इतिहासाच्या पानांवर सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्याचं नावं सुवर्ण अक्षरांनी लिहीण्यात आले आहे. आजही इतिहासाच्या पाऊलखुणा वाईमध्ये आढळून येतात. वाईला प्रामुख्याने मंदिरे, गडकिल्ले, कृष्णा नदी आणि सह्याद्रीची विस्तीर्ण रांगेने वेढलेले आहे. वाई व खंडाळा तालुक्यांदरम्यान शंभु महादेव डोंगर रांगांमध्ये येरूळी, वेरूळी, मांढरदेव, बालेघर, धामणा आणि हरळी या प्रमुख डोंगरांचा समावेश आहे. याच शंभु महादेवाच्या डोंगर रांगेमध्ये केंजळगड आणि पांडवगड (Pandavgad Fort) हे दोन किल्ले सह्याद्रीच्या कुशीत वसलेले आहेत. वाईपासून वायव्येस केंजळगड, तर उत्तरेस पांडवगड आहे. विराटनगरी वाईचा पहारेकरी अशी या पांडवगडाची ओळख. याच पांडवगडाचा इतिहास तुमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी हा ब्लॉग, त्यामुळे संपूर्ण ब्लॉग आवर्जून वाचा आणि जास्तीत शेअर करा.
पांडवगडाचा इतिहास
पांडवगडाच्या इतिहासात डोकावलं तर आपण थेट इसवी सन 1178 ते 1193 च्या काळामध्ये जातो. कोल्हापूर-पन्हाळा आणि दख्खनच्या भागावर चालुक्य घराण्याचं राज्य होतं. चालुक्यांच्या राज्यानंतर शिलाहारांनी हा प्रदेश काबीज केला. 1191-92 मधील ताम्रपटांमध्ये केलेल्या उल्लेखानुसार शिलाहार राजा दुसरा भोज याने पांडवगड बांधला. काही काळ पांडवगडावर शिलाहार घराण्याचे वर्चस्व होते. त्यानंतर हा किल्ला आदिलशाहीने आपल्या ताब्यात घेतला. 1673 मध्ये पांडवगड मराठ्यांनी जिंकून घेतला. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा 6 जून 1674 मध्ये राज्याभिषेक झाला, तेव्हा पांडवगड स्वराज्यात सामील होता. त्यामुळे पांडवगड छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा साक्षीदार आहे, असं म्हटल तर चुकीचे ठरणार नाही.
1673 ते 1701 या काळात पांडवगड स्वराज्यात सामील होता. या कालखंडामध्ये पांडवगडाचे गडकरी म्हणून सरनौबत पिलाजी गोळे यांची शिवरायांनी नियुक्ती केली होती. 1699 पर्यंत पिलाजी गोळे यांच्या खास पथकाने गडाची सेवा केली, मात्र 1701 मध्ये मुघलांनी गड त्यांच्या ताब्यात घेतला. मुघलांकडून थोरल्या शाहू महाजारांनी 1709 च्या आसपास गड पुन्हा स्वराज्यात आणला, तशी नोंद इतिहासात आढळून येते. अखेर ब्रिटिश अधिकारी मेजर थॅचरने 1818 मध्ये पांडवगड त्यांच्या ताब्यात घेतला.
गडाची उंची, प्रकार आणि सध्याची अवस्था
पांडवगडाची उंची समुद्र सपाटीपासून 4158 फूट इतकी आहे. गडाची श्रेणी मध्यम स्वरुपाची असून गड गिरिदुर्ग प्रकारात मोडतो. गडाची अवस्था म्हणावी इतकी चांगली नाही, भग्न अवस्थेमध्ये गडावर मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात गडावर मोठ्या प्रमाणात गवताचे साम्राज्य पाहायला मिळते.
