Lakhpati Didi Yojana – ग्रामीण महिलांना उंच भरारी घेण्यास मदत होणार! आर्थिक स्वावलंबनाचा नवा मार्ग, जाणून घ्या एका क्लिकवर

ग्रामीण भागातील महिलांनी गेल्या काही वर्षांमध्ये चांगली प्रगती केली आहे. विविध क्षेत्रांमध्ये महिला आपल्या नावाचा डंका वाजवत आहेत. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेविका, आशा वर्कर्स, महिला बचत गट अशा विविध पदांवर कार्य करताना महिलांना एकमेकींच्या सोबतीने आपापला विकास करण्यास प्राधान्य दिलं आहे. फक्त स्वत:पुरता विचार न करता गावाच्या विकासातही महिलांचा खारीचा वाटा आहे. ग्रामीण भागामध्ये राहून आपल्या मुलांना सुद्धा दर्जेदार शिक्षण देण्यासाठी महिला प्रयत्नशील आहेत. परंतु या सर्व गोष्टी करत असताना त्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. अशा वेळी सरकारच्या माध्यमातून आर्थिक मदत जर मिळाली तर, बऱ्याच गोष्टी या सोप्या होऊन जातात. ग्रामीण भागातील महिलांना आधार देण्यासाठी सरकारने काही योजना सुरू केल्या आहेत. परंतु बऱ्याच जणांना त्या बद्दल माहिती नाही. अशीच एक योजना म्हणजे Lakhpati Didi Yojana होय. 

केंद्र सरकारने 2023 साली सुरू केलेली लखपती दीदी योजना ही ग्रामीण भारतातील महिलांना स्वयंपूर्ण आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. या योजनेचा उद्देश आहे, स्वयं-सहायता गटातील (SHG) महिलांना वार्षिक किमान 1 लाख रुपये उत्पन्न मिळवता यावे, यासाठी त्यांना विविध व्यवसायांमध्ये प्रशिक्षण, आर्थिक मदत आणि मार्केटिंग करण्यासाठी आधार देणे हा आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना विविध क्षेत्रांमध्ये उंच भरारी घेण्यास मदत होऊ शकते. चल त्याची सविस्तर आणि तुम्हाला समजेल अशा पद्धतीने थोडक्यात माहिती जाणून घेऊ. 

काय आहे लखपती दीदी योजना

लखपती दीदी योजनेच्या माध्यमातून 2025 पर्यंत देशभरात 2 कोटी महिलांना लखपती बनवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. ग्रामीण विकास मंत्रालयाच्या माहितीनुसार, योजनेची अंमलबजावणी जोरात सुरू असून, अनेक राज्यांमध्ये हजारो महिलांनी या योजनेच्या माध्यमातून उद्योजकतेची वाट पकडली आहे.

योजना कशी कार्य करते?

लखपती दीदी योजनेत सहभागी महिला स्वतःचा छोटा उद्योग सुरू करू शकतात – उदा. अन्न प्रक्रिया, हस्तकला, ब्यूटी पार्लर, कपड्यांचे उत्पादन, दुग्ध व्यवसाय, शेतीपूरक व्यवसाय (मशरूम शेती, मधमाशी पालन), इ.
त्यांना प्रशिक्षण, कच्चा माल, मशीनरी, बँक कर्ज (मुदत माफक व्याजदरावर) आणि विक्रीसाठी मदत केली जाते. जिल्हा आणि तालुका स्तरावर महिला बचत गटांना सक्षम बनवण्यासाठी स्थानिक प्रशासन देखील मदतीला असते.

(लखपती दीदी योजनेच्या माध्यमातून साताऱ्याच्या अंजना शंकर कुंभार यांनी दमदार कामगिरी केली आहे.)

या योजनेचे उद्दिष्ट

  • महिलांना आर्थिक स्वावलंबनाची संधी देणे
  • SHG गटांद्वारे महिला उद्योजकता वाढवणे
  • ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी करणे
  • ‘वोकल फॉर लोकल’ संकल्पना बळकट करणे

यशोगाथा

देशातील अनेक राज्यांमध्ये लखपती दीदी योजना राबवली जात असून, महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्यप्रदेश, झारखंड, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये महिलांनी लघुउद्योगांमध्ये यश मिळवले आहे. काही महिला दरमहा 10,000 ते 15,000 रुपये कमवू लागल्या आहेत.

अधिक माहिती कुठून मिळेल?

  • ग्रामपंचायत किंवा ब्लॉक स्तरावरील NRLM कार्यालयात संपर्क करा
  • नजदीकी सखी/SHG गट यांच्याशी संवाद साधा
  • rural.nic.in किंवा nrlm.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या

ही योजना केवळ आर्थिक सहाय्य देत नाही, तर महिलांमध्ये आत्मविश्वास, निर्णयक्षमतेची भावना आणि समाजातील स्थान यामध्येही वाढ करते. ‘लखपती दीदी’ आता केवळ एक योजना नसून, ग्रामीण भारतात महिलांच्या सशक्तीकरणाचे एक बळकट माध्यम बनली आहे.

Pradhan Mantri Fasal Bima Yojana योजनेमुळे शेतकऱ्यांना काय फायदा होतो? सोप्या शब्दांत समजून घ्या; गरजेचं आहे