शिलाहार वंशातील दुसरा भोज हा शेवटचा व श्रेष्ठ राजा होय. त्याने सातारा जिल्ह्यात 10-12 किल्ले बांधल्याची इतिहासात नोंद आहे. त्यांपैकी सप्तर्षी (सातारा किंवा अजिंक्यतारा), वैराटगड, पांडवगड, केंजळगड आणि चंदन-वंदन (Chandan Vandan Fort) हे काही प्रसिद्ध किल्ले आहेत.
सन 1701 च्या आसपास फतेउल्लाखानाने वर्धनगड, नांदगिरी, चंदन, वंदन हे किल्ले जिंकून घेण्यासाठी हल्ले चढवले. मुघलांनी 6 जून 1701 रोजी वर्धनगड मराठ्यांकडून जिंकून घेतला. मुघलांनी त्याचे नाव सादिकगड ठेवण्यात आले. पुढे काही दिवसांतच नांदगिरीचा किल्ला मुघलांनी जिंकला व त्याचे नाव नामगीर ठेवले. यानंतर किल्ले चंदन आणि नंतर किल्ले वंदन यांना वेढा घातला गेला व 6 ऑक्टोबर 1701 रोजी मराठे किल्ला सोडून गेले. किल्ले ताब्यात घेतल्यानंतर चंदन-वंदन किल्ल्याचे सुद्धा नामांतर करण्यात आहे. यापैकी चंदन किल्ल्याचे नाव मिफ्ताह ठेवण्यात आले तर वंदन किल्ल्याचे नाव मप्तह असे ठेवण्यात आले होते.
चंदन-वंदन किल्ल्याचा इतिहास
कथा-कादंबर्या असो अथवा वास्तविक आयुष्यामध्ये जगणं असो. जुळ्या भावांविषयी तुम्ही सर्वांनीच कुठे ना कुठे ऐकलं असेलच. पण महाराष्ट्राच्या दुर्गविश्वात सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर सुद्धा जुळी भावंडे बागडताना पाहायला मिळतात. मुंगी-तुंगी, अलंग-मलंग आणि सातारा जिल्ह्यातील चंदन-वंदन (Chandan Vandan Fort) ही काही प्रसिद्ध जुळी भावंड सह्याद्रीमध्ये वसलेली आहेत. इ.स. 1191-92 सालच्या ताम्रलेखानुसार हे किल्ले शिलाहार राजा दुसरा भोज याने बांधले आहेत. अफजलखानाच्या वधानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी 1673 च्या सुमारास सातारा प्रांत जिंकून घेतला. सातारा प्रांतात त्यावेळी सज्जनगड, कल्याणगड, अजिंक्यतारा या किल्ल्यांसोबतच चंदन-वंदन हे जुळे भाऊ देखील स्वराज्यात सामील झाले. चंदन-वंदन गडाची पूर्वीची नावे शूरगड आणि संग्रामगड अशी होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी ही नावे बदलून अनुक्रमे चंदन आणि वंदन अशी केली.
छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत सन 1685 मध्ये फेब्रुवारी महिन्यात अमानुल्लाखानाने चंदन-वंदन गडावर असणाऱ्या मराठ्यांच्या तुकडीवर हल्ला केला. या हल्ल्यात मुघलांनी मराठ्यांचा पराभव करत सर्व परिसर आपल्या ताब्यात घेतला. इतिहासात केलेल्या उल्लेखानुसार गडावर तेव्हा 25 घोडी, 20 बंदुका, 2 निशाणे आणि 1 नगारा या गोष्टी होत्या. 1701 च्या आसपास मुघलांनी चंदन-वंदन किल्ल्याचे नाव मिफ्ताह आणि मफ्तह असे केले होते. पुढे छत्रपती शाहूमहाराजांनी सन 1707 मध्ये हा सर्व प्रदेश जिंकून घेतला आणि चंदन-वंदन किल्ले स्वराज्यात दाखल झाले. शाहूमहाराजांनी मिफ्ताह आणि मुफ्तह ही नावे बदलून पुन्हा चंदन-वंदन केली असावीत. सन 1752 मध्ये ताराबाईंवर लक्ष ठेवण्यासाठी बाळाजी विश्वनाथ यांनी किल्ल्यावर दादोपंत यांची नेमणूक केली होती. त्यानंतर 1818 च्या दरम्यान जुळ्या भावांची जोडी ब्रिटीशांच्या ताब्यात गेली.
