Panhala fort – जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज वेढ्यातून मुक्त झाले, वाचा संपूर्ण इतिहास…

पन्हाळगडाचा इतिहास (Panhala Fort Information in Marathi) 

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात निसर्गाची मुक्त उधळणं झालेली पहायला मिळते. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याला पर्यटन आणि महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासात महत्वाचे स्थान आहे. याच कोल्हापूर जिल्ह्यात निसर्गसौंदर्याने नटलेला आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला गड म्हणजे Panhala Fort.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेवेळी संरक्षणाच्या दृष्टीने डोंगरी किल्ल्यांना अधिक महत्व दिले होते. त्यामुळे डोंगरी किल्ले स्वराज्याचे महत्त्वाचे पहारेकरी होते आणि आजही आहेत, असं म्हटलं तर चुकीचे ठरणार नाही. पन्हाळगड पूर्वी ‘ब्रम्हगिरी’ या नावाने ओळखला जात होता. या ब्रम्हगिरीवर नागवंशी लोकांचे वर्चस्व होते.

त्यावेळी प्राचीन मुनी पराशर यांनी तप:साधनेसाठी ब्रम्हगिरी म्हणजेच आत्ताच्या पन्हाळगडाची निवड केली होती. या कालखंडात ब्रम्हिगिरीवर नागवंशी लोकांच ठाणं होतं. त्यांच्या पद्धतीने त्यांनी ब्रम्हिगिरीवर आपली सत्ता स्थापन केली होती. त्यामुळे सुरुवातीला नागवंशी लोकांनी पराशर ऋषी यांना तपश्चर्या करण्यापासून रोखले होते. परंतु पराशर ऋषींनी आपल्या बुद्धीचातुर्याने आणि तप:साधनेने नाग लोकांची मने जिंकली. त्यामुळे नाग लोकांचे मतपरिवर्तन झाले आणि गडावर शांतता नांदली. नाग लोकांचे बराच काळ पन्हाळगडावर वास्तव्य होते. त्यामुळे पन्हाळगडाला ‘पन्नगालय’ या नावाने ओळखले जात होते. पुढे काळानुरुप गडाच्या नावामध्ये बदल होत गेला.

अन् छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यातून मुक्त झाले

स्वराज्य स्थापनेचा विडा छत्रपती शिवाजी महाराजांनी उचलला होता. स्वराज्य राखण्यासाठी राज्याची सुरक्षा जास्त महत्वाची होती. कारण आदिलशाही, मुघलशाही, पोर्तुगीज आणि अहमदनगरची (अहिल्यानगर) निजामशाही यांचा धोका स्वराज्याला होता. हा धोका ओळखूनच शिवरायांची गडकिल्ले ताब्यात घेण्याचा सपाटा सुरू केला होता. याच दरम्यान अफझलखान नावाचा बोकड स्वराज्यावर चालून आला. त्याला धडा शिकवण्यासाठी शिवरायांनी आपल्या बुद्धी चातूर्याने त्याला प्रतापगडाच्या पायथ्याला बोलावले. शिवरायांच्या जाळ्यात बोकड सहज अडकला आणि प्रतापगडाच्या पायथ्याला येऊन दाखल झाला. 10 नोव्हेंबर 1659 चा दिवस उजाडला आणि याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला त्याला यमसदनी धाडले.

अफझलखानाचा वध केल्यामुळे आदिलशाहीला जबर धक्का बसला होता. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली होती. काय करावं त्यांना सुचत नव्हतं. सुडाचा अग्नी त्यांच्या धमन्यांमध्ये वाहत होता. याच दरम्यान शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध केल्यानंतर प्रतापगडावरुन 28 नोव्हेंबर 1659 रोजी पन्हाळगड गाठला. आदिलशाहीला ही संधी वाटली आणि बडी बेगमने शिवरायांवर हल्ला करण्यासाठी सिद्दी मसूद, सिद्दी जौहर आणि बापाचा बदला घेण्यासाठी फाजलखान (अफझलखानाचा मुलगा) यांना धाडले.

