My Fridge Food आजच्या तंत्रज्ञानयुगात इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर वाढू लागला आहे. त्यामुळे आता प्रत्येकाच्या घरी फ्रीज हा असतोच कारण आता ती एक काळाची गरज आहे. फ्रिज हा आपल्या घरातील सर्वात महत्त्वाचा उपकरणांपैकी एक आहे. अन्न ताजं ठेवण्यासाठी आपण रोज काही ना काही अन्न फ्रिजमध्ये ठेवतो मात्र, प्रत्येक अन्नपदार्थाचं फ्रिजमध्ये टिकण्याचं प्रमाण वेगळं असतं. जर जास्त काळ फ्रीजमध्ये असलेलं अन्न आपण खाल्ल तर त्याचा शरिरावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
फ्रिजमध्ये ठेवलेलं अन्न किती दिवस टिकतं?
शिजवलेलं अन्न – भाजी, आमटी, भात, पोळ्या यांसारखं शिजवलेलं अन्न साधारणपणे 1-2 दिवस फ्रिजमध्ये चांगलं राहतं. यानंतर त्याची चव बदलते व बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता वाढते.
दूध व दुग्धजन्य पदार्थ – दूध फ्रिजमध्ये 5-7 दिवस टिकतं, परंतु उघडल्यानंतर ते 2-3 दिवसात संपवणंच गरजेच असतं. दही 5 दिवस, तर चीज 1 ते 2 आठवडे टिकतं.
फळं व भाज्या – फ्रिजमध्ये फळं 5-7 दिवस तर भाज्या 4-5 दिवस ताज्या राहतात. कोथिंबीर, पुदिना यांसारखी पाने 2-3 दिवसांत सुकतात.
मांस व मासळी – शिजवलेलं मांस 3 दिवस, तर कच्चं मांस व मासळी 1-2 दिवसच फ्रिजमध्ये टिकतं. यासाठी डीप फ्रीझरचा वापर केल्यास 1-2 महिनेही टिकू शकतं.
फ्रीजमधील अन्न खाल्याने आरोग्यावर काय परिणाम होतो?
फ्रीजमध्ये अन्न साठवणं हे आजच्या दैनंदिन जीवनशैलीचा भाग बनलं आहे. पण जर योग्य पद्धतीने व मर्यादित कालावधीसाठी फ्रीजमध्ये अन्न न ठेवता, दीर्घकाळ तसंच ठेवलं तर त्याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
1. अन्न विषबाधा (Food Poisoning) – जुने व बिघडलेले अन्न खाल्ल्यास उलट्या, जुलाब, पोटदुखी आणि ताप येण्याचा धोका वाढतो. बॅक्टेरिया जसे सॅल्मोनेला, ई. कोलाई, किंवा लिस्टीरिया वाढू शकतात.
2. पचनाच्या समस्या – फ्रीजमधील जुने अन्न जड होतं, त्यात पोषणमूल्ये कमी होतात, ज्यामुळे अपचन, गॅस व पोटफुगी होऊ शकते.
3. रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे – सतत शिळं अन्न खाल्ल्यास शरीराला आवश्यक पोषकतत्त्वं मिळत नाहीत, त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते.
4. फंगल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन – अन्नावर बारीकसा बुरशीचा थर (mold) दिसत नसला तरी तो आरोग्यासाठी हानिकारक असतो.
5. अॅसिडिटी व वजन वाढ – वारंवार गरम केलेलं व शिळं अन्न खाल्ल्याने अॅसिडिटी होते, तसेच शरीरात चरबी साचू लागते.
ताजं, पोषक आणि स्वच्छ अन्नच उत्तम आरोग्यासाठी पोषक असते. रोज बनवलेले जेवण त्याच दिवशी संपणे आवश्यक आहे. पण जर तसे झाले नाही तर फ्रिजमध्ये अन्न ठेवताना त्यावर तारीख लिहावी, उघडं न ठेवता हवाबंद डब्यांत साठवावं. वास, रंग किंवा चव बदलल्यास अन्न फेकून द्यावं.अन्न टिकवण्यासाठी फ्रिज उपयुक्त आहे, पण त्याचं योग्य नियोजन व निगा राखणं तितकंच महत्त्वाचं आहे.