रायरेश्वर किल्ला / Raireshwar Fort Information In Marathi

छत्रपती शिवाजी महाराज म्हटल की महाराष्ट्र आणि महाराष्ट्र म्हटल की गडकिल्ले. बाप जस आपल्या मुलांच्या पाठीशी खंबीर उभा असतो तसेच या गडकिल्ल्यांच्या पाठीशी सह्याद्री उभा आहे. याच सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर शिवरायांच आणि त्यांच्या सवंगड्यांच बालपण गेल. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात आणि सह्याद्रीच्या कुशीत शिवराय खेळले, बागडले आणि स्वराज्याची शपथ सुद्धा त्यांनी या सह्याद्रीच्या कुशीतच घेतली. रायरेश्वरास (Raireshwar Fort Information In Marathi) पूर्वी रोहिडेश्वर या नावाने ओळखल जात होत. शिवरायांनी बालपणी त्यांच्या सवंगड्यांसह या भोर आणि वाईच्या खोऱ्यात बराच काळ घालवला. त्यामुळे या भागात जिजाऊंचा आशीर्वादाने आणि शिवरायांच्या सोबतीने हजार बाराशे मावळे तयार झाले.

स्वराज्याच्या पहिल्या मोहिमेचा श्री गणेश करायचा होता. रोहीडे खोर या नावाने प्रसिद्ध असणारे मावळ स्वराज्यात सामील करून घ्यायच होत. तेव्हा रोहीडे खोऱ्याचे अधिकारी होते दादाजी नरस प्रभू हेच दादाजी शिवरायांना अनुकूल झाले. त्यामुळे मावळ्यांमधला उत्साह गगनाला भिडला होता. रोहिडे खोऱ्याच दैवत असणार्या रायरेश्वराच्या दिशेने शिवरायांची आणि मावळ्यांची पावलं वळली. हातात ढाल आणि तलवार घेत संपूर्ण परिसरात हर हर महादेवचा नारा देत रायरेश्वराच्या दिशेने सर्व मावळे निघाले होते. शिवरायांसोबत कान्होजी जेधे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, सुर्याजी मालुसरे, सुर्याजी काकडे, बापुजी मुदगल, येसाजी कंक, सोनोपंत डबीर, नरसप्रभू गुप्ते असे बारा मावळातील सवंगडी त्यांच्यासोबत होते. तेव्हा शिवरायांच वय होत फक्त 16 वर्ष तारीख होती 27 एप्रिल 1645, शिवरायांनी गाभार्यात प्रवेश केला व रायरेश्वराच्या साक्षीने शिवराय आणि मावळ्यांनी स्वराज्यनिर्मितीची शपथ घेतली.

गडाची ऊंची आणि प्रकार आणि सध्याची अवस्था !

किल्ल्याची स्थिती एकदम उत्तम आहे. समुद्रसपाटी पासून 4589 फुटांवर हा गड असून हे रायरेश्वर पठार 17 ते 18 किलोमीटर मध्ये पसरलेले आहे. हा गड गिरीदूर्ग प्रकारात जरी मोडत असला तरी गड चढायला खूपच सोप्पा आहे. उत्तम स्थीतीमध्ये असणाऱ्या लोखंडी शिडीमुळए लहान मूल तसेच वयस्कर लोकं सुद्धा गडावर सहज येऊ शकतात.

गडावर राहण्याची आणि जेवणाची सोय आहे का ?

रायरेश्वर पठारावर जंगम लोकांची 40 ते 45 कुटुंब वास्तव्याला आहेत. त्यामुळे जेवणाची आणि राहण्याची उत्तम सुविधा या ठिकाणी उपलब्ध होऊ शकते.

गडावर पाहण्यासारखी काही प्रेक्षणीय स्थळे !

लोखंडी पायऱ्या चढून वरती आलात की डाव्या बाजूला वाई तालुक्याच सुंदर दृश्य नजरेस पडत, धोम धरणाचा विलोभनीय परिसर डोळ्याच पारण फेडून जातो. तर उजव्या बाजूला भोर तालुक्याच निसर्ग सौंदर्य पहायला मिळतं. याच ठिकाणी गडावरील पाहण्यासारखी कोणती स्थळ आहेत याची माहितीपर पाटी लावण्यात आली आहे. त्या पाटीवर पहिलं नाव आहे धानदारा म्हणजेच ज्या शिडीने तुम्ही गडावर आलात त्या वाटेच हे नाव आहे.गडावर येण्यासाठी अजून एक वाट आहे तीच नाव आहे गायदरा. गुर गडावर आणण्यासाठी या वाटेचा वापर गडावर राहणारी जंगम लोक करतात. याच पाटीपासून सरळ पॉवरब्लॉकची चांगली पायवाट सुरू होते. हीच पायवाट तुम्हाला शिवमंदिराकडे घेऊन जाईल हे तेच शिवमंदिर आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती.