गडावर असणारी पाहण्यासारखी ठिकाणे
गडावर जाण्याच्या दोन वाटा असल्यामुळे दोन्ही बाजूने वेगवेगळ्या अँगलने गड पाहता येतो. मेणवलीमार्गे गडावर आल्यानंतर गडाच्या माथ्याजवळ काही पायऱ्यांचे अवशेष लक्ष वेधून घेतात. गडाचा दरवाजा उद्ध्वस्त झालेल्या अवस्थेमध्ये आहे. तिथून थोडे वरती आल्यानंतर, ‘प्रायव्हेट प्रॉपर्टी.. परवानगीशिवाय प्रवेश करू नये” अशी एक पाटी झाडाला लटकेली तुमच्या निदर्शनास येईल. त्याचे कारण असे की, शेर वाडिया नावाच्या एका पारशी व्यक्तीने माचीवरील जमिनीचा एक तुकडा विकत घेतला असून त्यांनी स्वत:साठी इथे एक बंगला सुद्धा बांधला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 20 ते 25 वर्षांपासून ते गडावर राहत आहेत आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात गडावर झाडे सुद्धा लावली आहेत. तसेच गडावर धूम्रपान किंवा कचरा करू नये अशा आशयाची पाटी सुद्धा लावली आहे.
या माचीवरून पुढे आल्यानंतर दोन पाण्याच्या टाक्या लागतात. तसे पाहता गडावर एकूण 10 ते 15 पाण्याच्या टाक्या आहेत. तसेच दोन मोठी पाण्याची तळी सुद्धा आहेत. बालेकिल्ल्याच्या दिशेने जाताना एक चांगल्या अवस्थेमध्ये असणारा बुरूज, त्याला लागून कड्याच्या समांतर प्रवेशद्वाराची कमान आणि त्याला खेटून काही अंतरापर्यंत चिरेबंदी आहे. तसे पाहता पांडवगडाला चहुबाजूंनी ताशीव खोल कडे आहे. त्यामुळे तटबंदीची जिथे आवश्यकता आहे, तिथेच तटबंदी बांधलेली पाहायला मिळते.
बालेकिल्ल्यावर आल्यानंतर सर्वात प्रथम मारूती रायाचे दर्शन होते. वीर भाव प्रकट केलेल्या या बजरंगाच्या हातात कट्यारीसारखे एक हत्यार पाहायला मिळते. मारुती मंदिराच्या पुढे चुन्याचा घाणा पाहायला मिळतो. इथून पुढे काही अंतरावर गडदेवता पांडजाई देवीचे मंदिर आहे. मुळ मंदिर पडलेले आहे, पण त्याचे जोते अजूनही शिल्लक आहेत. दुर्दैवाने देवीच्या मुर्तीची सुद्धा झीज झालेली आहे. मंदिरासमोर शिवलिंग, नंदी, पादुका, वीर पुरुषाची एक मुर्ती आणि काही शिल्पांच दर्शन होते. गडाच्या मध्यभागी आल्यानंतर अनेक ठिकाणी शिबंदीची घरे निदर्शणास येतात. तसेच दारुगोळ्याची कोठारे आणि दक्षिणेकडील तलाव सुद्धा या ठिकाणी पाहता येतो.
गडावरून चहुबाजूंनी नजर फिरवल्यास गडाच्या उत्तरेला मांढरदेवीची डोंगररांग आणि डोगररांगावर असणारे मांढरदेवीचे देवस्थान नजरेस पडते. गडाच्या दक्षिणेला पाचगणी आणि महाबळेश्वर ही थंड हवेची ठिकाणे लक्ष वेधून घेतात. तर गडाच्या पूर्वेला खंबाटकी घाटाचा विस्तीर्ण डोंगर, डोंगरापलीकडे नांदगिरी, चंदन-वंदन, वैराटगड थाट मानेने उभे असल्याचा भास होतो. तसेच गडाच्या पश्चिमेला केंजळगड आणि कमळगड आपल्याला साध घालताना पाहायला मिळतात. या चारही दिशांच्या मधोमध लक्ष वेधून घेते ते म्हणजे संत वाहणाऱ्या कृष्णामाईचे पात्र. तस पाहायला गेलं तर सर्व गड फिरण्यास अंदाजे दीड ते दोन तास लागू शकतो.
