Pandharpur Wari 2025 – गजर हरिनामाचा! श्री कृष्णामाई सांप्रदायिक भजन मंडळाची एकदिवसीय पायवारी

श्री कृष्णामाई सांप्रदायिक भजन मंडळाच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त एकदिवसीय पायवारीचे आयोजन करण्यात आलं होतं. दैनंदिन कामाच्या व्यापातून उसंत घेत एक दिवस सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी मुंबईच्या विविध भागांमधून मोठ्या संख्येने वारकरी पुणे ते सासवड पायवारीमध्ये सहभागी झाले. 

लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनीच या एकदिवसीय पायवारीमध्ये हिरिरीने सहभाग घेतला.

सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातून आलेल्या दिंडी क्रमांक 31 मध्ये श्री कृष्णामाई सांप्रदायिक भजन मंडळाचे सर्व वारकरी सहभागी झाले.

ग्यानबा-तुकारामांचा जयघोष, टाळ-मृदंगाच्या गजर, भगव्या पताका फडकावत ऊन-पावसाचा अनुभव घेत पुणे ते सासवड दरम्यानच्या या प्रवासात सर्व तल्लीन झाले होते. 

हेचि जतन करा दान । धरुनी चरण राहिलों तो |
घ्यावी माझ्या हातें सेवा । हेची देवा विनवणी ||
आणीक कांही न घालीं भार । बहुत फार सांकडे |
तुका तुमचा म्हणवी दास । त्याची आस पुरवावी ||

संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा अर्थ म्हणजेच, देवा मी तुमचे चरण धरून राहिलो आहे याच तुम्ही मला दिलेल्या कृपादानाचे तुम्ही रक्षण करा. देवा माझ्या हातून तुमची सेवा व्हावी हीच माझी तुम्हाला विनंती आहे . देवा या वाचून मी दुसरे कोणतेच भार किंवा कोणतेही हे साकडे तुमच्यावर घालत नाही. तुकाराम महाराज म्हणतात मी तुमचा म्हणून घेतो मग तुम्ही माझी इच्छा पूर्ण करा.


Discover more from मराठी चौक विशेष

Subscribe to get the latest posts sent to your email.

error: Content is protected !!