RR PATIL – अजित पवारांच्या वक्तव्यामुळे आर आर आबांचे नाव चर्चेत, वाचा सविस्तर…

महाराष्ट्राच्या राजकारणात काही मोजक्या नेत्यांनी आपली कारकीर्द गाजवली. त्यामुळे निवडणूक विधानसभेची असो अथवा लोकसभेची, त्यांच्या नावाची चर्चा हमखास होते. Maharashtra Assembly Election 2024 प्रचारा दरम्यान ‘आबांनी माझा केसाने गळा कापण्याचा प्रयत्न केला, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आणि राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा आर आर आबांच्या (RR PATIL) नावाची चर्चा सुरू झाली. दादांच्या या वक्तव्यामुळे राज्याचं राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालं आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या.

काय म्हणाले होते अजित पवार, माझ्यावर 70 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप करण्यात आला. या आरोपाची चौकशी करण्यासाठी फाईलवर तत्कालीन गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी सही केली होती. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री झाल्यावर ती फाइल मला दाखवली. आर.आर. आबांनी केसांनी माझा गळा कापण्याचा प्रयत्न केला, असे वक्तव्य अजित पवार यांनी तासगाव येथील आयोजित सभेत केले. त्यामुळे विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरत अजित पवारांवर टीका करायला सुरूवात केली. आर.आर.पाटील यांच्या स्वच्छ प्रतिमेवर डाग लावण्याचा प्रयत्न दादांनी केल्याचा आरोप विरोधकांनी केला. पुढील काही दिवसांमध्ये या सर्व प्रकरणाचा सोक्षमोक्ष होईलच. तत्पूर्वी राज्याच्या राजकारणातील स्वच्छ, शांत, अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून प्रचलित असणाऱ्या आर आर पाटील यांचा जीवनप्रवास आवर्जून वाचला पाहिजे.

कमवा आणि शिका

सांगली जिल्ह्यातील तासगांव तालुक्यात असणार्‍या अंजनी या छोट्याच्या गावात 16 ऑगस्ट 1957 साली रावसाहेब रामराव पाटील  (आर आर पाटील) यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती बेताची होती. त्यामुळे फक्त शिक्षण घ्यायला त्यांना जमणार नव्हते. काम करत शिकण्या शिवाय त्यांना पर्याय नव्हता. त्यामुळेच त्यांनी कमवा आणि शिका अंतर्गत आपले संपूर्ण शिक्षण पूर्ण केले. शालेय जीवनात त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणार्‍या एका व्यक्तीचं त्यांना मार्गदर्शन भेटलं. प्राचार्य पी.बी.पाटील यांनी आबांचे कलागुण हेरले आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले. आबांनी पुढे सांगलीतल्या शांतीनिकेतन महाविद्यालयातून बीए मध्ये पदवी पूर्ण केली. कायद्याच ज्ञान आपल्याला असावं या उद्देशाने त्यांनी एलएलबीमध्ये पदव्युत्तर पदवी पूर्ण केली.

राजकारणात प्रवेश

शालेय जीवनात असताना अभ्यासात हुशार आणि शांत स्वभावामुळे त्यांच्यातील कलागुणांना पी.बी.पाटील यांनी हेरलं होते. याच गोष्टीचा त्यांना भविष्यात बराच फायदा झाला. गरीब शेतकरी कुटुंबात जन्म झाल्यामुळे सामाजिक गोष्टींची आबांना जाणीव होती. समाजाचं आपणही काही देणं लागतो ही भावना त्यांच्या मनात होती. त्यामुळे आबांमध्ये असणाऱ्या नेतृत्वगुणांची छाप वसंतदादा पाटील यांच्यावर पडली. वसंतदादा पाटील यांनी आबांना अचूक हेरलं आणि त्या क्षणापासून आर आर पाटील यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. आबा कोणत्याही राजकीय घराण्यातून आले नव्हते. तरीही त्यांची भाषणशैली मनाला भिडणारी होती. यशवंतराव चव्हाण यांचा आदर्श त्यांच्या डोळ्यासमोर होता.

आर आर पाटील 1979 साली पहिल्यांदा सावळज मधून जिल्हा परीषद सदस्य म्हणून निवडून आले. 1979 ते 1990 अशी एकूण 11 वर्ष त्यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून कार्यभार सांभाळला. जिल्हा परिषद सदस्य असल्यामुळे ग्रामीण भागातील अडचणींचा त्यांना जवळून परिचय आला. या 11 वर्षांच्या जिल्हा परिषद सदस्य पदाच्या कामाचा त्यांना भविष्यात बराच फायदा झाला. 1990 नंतर आर आर पाटील यांची महाराष्ट्राच्या राजकारणात एंट्री झाली. 1990 साली त्यांना तासगाव मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली. पहिलीच विधानसभा आबांनी जिंकली. त्यानंतर आबांनी आपल्या कामाच्या धडाक्याने महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या नावाची दखल घ्यायला लावली. 1995 साली काँग्रेसच्या तिकिटावर आबांनी दुसऱ्यांदा विजयाचा गुलाल उधळला.