शिवमंदिराकडे जाणाऱ्या पायवाटेदरम्यान दोन स्थळ लक्ष वेधून घेतात पहिलं तर पायवाटेला लागूनच एक पाण्याने भरलेले तळ तुमच लक्ष वेधून घेईल. याच वाटेने पुढे गेल्यावर गोमुख खिंड तुमच्या नजरेस पडेल या गोमुखातून वर्षाचे बाराही महीने शुद्ध पाण्याचा प्रवाह सुरू असतो. गडावरील लोक याच पाण्याचा पिण्यासाठी वापर करतात, तुम्ही सुद्धा या पाण्याचा नक्की आस्वाद घ्या आणि शिव मंदिराकडे मार्गस्थ व्हा. इथून पुढची पायवाट थेट शिव मंदिराच्या चरणी थांबते. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी पायावर पाणी ओतून घ्या आणि नंतरच आतमध्ये प्रवेश करा. मंदिराच्या बाजूला एक छोटा शेड आहे या ठिकाणी आराम करण्यासाठी आणि बसायची सुद्धा सुविधा आहे. तसेच या शिव मंदिरंपासून सात रंगांची माती, पांडवकलीन लेणी, अस्वलखिंड (नाकींदा) ही पाहण्यासारखी स्थळ थोडी लांब आहेत. त्यामुळे या ठिकाणी जाताना गावातील एखाद्या जाणकार व्यक्तीला सोबत घ्या, एकटे जाण्याचे धाडस करू नका. अस्वलखिंड किंवा नाकींदा हे गडाच शेवटच टोक आहे. या ठिकाणाहून रायगड, प्रतापगड, तोरणा, राजगड, पाचगणी, महाबळेश्वर, सिंहगड, लिंगाणा ई ठिकाण पाहायला मिळतात. ही सर्व ठिकाणे वातावरण शांत आणि धुक नसेल तर स्पष्टपणे नजरेस पडतात.

गडाच्या आजूबाजूला असणारी काही प्रेक्षणीय स्थळ !

जर तुम्ही वाई मार्गे येणार असाल तर सुरुवातीलाच वाईचा ढोल्या गणपती तुमच्या नजरेस पडेल त्याच रस्त्याने पुढे आल्यावर मेणवली गावात मेणवली घाट तुम्हाला पाहायला मिळेल. या घाटावर असणारा नंदी आणि मोठी घंटा लक्ष वेधून घेते. बऱ्याच मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये हा घाट तुम्ही पाहिला असेल. वाई रायरेश्वर रस्त्याला वाटेत तुम्हाला नवरा-नवरीचा डोंगर निदर्शनास येईल या डोंगरावर जाण्यासाठी कोणताही रस्ता उपलब्ध नाही. त्यामुळे या ठिकाणी जाण्याच धाडस करू नका. तसेच धोम धरणाला लागूनच एक पुरातन नरसिंहाच मंदिर आहे. या ठिकाणी असणाऱ्यां भव्य कासवाची प्रतिकृति लक्ष वेधून घेते. या ठिकाणाला नक्की भेट द्या. खावली गावातून पुढे गेल्यावर एक रस्ता रायरेश्वराच्या दिशेने गेला आहे तर एक रास्ता खालच्या बाजूने गेला आहे. हा खालचा रस्ता तुम्हाला जांभळी बंधाऱ्याकडे घेऊन जाईल. खावली गावापासून कमळगड किल्ला २३ किलोमीटरवर आहे. प्रथम रायरेश्वर किल्ला करून आल्यावर कमळगड किल्ल्याच्या आजूबाजूला बरेच रिसॉर्ट राहण्यासाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे एक रात्र मुक्काम करून दुसऱ्या दिवशी कमळगड किल्ल्याच दर्शन सुद्धा तुम्ही घेऊ शकता. अधिक माहिती साठी तुम्ही पुढील ब्लॉग वाचू शकता रिसॉर्टस इन वाई आणि कामळगड किल्ला.

जर तुम्ही पुणे-मुंबई वरून भोर मार्गे रायरेश्वरला येणार असाल तर तुम्हाला झुलत्या पुलाच दर्शन होईल. या पूलावरून पुढे गेल्यावर सुरुवातीला पंत सचिवांच्या समाधीच दर्शन होईल आणि पुढे गेल्यावर गावात कान्होजी जेधे आणि जिवा महाले यांची समाधी पहायाला मिळेल. तसेच पुरातन शिव मंदिर सुद्धा या ठिकाणी आहे.

या ठिकाणी पोहचण्याचे मार्ग !

या ठिकाणी पोहचण्याचे दोन मार्ग आहेत एक मार्ग पुणे मुंबई वरून येणाऱ्या लोकांसाठी भोर मार्गे. दूसरा मार्ग सातारा कोल्हापूर वरून येणाऱ्या लोकांसाठी वाई मार्गे दोन्ही मार्ग उत्तम आहेत. शक्यतो रायरेश्वरला येण्यासाठी स्वत:ची गाडी असावी कारण एसटी या ठिकाणी येत नाही. कठीण असा घाटाचा रस्ता आहे. काही वळण जास्त धोकादायक आहेत. दुचाकी, चारचाकी तसेच टेम्पो ट्रॅवलर या ठिकाणी येवू शकतो.

हे ही लक्षात ठेवा !

१) जेवणाची राहण्याची उत्तम सोय गडावर आहे.
२) उन्हाळा, पावसाळा, हिवाळा तिन्ही ऋतुं गडावर येण्यासाठी उत्तम आहेत.
३) गडावर शिव मंदिरापासून इतर पाहण्यासारखी ठिकाण आहेत. गडावरील जंगम लोकांची वस्ती आहे त्यांच्यापैकी एखाध्या जाणकार व्यक्तीला सोबत घेऊनच ती ठिकाण पाहण्यासाठी जाणे योग्य राहिल, कारण गड मोठा असल्यामुळे एकटे जाण्याच धाडस करू नका.
४) गड आपला आहे त्यामुळे गडावर घाण करून नका.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली ही कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि आयुष्य खूप सुंदर आहे त्याला अजून सुंदर बनवा.

,
,

Leave a comment