महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कॅबीनेटमध्ये मंत्री, बीड परळीकरांच्या ह्रदयातील ताईत, महायुतीचे शिल्पकार स्वर्गीय Gopinath Munde यांनी महाराष्ट्राचा लोकनेता म्हणून आपला नावलौकीक संबंध देशभर निर्माण केला. मुख्यमंत्री होण्याचं त्यांच स्वप्न त्यांनी अनेकवेळा बोलून दाखवलं मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळं होतं. एका भयंकर अपघातात गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाले आणि महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही भरून निघणार नाही अशी पोकळी निर्माण झाली. Maharashtra Assembly Election 2024 च्या अनुषंगाने महाराष्ट्राच्या राजकारणातील या हरहुन्नरी नेत्याची आठवण येणं साहजिक. त्यामुळेच हा विशेष ब्लॉग आवर्जून वाचा
प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे ही जोडगळी महाराष्ट्राच्या राजकारणात विशेष लोकप्रीय होती. अगदी शालेय जीवनापासून दोघे एकत्र होते. पुढे एकाच पक्षासाठी काम करत असताना त्यांनी कशाचीही पर्वा न करता पक्ष वाढीसाठी अहोरात्र मेहनत घेतली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भाजपची पाळेमुळे खोल रुजवणारा नेता म्हणून गोपीनाथ मुंडे यांना ओळखलं जातं. वाटाघाटीचे राजकारण करण्यात प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे दोघंही माहीर होते. त्यामुळे गोपीनाथ मुंडे यांना महायुतीचे आणि प्रमोद महाजन यांना युतीचे शिल्पकार असं म्हटल जातं.
विरोधी पक्षातील विलासराव देशमुख यांच्या सोबत असणारी त्यांची मैत्री अनेकवेळा चर्चेचा विषय ठरली. मात्र, राजकारणापलीकडे माणुसकी जपणारा नेता म्हणून गोपीनाथ मुंडे यांची ओळख होती. त्यामुळे विरोधी पक्षातील नेत्यांशीही त्यांचे सलोख्याचे संबंध होते. पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी गोपीनाथराव मुंडे यांचा उल्लेख लोकनायक असा केला होता.
पंढरीचा वारकरी
राजकारणाची एक टक्काही पार्श्वभुमी नसलेल्या गोपीनाथराव मुंडे यांचा जन्म बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील नाथ्रा या गावी भाराताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दोन वर्षांनी म्हणजेच 12 डिसेंबर 1949 रोजी झाला. वडील पांडुरंग आणि आई लिंबाबाई मुंडे या वारकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. त्यामुळे वारकरी संप्रदायाची पाळेमुळे गोपीनाथराव मुंडे यांच्या अतंर्मनात खोलवर रुजली होती. आई-वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत गोपीनाथ मुंडे यांनी वयाच्या 14 व्या वर्षी पहिल्यांदा पंढरपूरची वारी पायी जाऊन पूर्ण केली. सावळ्या विठुरायाला पाहण्याची त्यांची आस इथून पुढे सात वर्ष कायम राहिली. देवधर्माची आवड असणाऱ्या आई-वडिलांमुळे गोपीनाथरावांनी बालवयात अनेक मंदिरांना भेट दिली. मराठवाड्यातील प्रसिद्ध भगवानगडाचे महंत श्री संत भगवानबाबा गडकर महाराज यांच्या किर्तनाला जेव्हा गोपीनाथराव जाऊ लागले, तेव्हा त्यांच्या मनावर भगवान बाबांच्या आध्यात्मिक प्रवचनाचा खोलवर परिणाम झाला.
सर्व काही सुरळीत सुरू होते. मात्र, 1969 साली वडील पांडुरंग यांचे निधन झाले. घरची परिस्थिती पहिलीच बेताची होती. त्यात वडीलांच्या अचानक जाण्यामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आणि आर्थिक संकटांचे ढग डोक्यांवर घिरट्या घालू लागले. अशाही परिस्थितीत आई व थोरले बंधु पंडितअण्णा मुंडे यांनी गोपीनाथरावांच्या शिक्षणामध्ये कोणताही खंड पडू दिला नाही. पंडितअण्णा यांनी आपल्या शिक्षणाचा त्याग केला आणि भावाचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतली.
प्रमोद महाजन यांच्याशी मैत्री आणि आयुष्याला कलाटणी
वडील बंधु पंडितअण्णा गोपीनाथरावांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहीले होते. त्यामुळे गोपीनाथ मुंडे यांच्या शिक्षणात खंड पडला नाही. गोपीनाथ मुंडे यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हापरिषदेच्या शाळेत पूर्ण झाले. त्यानंतर पदवीचे शिक्षण अंबेजोगाई येथील योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयामध्ये वाणिज्य शाखेत झाले. महाविद्यालयीन जीवनात गोपीनाथरावांर संघाच्या विचारांचा प्रभाव झाला होता.
