संपूर्ण महाराष्ट्राला यंदा पावसाने झुंजवलं आहे. अपुऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच कंबरटं मोडलं आहे. शेतीसाठी केलेला खर्चही निघणं यंदा अशक्य झाल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. चालू खरीप हंगामात पावसाने दगा दिल्याने वाई (Wai News) तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसला आहे. पावसाच्या अभाव आणि प्रतिकूल हवामान यामुळे सोयाबीनच्या उताऱ्यात मोठी घट झाली असून, शेंगांना दाणे कमकुवत भरल्याने काढणीच्या टप्प्यावर उत्पादनात मोठी घसरण झाली आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके, मशागत आणि मजुरी यांच्या वाढत्या खर्चामुळे शेतीचा उत्पादनखर्च मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मात्र, अपेक्षेप्रमाणे उत्पन्न हातात पडत नसल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून, केलेला खर्चही भरून निघणार का असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. या आर्थिक अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांचे घरखर्च, मुलांचे शिक्षण आणि कर्जाच्या परतफेडीचे गणित पूर्णपणे कोलमडले आहे. दिवाळी तोंडावर आहे, अशा परिस्थिती दैनंदिन खर्चाची जुळवाजुळव करायची कशी? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.
‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, या बिकट परिस्थितीवर मात करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी तात्काळ प्रत्यक्ष शेतात जाऊन पीक स्थितीचे पंचनामे करावेत, अशी मागणी होत आहे. बाधित शेतकऱ्यांना शासनाच्या विविध कृषी योजनांतून वेळेत मदत मिळावी, तसेच नियमांनुसार नुकसानभरपाई आणि पीकविम्याची अंमलबजावणी करून बळीराजाला दिलासा द्यावा, अशी आर्त हाक वाई तालुक्यातील शेतकऱ्यांकडून दिली जात आहे.
Discover more from मराठी चौक विशेष
Subscribe to get the latest posts sent to your email.