Makarand Patil – अतिवृष्टीमध्ये 1 कोटींपेक्षा अधिक शेतकर्‍यांचे नुकसान; यावर्षी मी वाढदिवस साजरा करणार नाही – मंत्री मकरंद पाटील

वाई तालुक्यातील द्रविड हायस्कूलच्या मैदानावार निलेश भोसले आणि राजीव शिर्के यांच्या माध्यमातून “मंत्री चषक” वाई प्रीमियर लीगच्या चौथ्या पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. वाई-खंडाळा-महाबेश्वर मतदारसंघाचे आमदार आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील (Makarand Patil) यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत ही स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जाते. या स्पर्धेचा आज (26 ऑक्टोबर 2025) शेवटचा दिवस असून मकरंद पाटील यांनी मैदानावर हजेरी लावत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. तसेच यावर्षी मी वाढदिवस साजरा करणार नाही, असंही ते म्हणाले.

मकरंद पाटील यांचा वाढदिवस 29 ऑक्टोबर 2025 रोजी आहे. वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांच्या माध्यमातून दरवर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. ‘मंत्री चषक’ ही स्पर्धा सुद्धा मकरंद पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेला उपस्थित राहत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सध्याची शेतकऱ्यांची परिस्थिती पाहता यंदा वाढदिवस साजरा करणार नसल्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. ते म्हणाले की, “येणारा 29 चा वाढदिवस मी साजरा करणार नाही. संपूर्ण राज्यामध्ये अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमध्ये 1 कोटींपेक्षा अधिक शेतकर्‍यांचे आणि 65 लाख हेक्टर शेतीचे नुकसान या राज्यातल्या सर्व सामान्य शेतकर्‍यांचं झालं. त्या विभागाचा मी मंत्री आहे. दिवाळीपूर्वी आपण साडेआठ हजार कोटी मदत शेतकऱ्यांना वितरीत केली. तरीसुद्धा एकूणच शेतकऱ्यांवर आलेलं हे संकट आणि या संकटाच्या काळात वाढदिवस साजरा करणं हे मला आणि मा‍झ्या संस्काराला मान्य नाही. म्हणून या वर्षी मी 29 तारखेला वाढदिवस साजरा करणार नाही,” असं मकरंद पाटील म्हणाले.