गडाची उंची, प्रकार आणि सध्याची अवस्था
चंदन-वंदन किल्ला 3800 फुटांवर स्थित असून गड गिरदुर्ग प्रकारात मोडतो. चढाईची श्रेणी सुद्धा सोपी आहे. त्यामुळे नवखे ट्रेकर्स सुद्धा गडावर सहज पोहचू शकतात. तसेच गडाची सध्याची अवस्था चांगली आहे त्यामुळे गड व्यवस्थित पाहता येतो.
गडावर असणारी पाहण्यासारखी ठिकाणे
चंदन-वंदन या दोन्ही गडांवर पाहण्यासारख्या अनेक वास्तू आहेत. चंदनगडावर महादेवाची दोन मंदिरे, दगडी मिनार, दगडी चौथरा, दारूगोळा कोठार आणि शिवलींग असलेली समाधी चंदनगडावर पाहायला मिळते. या सर्व वास्तुंचा स्वतंत्र इतिहास आहे. म्हणजेच, गडावर प्रवेश करताना दोन दगडी मिनारी आपल्या स्वागताला उभ्या असल्याचा भास होतो. या दगडी मिनारी राजा भोजने उभारलेल्या आहेत. तसेच गडाच्या मध्यभागी पायापर्यंत बांधलेला दगडी चौथरा निदर्शनास येतो, तर गडाच्या नैऋत्य बाजूस दारुगोळा कोठार पाहायला मिळते. तसेच चंदनगडावर असणारी दोन शिवलिंगे असलेली महादेवाची मंदिरे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेली असल्याचे मानले जाते. गड फिरायला सुरुवात केली की, गडाच्या वायव्येस एक बुरूज लक्ष वेधून घेतो. त्या बुरूजा शेजारी एक शिवलिंग असलेली समाधी पाहायला मिळते. या समाधीच्या एका बाजूला मारुतीची प्रतिमा कोरलेली आहे.
चंदनगडावरील वास्तू पाहिल्यानंतर वंदनगडावर मराठा स्थापत्या शैलीतील एक प्रवेशद्वार आपल्या स्वागतासाठी सज्ज झालेले पाहायला मिळते. या प्रवेशद्वारावर कीर्तिचक्र आणि गणेशाची प्रतिमा कोरलेली आढळून येते. पहिल्या प्रवेशद्वारातून पुढे गेल्यावर दुसरे प्रवेशद्वार निदर्शणास येते. परंतु दुसरे प्रवेशद्वार मातीत बुजलेले आहे. या दोन मुख्य प्रवेशद्वारांव्यतिरिक्त भोजकालीन प्रवेशद्वार सुद्धा गडावर पहायला मिळते. प्रवेशद्वार पन्हाळ्यावरील प्रवेशद्वाराच्या धर्तीवर बांधण्यात आलेले आहे. याच्यावर एक शिलालेख फारशी भाषेत आणि दुसरा शिलालेख मोडी लिपीत लिहीण्यात आलेला आहे. या शिलालेखांमध्ये प्रामुख्याने यादव राजा सिंघणदेवाचा उल्लेख आढळून येतो. या वास्तूच्या उत्तरेला पुरातन तुरुंग असून याच तुरुंगात तुळाजी आंग्रेला कैद करून ठेवले असावे.
