Maharashtra Kesari 2026 – महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यात दिग्गजांचा जलवा; जखमी सिकंदरचा झंझावाती इशारा!

‘महाराष्ट्र केसरी’ (Maharashtra Kesari 2026) स्पर्धेच्या आखाड्यात दुसऱ्या फेरीत माजी विजेत्यांनी आपला दबदबा ठळकपणे दाखवून दिला. हर्षवर्धन सदगीर, पृथ्वीराज पाटील, सिकंदर शेख, शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ या दिग्गज मल्लांनी आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करत सहज पुढची फेरी गाठली. पाचही मल्ल पुन्हा एकदा जेतेपदावर नाव कोरण्याच्या निर्धाराने मैदानात उतरल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले.

गादी विभागातही अनुभवी मल्लांचा वरचष्मा पाहायला मिळाला. पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळने धाराशिवच्या धीरज बारस्करवर 12-2 अशी एकतर्फी मात करत दमदार सुरुवात केली. शिवराज राक्षेने श्रेयस होळकरला 10-0 ने पराभूत करत आपली आक्रमक शैली दाखवून दिली. त्याचप्रमाणे पृथ्वीराज पाटीलने सत्पाल शिंदेवर 10-0 ने विजय मिळवत आपली ताकद अधोरेखित केली, तर हर्षवर्धन सदगीरने वेताळ शेळकेला 8-1 ने हरवत पुढील फेरीत प्रवेश केला.

दरम्यान, सिकंदर शेखने जखमी अवस्थेतही दाखवलेली जिद्द विशेष ठरली. लढतीदरम्यान नाकाला दुखापत होऊनही त्याने हार मानली नाही आणि पुण्याच्या मनीष रायतेवर 8-2 अशी मात करत जोरदार पुनरागमन केले. त्याच्या या लढवय्या वृत्तीला प्रेक्षकांनी दाद दिली असून, यंदाच्या स्पर्धेत तो विजेतेपदाचा प्रबळ दावेदार ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

error: Content is protected !!