वाई तालुक्यातील किसन वीर महाविद्यालयाच्या परिसरात दुर्मीळ Indian Luna Moth आढळून आला. मराठीमध्ये चंद्र पतंग म्हणून प्रसिद्ध असणारं हे पतंग पाहण्यासाठी विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी गर्दी केली होती. सहायक प्राध्यापक जितेंद्र चव्हाण व ग्रंथालय परिचक ऋषीकेश शिंदे यांना हा पतंग आढळून आला.
प्राणिशास्त्र विभागातील सहायक प्राध्यापक राहुल तायडे यांनी लोकमतशी बोलताना माहिती दिली की, “मून मॉथ सहसा घनदाट जंगल परिसरात दिसतो आणि शहरी भागात त्याचे दर्शन फार दुर्मिळ असते. महाविद्यालय परिसरात चंद्र पतंग दिसून आल्याने महाविद्यालयाचा परिसर जैवविविधतेच्या दृष्टीने समृद्ध असल्याचे हे एक सकारात्मक लक्षण आहे.” असं प्रा.राहुल तायडे यांनी सांगितले. “महाविद्यालय परिसरात दुर्मीळ असा ‘मून मॉथ’ आढळणे ही निसर्ग आणि पर्यावरणाच्या संतुलणाच्या दृष्टीने अत्यंत आनंदाची व अभिमानाची बाब आहे.” असे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांनी सांगितले. हा दुर्मीळ पतंग पाहण्यासाठी विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी गर्दी केली होती.
What Is Indian Luna Moth किंवा Moon Moth?
मून मॉथ पतंगाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याची उत्कंठा तुमच्या मनात निर्माण झाली असेलच. तर मून मॉथ हा प्रामुख्याने भारत, नेपाळ, श्रीलंका, म्यानमार व आग्नेय आशियातील जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतो. सॅटर्निडी कुळातील या चंद्र पतंगाचे पंख हिरवट रंगाचे असतात. या पतंगाचे वैशिष्ट्य म्हणचे पंतगाच्या प्रत्येक पंखावर डोळ्यासारखे लक्ष वेधून घेणारे गोल ठिपके असतात. तसेच मागील पंखांना लांब, वळणदार, शेपटीसारखी वाढ असते, जी याच्या सौंदर्यांमध्ये आणखी भर घालते.
मून मॉथ पतंगाबद्दल काही लक्षात ठेवाव्यात अशा गोष्टी.
- मून मॉथ पतंग प्रकाशाकडे आकर्षित होतो आणि प्रामुख्याने रात्री सर्वाधिक सक्रिय असतो.
- प्रौढ अवस्थेमध्ये मून मॉथचा मुखभाग विकसित न झाल्यामुळे तो अन्न घेत नाही.
- मून मॉथचे आयुष्य तुलनेने कमी असते.
- मून मॉथचे प्रजनन करणे हे मुख्य कार्य असते.
- मून मॉथची आळी विविध झाडांच्या पानांवर उपजीविका करते (आंबा, पेरू, कडुलिंब, जांभूळ इत्यादी.)
- अळी अवस्था – रेषीम कोष – कोषावस्थेतून बाहेर पडत काही आठवड्यांमध्ये सुंदर पतंग आकाशात भरारी घेतो.
चंद्र पतंग निसर्गातील अन्नसाखळीचा महत्त्वाचा घटक असून पर्यावरणीय समतोल राखण्यास मदत करतो. तसेच जैवविविधतेचे प्रतीक मानला जातो. मून मॉथ दिसणे हे जंगल किंवा परिसर आरोग्यदायी असल्याचे संकेत मानले जातात.