महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याला ऐतिहासीक महत्व आहे. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीला गडकिल्ले आणि सह्याद्रीचे अविरत प्रेम लाभले आहे. याच सह्याद्रीच्या कुशीत रुबाबात वसलेला कमळपुष्पाच्या आकाराचा कमळगड (Kamalgad fort Information In Marathi). सह्याद्रीचा फ्रीज म्हणून या किल्ल्याचा नावलौकिक जगभर आहे. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात या किल्याचे वास्तव्य पाहायला मिळतं. चहुबाजूंनी घनदाट जंगलांनी या किल्याला वेढलेल आहे. किल्ल्यावर पोहचल्यावर सह्याद्रीच डोळ्यात न मावणार रूप अनुभवता येत. कृष्णामाईच शांत आणि मनाला विसावा देणार पात्र जणू आईचीच माया देत आहे का असा भास होतो. कमळगड किल्ल्याच्या समोर पाचगणी पठार आणि त्याच्या उजवीकडे महाबळेश्वरचा केट्स पॉइंट दृष्टीस पडतो. कमळगड किल्ल्यापासूनच काही अंतरावर रायरेश्वर किल्ला आहे. तसेच नवरा नवरीचा डोंगर सुद्धा तुम्हाला या गडावरुन पहायला मिळतो.
ऐतिहासिक महत्व
किल्ल्याच्या इतिहासाबद्दल जास्त माहिती उपलब्ध नाही. उपलब्ध माहितीनुसार कमळगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात होता. या गडाचे किल्लेदार हे सेनानी पिलाजी गोळे होते. तसेच छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या काळात सुद्धा हा गड स्वराज्यात होता. हा किल्ला शिवरायांच्या स्वराज्यात होता हीच ओळख किल्ल्याच नावलौकिक वाढवण्यास कारणीभूत ठरते.
किल्ल्याची ऊंची आणि प्रकार आणि सध्याची अवस्था
समुद्रसपाटी पासून 4200 फुट उंचीवर हा गड आहे. हा गड गिरीदुर्ग प्रकारात मोडत असून या गडावर पोहचण्याचा मार्ग हा घनदाट जंगलातून असला तरी तो सोपा आहे. किल्ल्याची अवस्था ही उत्तम आहे. किल्ल्यावर पाहण्यासारखं एकच ठिकाण आहे ते म्हणजे कावेची विहीर. तलवारीच्या आकाराची ही विहीर 40 ते 50 फुट खोल आहे. विहिरीत उतरण्यासाठी उत्तम पायऱ्या आणि सुरक्षीतेच्या दृष्टीने एक दोरखंड सुद्धा आहे. दोरखंडाला धरून विहिरीमध्ये उतरता येते. तुम्ही आतमध्ये प्रवेश कराल तसे सह्याद्रीची अधभूत किमया तुम्हाला अनुभवायला मिळेल. या कावेच्या विहिरीमुळेच याला सह्याद्रीचा फ्रीज म्हंटल जात. लहान मुलांना घेऊन जाण्यासाठी हा किल्ला उत्तम आहे.
या ठिकाणी पोहचण्याचे मार्ग!
कमळगड किल्ल्यावर पोहचण्याचे तीन मार्ग आहेत. वाईतून वयगांव मार्गे एक आणि वाईतून वासोळे मार्गे एक. आणि एक मार्ग भोर मधून रायरेश्वर किल्ल्याला वळसा मारून आहे. हा रास्ता वाई-वासोळे या रस्त्याला मिळतो. वाई मधून एसटीने किंवा वडापने तुम्ही वासोळे पर्यंत सहज पोहचू शकता. वाई ते वासोळे 28km अंतर आहे. वासोळे मधील तुपेवाडी मधून कमळगड किल्याकडे जाण्यासाठी रस्ता आहे. पायवाटेने या किल्यावर पोहचण्याचा मार्ग सोप्पा आहे. किल्ल्यावर पोहोचण्यासाठी साधारण एक ते दिड तास लागू शकतो. तुमच्या चढण्याच्या क्षमतेनुसार वेळेमध्ये फरक पडू शकतो. वाई मधून दूसरा मार्ग आहे तो वयगांव मार्गे नांदगणे या गावामधून. नांदगणे किंवा त्याच्याच बाजूला असणाऱ्या बलकवडी या गावामधून सुद्धा रस्ता कमळगडच्या दिशेने जातो. या मार्गे तुम्हाला बलकवडी धरणाचे तसेच धोम धरणाचे सुंदर दृश्य पहायला मिळेल. वाई ते नांदगणे हे अंतर 28km आहे. वाईतून या नांदगणे एसटी आणि वडापची सुविधा उपलब्ध आहे. या गावामधून गडावर पोहचण्यासाठी एक ते दिड तास लागू शकतो. या ठिकानाहून गडावर जाण्याचा रास्ता हा घनदाट जंगला मधून जातो.
