>>सचिन टक्के
भिलार गणातील पंचायत समिती निवडणुकीसाठी (Panchayat Samiti Election) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सौ. वंदना भिलारे यांना उमेदवारीसाठी पक्ष नेतृत्वाकडून सकारात्मक चर्चा झाली असून तयारीला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत, या निर्णयामुळे गणात राजकीय वातावरण तापले आहे. भिलार गावच्या माजी सरपंच असलेल्या वंदना भिलारे यांनी आपल्या कार्यकाळात पारदर्शक कारभार, विकासाभिमुख निर्णय आणि सर्वसामान्य जनतेशी असलेला थेट संवाद यामुळे स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. भिलार हे ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून राज्यभरात ओळख निर्माण करणाऱ्या संकल्पनेच्या अंमलबजावणीत वंदना भिलारे यांचा मोलाचा सहभाग राहिला आहे. सरपंच पद भूषवत असताना रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, ग्रामविकास योजना तसेच शासकीय कामकाजातील अनुभव त्यांनी प्रभावीपणे आत्मसात केला. शासकीय योजनांची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणी, प्रशासनाशी समन्वय आणि नागरिकांच्या समस्या यांचा त्यांना प्रत्यक्ष अनुभव आहे. याच अनुभवाच्या जोरावर त्या आता पंचायत समिती निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत.
या प्रचारात त्यांचे पती श्री. प्रवीण भिलारे यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका असून, त्यांचा दांडगा जनसंपर्क ही या उमेदवारीची मोठी ताकद मानली जात आहे. राजकारणात सक्रिय असलेले श्री. प्रवीण भिलारे यांचा दांडगा अनुभव आणि सर्वसामान्य जनतेमध्ये असलेली मजबूत ओळख ही या उमेदवारीची आणखी एक मोठी जमेची बाजू ठरत आहे. दीर्घकाळ सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत राहिल्याने त्यांनी जनतेच्या प्रश्नांची जाण ठेवत विश्वासार्ह नेतृत्वाची प्रतिमा निर्माण केली आहे. जनतेतील सहभागापासून ते विकासकामांपर्यंत त्यांचा सक्रिय सहभाग राहिला असून, सामान्य माणसाशी थेट संवाद साधण्याची त्यांची पद्धत लोकांमध्ये विशेष पसंतीस उतरली आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि जनमानसातील विश्वासाचा लाभ वंदना भिलारे यांच्या प्रचारातही प्रभावीपणे होत असल्याचे चित्र सध्या भिलार गणात पाहायला मिळत आहे.
गावागावांतून, वाड्यावस्त्यांवरून मिळणारा प्रतिसाद पाहता, भिलारे दाम्पत्याची जनतेशी असलेली नाळ अधिक दृढ झाल्याचे चित्र आहे. सामाजिक, शैक्षणिक आणि विकासकामांमध्ये सक्रिय सहभाग असल्याने त्यांना सर्व स्तरांतून पाठिंबा मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थानिक नेतृत्वानेही वंदना भिलारे यांच्या उमेदवारीकडे विश्वासाने पाहिले असून, त्यांच्या माध्यमातून भिलार गणात पक्षाची ताकद वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. अनुभव, जनसंपर्क आणि विकासाचा ठोस दृष्टिकोन यांची सांगड घालत वंदना भिलारे यांनी प्रचाराचा झंझावात उभा करण्यात सुरवात केली असून, येणाऱ्या निवडणुकीत त्यांची उमेदवारी निर्णायक ठरण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.