International Men’s Day – अरे रडायला तू काही मुलगी आहेस का… समाजाने दाबलेली पुरुषांची एक अबोल वेदना

>> गणेश सुरेखा मारूती वाडकर

अरे काय रडतोस… पुरुषासारखा पुरुष ना तू, रडतोय काय… मुलांनी रडायचं नसतं… रडायला तू काही मुलगी आहेस का?… ही वाक्य प्रत्येक पुरुषाच्या मनात एखाद्या धारधार तलवारीसारखी हृदयातून आरपार गेली आहेत. ही मानसिक जखम म्हणजे पुरुषाचं पुरुषत्व, ही समाजाने पुरुषाला दिलेली अबोल ओळख आहे. परुष रडला तर त्याच्यावर टोमण्यांच्या रुपात वाक्यांचे विषारी बाण सोडले जातात. वेदना विसरून, भावनांवर नियंत्रण ठेवून, दु:ख मनात दडवून पुरुषाने फक्त कणखर रहावं, हीच अपेक्षा समाजाने केली आहे. समाजाच्या याच अपेक्षेमुळे आणि चुकीच्या समजुतीमुळे दरवर्षी लाखोंच्या घरात पुरूष आपली जीवन यात्रा संपवत आहेत. पुरुष दिन सुद्धा उत्साहात साजरा केला जात नाही (काही अपवाद वगळता), पुरुष दिन काय साजरा करायचा? असं प्रतिउत्तर केलं जातं. 

भावनांच्या आड सुरू असलेला संघर्ष 

पुरुषांना लहाण असतानाचा “कणखर” राहण्याचा सल्ला नव्हे तर दबाव टाकला जातो. त्यामुळे वेदना व्यक्त करण्यास मुलं नेहमीच कचरतात, तणाव किंवा मनातलं दु:ख व्यक्त करण्यासाठी त्यांना प्रवृत्त केलं जात नाही. या सर्व सामाजिक वातावरणामुळे कळपात असूनही पुरुषाची अवस्था एकट्या पडलेल्या ध्रुवीय अस्वलासारखी झालेली पाहायला मिळते.  मनातल्या भावना व्यक्त करण्याची वाट बंद केल्यामुळे पुरुष अनेकदा आपल्या समस्यांना सामोरे जाताना एकटे पडतात. पुरुषाने मदत मागणे म्हणजे कमजोरी. पण हीच धारणा पुरुषांच्या मानसिक आरोग्याच्या समस्यांना वारंवार खतपाणी घालत गेली आहे. आणि याचे गंभीर परिणाम म्हणजे World Health Organization ची आकडेवारी. 

जगातील धक्कादायक आकडे

WHO 2022 च्या आकडेवारीनुसार दरवर्षी जगभरातील सुमारे 7 लाख 20 हजार पुरुष आत्महत्या करून आपले जीवन संपवतात. हे प्रमाण महिलांच्या तुलनेत अनेक पटीने जास्त आहे. International Association for Suicide Prevention (2021) च्या आकडेवारीनुसार, 15 ते 29 वयोगटातील पुरुषांमध्ये आत्महत्येचे प्रमाण सर्वाधिक आहे. धक्कादायक बाब म्हणजे 15 ते 29 या वयोगटातील पुरुषांचा संघर्ष सुरू असतो. लग्न, करिअर, सामाजिक दबाव या सर्व आजूबाजूच्या वातावरणामुळे आणि मनातल्या भावना व्यक्त न केल्यामुळे पुरुषांना टोकाचं पाऊल उचलावं लागत असल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे. हा काळ जीवनातील सर्वात ऊर्जेचा, स्वप्नांचा आणि प्रगतीचा काळ असतो, पण त्याच काळात सर्वाधिक मानसिक तणावही पुरुषांना सहन करावा लागत आहे.  

भारतातील वास्तव आणि वाढती चिंता 

मागच्या काही वर्षांमध्ये विवाहित पुरुषांच्या आत्महत्येच प्रमाण वाढलं आहे.  National Crime Records Bureau (NCRB) ची आकडेवारी सुद्धा धक्कादायक आहे. NCRB च्या 2022 च्या आकडेवारीनुसार 83,713 विवाहित पुरुषांनी आत्महत्या केली आहे. तर विवाहित महिलांच्या आत्महत्येचं प्रमाण 30,711 इतके आहे. याचाच अर्थ काय तर विवाहानंतर येणारा ताण, आर्थिक संकट, जबाबदाऱ्या, कौटुंबिक तणाव, मानसिक घुसमट यांचा सर्वाधिक फटका पुरुषांनाच बसत आहे. ही आकडेवारी फक्त एका संख्येपूर्ती मर्यादित नाही, तर हजारो कुटुंबांचे विखुरलेले संसार आणि अदृश्य वेदनांचा परिपाठ आहे.

पुरुष खंबीर असतो, पण त्यालाही मन असतं

पुरुष कणखर असू शकतो, खंबीर असू शकतो, मेहनती असू शकतो, जबाबदार असू शकतो पण तो भावनाशुन्य कधीच नसतो. त्याच्याही मनात असंख्य कचरा असतो, मन तुटलेलं असतं, अपयशाची भीती असते आणि आधाराची सुद्धा गरज असते. पण त्याला या सर्व गोष्टी कुठेही मन मोकळ्या बोलता येत नाहीत. त्याला रडायला, बोलायला आणि मदत मागायला कोणी शिकवत नाही. स्त्रियांना खांदा देणारे अनेक असतात पण पुरुषांना खांदा देणाऱ्यांची संख्या अगदीच तुरळक आहे. 

समाजाने काही गोष्टींमध्ये पुरुषांच्या बाजूने विचार करण्याची गरज आहे आणि काही बदल सुद्धा केले पाहिजेत जसे की,  

  • भावना बाहेर काढणं ही कमजोरी नाही तर तो मानवी स्वभाव आहे.
  • मानसिक आरोग्याबद्दल खुलेपणाने पुरुषांना बोलू द्या
  • पुरुषांना रडू द्या
  • तणाव, नैराश्य, चिंता याविषयी संवाद आवश्यक आहे.
  • “तू पुरूष आहेस, काहीतरी कर” याऐवजी “मी आहे तुझ्यासोबत” असं म्हणू या
  • आधार देणं हे बळकटी देण्यासारखंच आहे.
  • कौटुंबिक आणि सामाजिक अपेक्षा कमी करा
  • पुरुष एकटा संपूर्ण जगाचे ओझे पेलणारा मशीन नाही.

पुरुष रडत नाहीत, हा समज जगभरातील लाखो पुरुषांच्या जीवावर बेतत आहे. हा गैरसमज मोडला, तर आपण अनेकांचे जीवन वाचवू शकतो. 

पुरुषही माणूस आहे. त्याच्याकडेही भावना आहेत. आणि त्यालाही आधाराची, प्रेमाची, समजुतीची गरज आहे. 

error: Content is protected !!