Inspirational Story आयुष्याच्या या शर्यतीत ‘जो लढतो तोच टिकतो’, कारणं देऊन चालत नाही आणि कारणं देणारा यशस्वीही होत नाही. स्वत:वर विश्वास असेल, स्वत:च साम्राज्य उभं करून दाखवण्याचं स्वप्न उराशी बाळगलं असेल आणि त्या स्वप्नाचा पाठलाग करताना येणाऱ्या आव्हांनाना धैऱ्याने तोंड देण्याची तयारी केली असेल तर, या जगात तुमच्यासाठी अशक्य असं काहीच नाही. आणि हे सिद्ध करून दाखवलंय सहा दिव्यांग मित्रांनी. साम्राज्य छोटं असावं पण हक्काच आणि आपलं असाव, या वाक्याला अनुसरून सहा दिव्यांग मित्र एकत्र आले आणि उभं राहिलं “तलफ अमृततुल्य आणि कॅफे”
अशी झाली व्यावसायाला सुरुवात
जितेश कांबळे आणि धम्मपाल आवटे हो दोघे अल्पदृष्टी असून आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे सुरुवातीला एका कॅफेमध्ये काम करत होते. प्रचंड मेहनतीने ते काम करत होते परंतु त्याचा त्यांना योग्य मोबदला मिळत नव्हता. कॅफेमध्ये काम करत असताना त्यांनी कॅफेमधील अनेक बारीक सारीक गोष्टी अगदी जवळून अनुभवल्या आणि शिकून घेतल्या. याचा त्यांना व्यावसाय उभारणीत चांगला फायदा झाला. त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि स्वत:चा व्यावसाय सुरू करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलं. जितश आणि धम्मपाल यांनी या व्यावसायामध्ये सूरज रेपाळे, शुभम नरवडे, गौरव मालक आणि आदित्य डापले या त्यांच्या मित्रांना सुद्धा सहभागी करून घेतलं. आणि पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात ‘तलफ अमृततुल्य आणि कॅफे’ हा त्यांचा नवीन व्यावसाय सुरू झाला.
व्यावसाय सुरू करत असताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. परंतु त्यांनी न डगमडता सर्व अडचणींवर मात केली आणि आपलं स्वप्न सत्यात उतरवलं. या कॅफेमध्ये चहा, कॉफी, मॅगी, मिसळ, चिकन थाळी, व्हेज थाळी, वडा पाव अशा विविध पदार्थांचा अस्वाद तुम्हाला घेता येणार आहे. ग्राहक सुद्धा मोठ्या संख्येने या सर्व पदार्थांवर ताव मारण्यासाठी मोठ्या उत्साहाने या कॅफेला भेट देत आहेत. या व्यवसायाला यशाच्या शिखरावर नेण्यासाठी जितेश कांबळे, धम्मपाल आवटे, सूरज रेपाळे, शुभम नरवडे, गौरव मालक आणि आदित्य डापसे हे सहा मित्रांचा मोलाचा वाटा आहे.
तलफ हा फक्त एक कॅफे नाही, तर जिद्दीची, आत्मनिर्भरतेची आणि सामाजिक समावेशकतेची एक चविष्ट चहाची चव आहे. जी प्रत्येकाला नवा दृष्टिकोन देऊन जाते, असे शुभम नरवडे यांनी News18marathi ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले आहे.