स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयाचे प्राचार्य बी.के.सबनीस यांच्या छत्रछायेखाली प्रमोद महाजन आणि गोपीनाथराव मुंडे या जोडगोळीचा उदय झाला. याच काळात गोपीनाथरावांनी बीडमध्ये महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना विद्यार्थी संसदेच्या निवडणुका लढवून राजकारणाचा श्री गणेशा केला. प्रमोद महाजनही त्यांच्या जोडीला होते. कालांतराने पुढील शिक्षण घेण्यासाठी गोपीनाथरावांनी पुणे गाठले. मात्र महाविद्यालयीन जीवनात प्रमोद महाजन यांच्याशी झालेली त्यांची मैत्री राजकीय आणि सामाजिक आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. 21 मे 1978 रोजी गोपीनाथरावांचे लग्न आपले मित्र प्रमोद महाजन यांची बहीण प्रज्ञा महाजन यांच्याशी झाले. गोपीनाथ मुंडे यांना तीन मुले असून पंकजा मुंडे, प्रतीम मुंडे आणि यशश्री मुंडे अशी त्यांची नावे आहेत.
राजकीय कारकीर्द
गोपीनाथराव मुंडे यांची राजकीय कारकीर्द प्रमोद महाजन यांच्या सोबतीनेच सुरू झाली. मुंडे-महाजन या जोडीने आधी जनसंघ आणि त्यानंतर भाजपचा झंझावाती प्रचार महाराष्ट्रभर केला. आज पक्षाची पाळेमुळे ग्रामीण भागात जी काही घट्ट झाली आहेत, त्याचे सर्व श्रेय गोपीनाथराव मुंडे आणि प्रमोद महाजन यांना दिले जाते. त्या काळात या जोडीने पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यासह सर्व महाराष्ट्रात दौऱ्यांचा सपाटा लावला होता. त्यांनी अनेक आंदोलनांमध्ये आपला सहभाग नोंदवला, नामांतराच्या आंदोलनात तरुंगवासाची हवा सुद्धा खालली.
गोपीनाथराव यांच्या राजकीय कारकिर्दीला 1978 साली सुरुवात झाली. त्यांनी सर्वप्रथम अंबेजोगाई तालुक्यातील उजनी गटातून जिल्हा परिषदेच्या निवडणूक लढवली. 1980 साली गोपीनाथराव पहिल्यांदा रेणापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर पुढील दोन्ही पंचवार्षीक विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपली विजयी परंपरा कायम ठेवली. 1990 आणि 1995 मध्ये त्यांनी आपली सत्ता कायम ठेवली. त्यांच्या कामाचा धडाका पाहून त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या कालंराणे सोपण्यात आल्या.
सर्वप्रथम 1980 ते 82 च्या दरम्यान भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष व त्यानंतर भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पदावर त्यांची वर्णी लागली. गोपीनाथरावांचा राजकीय धडाका असाच सुरू होता. जेव्हा राज्यात युतीची सत्ता आली, तेव्हा राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची माळ गोपीनाथरावांच्या गळ्यात पडली. 14 मार्च 1995 रोजी त्यांनी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. 1995 ते 1999 या काळात त्यांनी आपली जबाबदारी चोख पार पाडली. उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी आपली कारकीर्द गाजवली.
1985 साली गोपीनाथरावांना पहिला धक्का बसला. विधानसभा निवडणुकीत गेवराई मतदारसंघात कांग्रेसचे पंडीतराव दौंड यांनी गोपीनाथ मुंडे यांचा पराभव केला. गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय जीवनातील हा पहिला आणि शेवटचा पराभव ठरला. त्यानंतर राजकीय आखाड्यात त्यांनी आपलं नाणं खणखणीत वाजवलं. 1987 साली भाजपच्या इतिहासातील सर्वात मोठा मोर्चा गोपीनाथरवांनी काढला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून त्यांनी काढलेला कर्जमुक्ती मोर्चा ऐतिहासिक ठरला. शासनाला कर्जमुक्ती करण्यास त्यांनी भाग पाडले.
2009 साली लोकसभा निवडणूक लढवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. बीड लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढली आणि जिंकले सुद्धा. या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रमेश कोकाटे यांचा 1 लाख 40 हजार 952 मतांनी पराभव केला. या निवडणुकीत गोपीनाथरावांच्या कन्या पंकजा मुंडे यांनी प्रचाराचा धडाका लावून वडीलांच्या विजयाची महत्त्तवाची भूमिका पार पाडली.
राज्याच्या राजकारणातील काही मोजक्या नेत्यांमध्ये स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांनी आपल्या 35 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक चढउतार पाहिले. यशंतराव चव्हान, वसंतदादा पाटील, बाळासाहेब ठाकरे, विलासराव देशमुख, आर आर पाटील या मातब्बर नेत्यांच्या यादीत गोपीनाथराव मुंडे यांचे नाव आदराने घ्यावे लागते.
Discover more from मराठी चौक विशेष
Subscribe to get the latest posts sent to your email.