छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रात आजही शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारे अनेक गड थाटात उभे आहेत. विविध संस्थांच्या माध्यमातून गडांची डागडुजी केली जात आहे. दर रविवारी वेळात वेळ काढून तरुण मंडळी गडांच संवर्धन करण्यासाठी झटत आहे. यासाठी त्यांना कोणताही मोबदला दिला जात नाही. फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांवर असणाऱ्या प्रेमापोटी दिवस रात्र ही सर्व तरुण मंडळी गडांवर राबत आहेत. परंतु आता त्यांच्या कष्टाचं चीज होणार असून राज्य शासनाच्या माध्यमातून गडांच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या संस्थांना किंवा व्यक्तीला “छत्रपती शिवाजी महाराज वारसा” (Mahawarasa Award) पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
राज्य सरकारच्या माध्यमातून दरवर्षी “छत्रपती शिवाजी महाराज महावारसा” पुरस्कार देण्यात येणार आहे. गडांवर काम करणाऱ्या संस्था किंवा व्यक्तींना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार मिळवण्यासाठी पात्रताही शासनाने निश्चित केली आहे. यासाठी गडांचा सविस्तर अभ्यास, गडांच्या संवर्धनासाठी किमान 10 वर्ष कार्यरत असणारी संस्था अथवा व्यक्ती या पुरस्कारासाठी पात्र ठरू शकतात. ज्या संस्था किंवा व्यक्ती या पुरस्कारासाठी पात्र ठरतील त्यांना तीन लाख रुपये आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे दरवर्षी या पुरस्काराच वितरण राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. सकाळने यासंदर्भात वृत्त दिले आहे.