Ganpatrao Deshmukh – एसटीने प्रवास करणारा एकमेव आमदार, Guinness Book of World Record मध्ये आहे नोंद

आबा निवडून आले मात्र, यावेळी भाजप-शिवसेना युतीच सरकार होतं. विरोधी बाकावर बसून आबांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडलं. आपल्या भाषण शैलीने त्यांनी सर्वांना प्रभावित केले. अभ्यासू आणि स्वच्छ चारित्र्याचा आमदार अशी आबांची ओळख राज्याच्या राजकारणात निर्माण झाली. 1999 साली आबांनी काँग्रेसला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमधे प्रवेश केला. त्यावेळी शरद पवार आणि आर आर पाटील यांच्या जोडीचा बरीच चर्चा झाली. शरद पवारांचे विश्वासू आणि कट्टर समर्थक अशी आर आर पाटील यांची नवीन ओळख निर्माण झाली.

राज्याच्या राजकारणात आर आर पाटील यांच्या नावाची विविध कारणांमुळे वारंवार चर्चा व्हायला सुरू झाली. त्यानंतर आबांनी 2004, 2009 आणि 2014 च्या विधानसभा निवडणुकीत आपली विजयी परंपरा कायम ठेवत आमदारकीचे तिकीट मिळवले. सुरुवातीला तासगाव आणि त्यानंतर कवठेमहांकाळ मतदारसंघाचे त्यांनी निर्विवाद प्रतिनिधीत्व केले.

मंत्रीपद आणि वाद

आर आर पाटील यांनी आपल्या राजकीय प्रवासात अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या. यापैकी सर्वात महत्त्वाची जबाबदारी होती ती मंत्रीपदाची. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकार सत्तेत असताना आर आर पाटील यांच्यावर ग्रामविकास मंत्रीपदाची जबाबदार सोपण्यात आली होती. आबांचा जन्मच ग्रामीण भागातला. तसेच जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी 11 वर्ष जिल्ह्यात काम केले होते. त्यामुळे ग्रामीण भागातील समस्यांची त्यांना जाणीव होती. त्यामुळे त्यांनी सर्वात प्रथम स्वच्छता अभियानाला सुरूवात केली. त्यासाठी त्यांनी संत गाडगे महाराज स्वच्छता अभियान ग्रामीण भागांमध्ये राबवण्याच सुरुवात केली आणि त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला. त्यामुळे ग्रामीण भागात सांगली जिल्ह्या व्यतिरिक्त इतर जिल्ह्यांमध्ये आबांच्या नावाची चर्चा सुरू झाली.

त्यानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची आणि गृहमंत्रीपदाची जबाबदारी त्यांनी पार पाडली. गृहमंत्री असताना त्यांनी डान्स बारवर हातोडा टाकला. त्यांच्या या ऐतिहासिक निर्णयाचे महिला वर्गातून विशेष कौतुक झालं. डान्स बार बंद करण्याच्या आबांच्या निर्णयाला अनेकांनी विरोध केला मात्र आबा आपल्या निर्णयावर ठाम राहिले. गृहमंत्री असताना त्यांनी महात्मा गांधी तंटामुक्त अभियानही गावोगावी राबवण्याच्या सुचना दिल्या होत्या. राज्याचे गृहमंत्री असताना 2008 साली मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला. या काळात आबांनी केलेल्या काही वक्तव्यांमुळे मोठा वाद निर्माण झाला. या वादाच रुपांतर म्हणजे आबांना उपमुख्यमंत्रीपदासह गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.

कुटुंबाचा साधेपणा

आर आर पाटील यांची राज्याच्या राजकारणात स्वच्छ चारित्र्याचा नेता अशी ओळख आहे. जनमानसात त्यांच्याप्रती आदराची भावना आहे. साधी राहणी उच्च विचारसरणी या तत्वाला अनुसरुन त्यांनी आपली राजकीय कारकीर्द पार पाडली. राज्याचे गृहमंत्री आणि उप मुख्यमंत्रीपद त्यांनी भुषवलं परंतु त्यांनी कधीही त्यांच्या वागण्या बोलण्यातून त्याचा बाऊ केला नाही. आबांच्या साधेपणाचा परिचय त्यांच्या कुटुंबीयांमध्येही पहायला मिळतो. आबांच्या पत्नी सुमन, मुलगी स्मिता आणि मुलगा रोहित पाटील यांनी सुद्धा आबांच्या पावलांवर पाऊल ठेवत आपला साधेपणा जपला. आबांना दोन भाऊ असून ते सुद्धा आपापल्या क्षेत्रामध्ये कोणातही बडेजाव न करता आपली सेवा बजावत आहेत. आबांचे एक भाऊ राजाराम पाटील हे पोलीस दलात कार्यरत होते. तर दुसरे भाऊ सुरेश पाटील हे शेती करतात.

मृत्यूने कवटाळले

आर आर पाटील यांना तोंडाच्या कर्करोगाचे निधान झाले होते. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांच्या तब्बेतीमध्ये सुधारणा झाली होती. मात्र 16 फेब्रुवारी 2015 रोजी त्यांचा मृत्यू झाला. सांगली जिल्ह्यातील अंजनी या त्यांच्या जन्मगावी 17 फेब्रुवारी 2015 रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र सरकारच्या वतीने त्यांना 21 तोफांची सलामी देण्यात आली.

रोहित पाटील विधानसभेच्या रिंगणात

आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यंदाच्या निवडणुकीत विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातू त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तासगांव मतदारसंघातून ते निवडणूक लढवणार आहेत.


Discover more from मराठी चौक विशेष

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a comment