Wai News – मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान, वाई तालुक्यात 10 हजार वृक्षांची लागवड; हरित वसंताचा उत्सव साजरा

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत वाई (Wai News) तालुक्यात विविध पर्यावरणपूरक उपक्रम मोठ्या उत्साहात पार पाडले जात आहे. वाईकर सुद्धा या उपक्रमांमध्ये आपला सहभाग नोंदवत आहेत. याच पार्श्वभुमीवर आता वाई तालुक्यात मंगळवारी (14 ऑक्टोबर 2025) दहा हजार वृक्षांची विक्रम लागवड करण्यात आली आहे. वृक्ष लागवडीच्या सोबतीने गावोगावी हरित वसंताचा उत्सव साजरा करण्यात आला आहे. 

तालुक्यातील 32 गावांमध्ये ‘बिहार पॅटर्न’नुसार प्रत्येकी 200 झाडे लावण्यात आली आहेत. तर 67 गावांमध्ये प्रत्येकी 100 झाडांची लागवड करण्यात आली आहे. प्रामुख्याने गावांमधील शाळा, रस्त्यांच्या दुतर्फा, मंदिराचा परिसर, स्मशानभूमी आणि घराघरांमध्ये झाडे लावण्यात आली आहेत. मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शन आणि गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांच्या नेतृत्वाखाली वृक्ष लागवड करण्यात आली. या उपक्रमाचे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी कौतुक केले. जिल्हा माहिती कार्यालाय सातारा, या फेसबुक पेजवर यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. 

वृक्षारोपणाच्या या हरित उत्सवात प्रकल्प संचालक विश्वास सिद यांनी वेळे गावात उपस्थिती नोंदवली. पंचायत समिती मधील ग्रामपंचायत विभागातील विस्तार अधिकारी राहुल हजारे, रुपेश मोरे, शरद गायकवाड, कृषी अधिकारी शांताराम गोळे, विस्तार अधिकारी कृषी नारायण पवार, यांनी गावे दत्तक घेऊन वृक्ष लागवड करण्यासाठी गाव पातळीवर प्रयत्न केले.