गडावर जाण्याच्या वाटा कोणत्या आहेत?
पांडवगडावर जाण्याच्या प्रामुख्याने दोन वाटा आहेत. एक वाट वाईजवळ असणाऱ्या मेणवली गावातून गडावर गेली आहे, तर दुसरी वाट वाई-मांढरदेव मार्गावर असणाऱ्या धावडी गावाच्या हद्दीतून गडावर गेली आहे. मुंबई, पुणे आणि कोल्हापूरवरून येणाऱ्या नागरिकांसाठी वाई हे मध्यवर्थी ठिकाण आहे.
वाई-मेणवली-पांडवगड
वाईतून मेणवलीला येण्यासाठी एसटी किंवा जीप (स्थानिक भाषेत वडाप) पकडून तुम्ही मेणवलीमध्ये येऊ शकता. मेणवली गावात आल्यानंतर गावातील कोणताही व्यक्ती तुम्हाला पांडवगडावर जाण्याचा रस्ता दाखवून देईल. मेणवली गावातून गडावर जाण्यास अंदाजे एक ते दीड ताल लागू शकतो.
वाई-धावडी मार्गे पांडवगड
वाईपासून सात किलोमीटर अंतरावर धावडी हे गाव आहे. पांडवगडावर जाण्यासाठी धावडी गावात जाण्याची गरज नाही. धावडी गावाचा फाटा जिथे लागतो त्याला मागे टाकून पुढे मांढरदेवच्या दिशेने अर्धा किलोमीटर पुढे गेल्यानंतर, पांडवगडाला लागून काही घरे आहेत. या घरांच्या शेजारून एक वाट पांडवगडावर जाते.
(टीप- वाईवरून पांडवगडावर जाण्यासाठी मेणवली गावातून जाणारी वाट सोईस्कर आहे.)
गडावर जेवणाची आणि पाण्याची सोय आहे का?
गडावर पाण्याची टाकी असल्यामुळे पिण्याच्या पाण्याची सोय होऊ शकते. पण पाणी किती स्वच्छ आहे त्यावर ते अवलंबून आहे. त्यामुळे शक्यतो गडावर जाताना पिण्याचे पाणी सोबत घेऊन जावे. तसेच गडावर जेवणाची कोणतीही सोय नाही. त्यामुळे आपली सोय आपणचं करावी. दुसरी गोष्ट गडावर राहण्याची सुद्धा कोणतीही सोय नाही. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात गडावर मोठ्या प्रमाणात गवत असल्यामुळे शक्यतो गडावर राहणे टाळावे.
हे लक्षात ठेवा
1) जास्त पावसाच्या वातावरणात गडावर जाणे टाळावे.
2) आपला कचरा आपली जबाबदारी आहे. त्यामुळे गडावर कचरा करू नका आणि करून देऊ नका.
3) गडावरून खाली उतरताना शक्य होईल तितका कचरा गडाखाली आणण्याचा प्रयत्न करा.
4) अतिउत्साहाच्या भरात चुकीचे धाडस करू नका.
5) पावसाळी वातावरणामध्ये लहाण मुलांना गडावर घेऊन जाणे आरोग्याच्या दृष्टीने धोक्याचे ठरू शकते.
आपले गडे हे मंदिरा समान आहेत, त्यामुळे गड स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर वेळ न दवडता आपल्या ग्रुपला किंवा मित्राला शेअर करा, हा सह्याद्री तुमची वाट पाहत आहे.
आवर्जून वाचावे असे काही
1) Vairatgad Fort; वाईचा पाठीराखा, सतीशिळा असणारा गड
2) कमळगड किल्ला/Kamalgad fort Information In Marathi
3) रायरेश्वर किल्ला / Raireshwar Fort Information In Marathi