापत्र नसल्यास कोणत्याही उमेदवाराला रॅलीमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. भरतीमध्ये तरुणांचा सहभाग सुरळीत होईल आणि भरतीचे निर्दोष आयोजन करण्यास लष्करी अधिकाऱ्यांना मदत होईल यादृष्टीने उमेदवारांनी त्यांच्या स्वतःच्या हितासाठी वैद्यकीय प्राथमिक वैद्यकीय तपासणीपूर्वी भरतीपूर्व तात्पूरती तपासणी करुन घ्यावी.