नगरपंयात आणि नगरपरिषद निवडणुकांची रणधुमाळी आता सुरू झाली आहे. त्यामुळे इच्छूक उमेदवारांनी आतापासूनच कंबर कसून आपल्या कामाला सुरुवात केली आहे. 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला मतमोजनी होणार आहे. त्यामुळे हा नोव्हेंबर महिना पूर्णपणे निवडणुकीच्या धामधुमीत जाणार असून मतदारांना आमिष दाखवण्यासाठी उमेदवारांची चढाओढ पाहायला मिळणार आहे. या सर्व गडबडीत उमेदवार कोणता निवडायचा, मतदान करतान वोट कोणाला करायचं? हा मोठा प्रश्न मतदारांपूढे निर्माण होतो. या लेखामध्ये आपण उमेदवार निवडताना उमेदवारामध्ये कोणत्या गोष्टी पाहाव्यात ते थोडक्यात जाणून घेणार आहोत.
लोकशाही ही केवळ मतदानाची प्रक्रिया नसून ती जबाबदार नागरिकत्वाची कसोटी आहे. आपल्याकडून दिलेले एक मत गाव, तालुका किंवा जिल्ह्याचे भवितव्य ठरवते. त्यामुळे उमेदवार निवडताना केवळ नातेसंबंध, जात, पक्ष किंवा प्रलोभन पाहून मतदान करणे योग्य नाही. सुजाण मतदाराने खालील बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे.
चारित्र्य आणि प्रामाणिकपणा
उमेदवार प्रामाणिक आहे का? त्याच्यावर कोणतेही गुन्हेगारी प्रकरण प्रलंबित नाही का? जनतेशी वागताना त्याचा स्वभाव प्रामाणिक आणि नम्र आहे का. हे पाहणे महत्त्वाचे.
गावाच्या विकासासाठी दृष्टिकोन
उमेदवार फक्त निवडून येण्यासाठी वचनं देतो का, की त्याच्याकडे ठोस विकास आराखडा आहे? शिक्षण, आरोग्य, पाणी, रस्ते अशा मूलभूत गोष्टींबाबत त्याचे विचार काय आहेत हे तपासावे.
कामगिरीचा मागोवा
जर उमेदवार यापूर्वी कोणत्याही पदावर होता, तर त्याने काय काम केले याची माहिती घ्यावी. तो प्रत्यक्ष लोकांमध्ये राहून काम करतो का, की फक्त निवडणुकीतच दिसतो? हे ओळखणे गरजेचे.
What Is Nagar Panchayat – नगरपंचायत म्हणजे काय? सातारा जिल्ह्यात किती नगरपंचायती आहेत?
शिक्षण आणि प्रशासनिक समज
शिक्षण हे सर्वकाही नसले तरी लोकप्रतिनिधीला थोडीफार प्रशासनाची, योजनांची आणि अर्थकारणाची समज असावी. त्यामुळे तो शासकीय योजनांचा योग्य फायदा गावाला मिळवून देऊ शकतो.
संवाद कौशल्य आणि जनसंपर्क
चांगला उमेदवार लोकांशी सहज संवाद साधतो, त्यांच्या अडचणी ऐकतो आणि उपाय शोधतो. तो फक्त भाषणात नव्हे तर कृतीतही संवाद साधतो का हे पाहावे.
पक्षापेक्षा व्यक्तिमत्त्व महत्त्वाचे
कधी कधी पक्षाचं नाव मोठं असतं, पण उमेदवार योग्य नसतो. म्हणून पक्षापेक्षा उमेदवाराचं चारित्र्य, कामगिरी आणि प्रामाणिकपणा अधिक महत्त्वाचा आहे.
भविष्यासाठी दृष्टिकोन
चांगला उमेदवार पुढील पिढीसाठी विचार करतो. तो शाश्वत विकास, पर्यावरण संवर्धन आणि शिक्षणाच्या दिशेने प्रयत्नशील असतो का, हेही तपासावे.
What Is Panchayat Samiti – जागरूक मतदार बना! जाणून घ्या पंचायत समितीचं काम, इतिहास, रचना आणि महत्त्व
मतदान हा केवळ हक्क नाही तर कर्तव्य आहे. योग्य उमेदवार निवडला तर गावाचा विकास होतो; चुकीचा निवडला तर पाच वर्षे मागे जातो. म्हणून विचारपूर्वक, सजगपणे आणि निःस्वार्थपणे मतदान करू या. योग्य व्यक्तिला मतदान म्हणजे विकास, तर चुकीच्या व्यक्तीला मतदान म्हणजे पुन्हा पाच वर्ष मागे जाण्याची लक्षणे. त्यामुळे मतदान करण्यापूर्वी या सर्व गोष्टी नक्कीच डोक्यात ठेवा.