गडाच्या पूर्व आणि पश्चिमेला तटबंदीलगत खंदक बांधण्यात आलेले पहायला मिळतात. महाराणी ताराबाईंणी हे खंदक बनवून घेऊन तब्बल दोन वर्ष शाहूंशी लढाई केली होती. वंदनगडावर पायऱ्या असलेली पाच तळी होती. परंतु यापैकी चार तळी सुस्थितीत असून एक तळं बुजलेले आहे. गडाच्या पूर्वेला महादेवाचे मंदिर, तर गडाच्या वायव्येला काळुबाईचे मंदिर आहे. गडावर तीन अज्ञान वीरांच्या समाधी पाहायला मिळतात. तसेच गडावर पुरातन राजवाड्याचे अवशेष लक्ष वेधून घेतात.गडाच्या पूर्वेस आणि वायव्येस पडक्या घरांचे अवशेष सुद्धा निदर्शणास येतात. याव्यतिरिक्त गडावर एक टेकडी असून तिला बालेकिल्ला म्हटल जात. गडाच्या दक्षिणेस एक चोरवाट आहे. त्याचबरोबर गडावर पूर्वेस एक आणि दक्षिणेस एक दोन चाक नसलेल्या चुन्याच्या घाणी आहेत.
गडावर जाण्याच्या वाटा कोणत्या आहेत?
चंदन आणि वंदन या दोन्ही गडांवर जाणाऱ्या वेगवेगळ्या वाटा आहेत. पुणे-सातारा मार्गावरून गडावर जाण्यासाठी भुइंज या गावात उतरावे. भुइंजमधून 20 कि.मी अंतरावर असणाऱ्या किकली या गावाच्या दिशेने मार्गस्थ व्हावे. तस पाहायला गेले तर वाई आणि सातारा दोन्ही मार्गे किकलीमध्ये येता येत. किकलीपासून जवळ असणाऱ्या बेलमाची या गावातून खऱ्या अर्थाने गडावर जाण्याचे मार्ग सुरू होतात. या बेलमाचीचे दोन भाग असून एक खालची बेलमाची, तर दुसरी वरची बेलमाची. इथूनच एक वाट चंदन आणि वंदन यांच्या खिंडीच्या दिशेने जाते. या खिंडीच्या डावीकडे चंदनगड आणि उजवीकडे राऊत वाडीतून वंदनगडावर जाता येते. गडावर जाण्यास साधारणपणे एक ते दीड तास लागू शकतो.
गडावर जेवणाची आणि पाण्याची सोय आहे का?
गडावर जेवणाची कोणतीही व्यवस्था नाही. गडाखाली असलेल्या बेलमाची किंवा किकली या गावामध्ये जेवणाची व्यवस्था होऊ शकते. तसेच गडावर पिण्याच्या पाण्याची सोय फक्त पावसाळ्यात होऊ शकते. वंदनगडावर 4 तळी आहेत त्यापैकी तीन तळ्यांमधील पाणी हे पिण्यायोग्य आहे. तर चंदनगडावर एक विहीर असून तिच्यातले पाणी जुलै ते फेब्रुवारीपर्यंत असते. वंदनगडावर 50 ते 100 लोकांना राहता येईल एवढी जागा आहे.
हे लक्षात ठेवा
1) शक्यतो जास्त पावसाच्या वातावरणात गडावर जाणे टाळावे.
2) आपला कचरा आपली जबाबदारी आहे. त्यामुळे गडावर कचरा करू नका आणि करून देऊ नका.
3) गडावरून खाली उतरताना शक्य होईल तितका कचरा गडाखाली आणण्याचा प्रयत्न करा.
4) अतिउत्साहाच्या भरात चुकीचे धाडस करू नका.
5) पावसाळी वातावरणामध्ये लहाण मुलांना गडावर घेऊन जाणे आरोग्याच्या दृष्टीने धोक्याचे ठरू शकते.
आपले गडे हे मंदिरा समान आहेत, त्यामुळे गड स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर वेळ न दवडता आपल्या ग्रुपला किंवा मित्राला शेअर करा, हा सह्याद्री तुमची वाट पाहत आहे.
हे सुद्धा वाचा
1) Vairatgad Fort; वाईचा पाठीराखा, सतीशिळा असणारा गड