Tung Fort – लोणावळ्याच्या कुशीत वसलेला कठीण गड, एकदा आवर्जून भेट द्या
गडावर राहण्याची आणि जेवणाची सोय आहे का ?
गडावर जाण्याच्या वाटेतच गोरक्षनाथाच मंदिर आहे. या ठिकाणी 15 ते 20 लोकांची राहण्याची व्यवस्था होऊ शकते. गडापासून काहीच अंतरावर हे मंदिर आहे. गडावर राहण्याची कोणतीही सुविधा नाही. तसेच जेवणाची आणि पाण्याची सुविधा वरती उपलब्ध नाही. गडाच्या जवळच धनगरांच एकच घर आहे. त्या ठिकाणी पाणी तुम्हाला मिळू शकत पण शक्यतो आपल पाणी आपणच येताना घेऊन येणे उत्तम. सर्वात महत्वाचे पाणी बॉटल जर सोबत आणत असाल तर ती बॉटल कुठेही न फेकता परत बॅगमध्ये टाकून गडाखाली आल्यावर कचरा कुंडीतच टाका. गडाच्या खाली तुमची राहण्याची व्यवस्था होऊ शकते. नांदगणे या गावामध्ये तुम्ही उतरणार असाल तर तिथे आजूबाजूला ऊळुंब, गोळेवाडी आणि जोर या गावांच्या हद्दीत रिसॉर्टस आहेत.
गडाच्या आजूबाजूला असणारी काही प्रेक्षणीय स्थळ
कमळगडाच्या आजूबाजूला वाई ते वासोळे या मार्गात सुरुवातीला मेणवली घाट पहायला मिळतो. थोड पुढे आल्यावर वेलंग गावाच्या हद्दीतूण धोम धरणाला लागूनच एक रस्ता व्याहळी या गावाकडे गेला आहे. त्या दोन गावांच्या मध्ये आणि धोम धरणाच्या बाजूलाच नरसिंहाच एक पुरातन मंदिर आहे. या मंदिरात असणारी कासवाची प्रतिमा लक्ष वेधून घेते. तसच पुनः मागे जावून वेलंग वासोळे या रस्त्याने जाताना रायरेश्वर किल्याच दर्शन होत. याच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती. याच मार्गावर नवरा नवरीचा डोंगर सुद्धा तुम्हाला पहायला मिळतो. या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही. या डोंगराच दर्शन तुम्हाला रस्त्यावरूनच घ्याव लागणार आहे. आता दूसरा मार्ग वाई-नांदगणे, या मार्गावरून जाताना तुम्हाला धोम धरण लागेल, पुढे बोरीव या ठिकाणी बोटिंग, हॉर्स रायडिंग सारख्या सुविधांचा आनंद तुम्ही घेऊ शकता. याच मार्गाने पुढे जाताना मुगाव हे गाव तुम्हाला लागेल या गावात थांबून तिथे मिळणाऱ्या वडापावचा अस्वाद नक्की घ्या आणि पुढचा प्रवास सुरू करा. पुढे बलकवडी धरणाचे मनमोहक दृश्य तुमच्या नजरेस पडेल. नांदगणे या गावाच्या पुढे गेल्यावर कोंढवली हे वीर जिवाजी महाले यांच जन्मगांव तुमच्या निदर्शणास पडेल. या गावामध्ये त्यांचे वंशज आणि जिवाजी महाले यांची समाधी आहे.
Jawlya fort- दिलेरखानाला मराठ्यांनी झुंजवलं होतं, वाचा जावळ्या गडावरचा थरार…
हे ही लक्षात ठेवा
१) शक्यतो जास्त पावसाच्या वातावरणात गडावर जाणे टाळावे.
२) जर तुम्ही एसटीने प्रवास करणार असाल तर संध्याकाळी 5 वाजण्याच्या आगोदर गडावरुन खाली येण्याचा प्रयत्न करा. कारण संध्याकाळच्या वेळी वाईला जाण्यासाठी एसटी आणि वडाप सेवा उपलब्ध होत नाही.
३) गडावर जाताना आणि गडावरून खाली येताना वाटेत कोणताही कचरा करू नका.
आपला गड हि आपली ओळख आहे. त्यामुळे गड स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत कमळगड किल्ल्याची माहिती शेअर करा.