अफझलखानाच्या वधाचा बदला घेण्यासाठी सर्व सरदार आसुसले होते. शिवराय आपल्या हाती लागणार या खोट्या आशेवर सर्व सरदारांनी पन्हाळगडाचा वेढा मजबूत केला होता. परंतु छत्रपती शिवाजी महाराज काळाच्या पुढचा विचार करणारे व्यक्ती होते. त्यांनी या काळात कोणतीही हालचाल न करता पन्हाळ्यावर आपला मुक्काम शांततेत घालवण्याचा निर्णय घेतला. वेढा पडून आता सहा महिने झाले होते. पावसाळा सुरू झाला होता, परंतु आदिलशाीचे सरदार वेढा हलवण्यास तयार नव्हते. त्यामुळे शिवरायांनी आता आपल्या पद्धतीने आदिलशाहीला धडा शिकवण्यासाठी हालचाली सुरू केल्या.

Chandan Vandan Fort; साताऱ्याची जुळी भावंडे

शिवरायांनी आपल्या बुद्धी चातुर्याने सर्व परिस्थिती हातळायला सुरुवात केली. तसेच आपण घाबरलो आहोत अस भासवण्यासाठी त्यांनी सिद्दी जौहरला ‘आम्ही आता शरण येत आहोत’ असा निरोप धाडला. शिवरायांनी पाठवलेल्या निरोपामुळे सिद्दी जौहरसह सर्व आदिलशाही सरदारांच्या मनात विजयाच्या किंकाळ्या फुटू लागल्या होत्या. शिवरायांचा प्लॅन यशस्वी झाला होता. याच संधीचा फायदा घेत बेसावध असणाऱ्या आदिलशाही सैन्याच्या नाकावर टिचून 12 जुलै 1660 रोजी रात्री भर पावसात राजदिंडी या चोरदरवाज्यातून शिवराय पन्हाळगडातून बाहेर पडले. यावेळी त्यांच्यासमवेत निवडक सहाशे मावळ्यांची फौज होती. पन्हाळगड ते विशाळगडाचा पल्ला गाठण्यासाठी सर्वांनी जिवाची बाजी लावली. ‘माझा राजा गडावर सुखरुप पोहचला पाहिजे’ ही भावना प्रत्येकाच्या मनात होती.

शिवरायांसारखे दिसणारे वीर शिवा काशीद यांना पालखीत बसवून खानाच्या भेटीसाठी पाठवण्यात आले. खानाच्या चेहाऱ्यावर आनंद होता. मात्र जेव्हा त्याने शिवा काशीद यांना ओळखले तेव्हा त्याच्यासह आदिलशाहीच्या सैन्याला जबर धक्का बसला. लालबुंद झालेल्या खानाने शिवा काशीद यांना ठार मारले. वीर शिवा काशीद यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे मरण आले. स्वराज्यासाठी त्यांनी आपल्या बलिदानाची आहूती दिली. त्यांचे बलिदान व्यर्थ गेले नाही. इकडे शिवाजी महाराज वेगाने विशाळगडाच्या दिशेने मार्गस्थ होत होते. त्यांच्या मागावर सिद्दी मसूद घोडदळासह पाठलाग करू लागला.

घोडखिंडीचे नामकरण पावनखिंड झाले

रायाजी बांदल यांच्या नेतृ्त्वात बांदलांचे सहाशे मावळे शिवरायांच्या साथीला होते. वाऱ्याच्या वेगाने घोडदौड सुरू होती. पांढरपाणी इथे येताच शिवरायांनी सैनिकांची दोन भागांमध्ये विभागणी केली. शिवरायांनी 300 मावळ्यांची फौज आपल्या सोबत ठेवली आणि रायाजी बांदल, हैबतराव जाधव, संभाजी जाधव, विठोजी काटे आणि बाजीप्रभू देशपांडे या पराक्रमी वीरांना पांढरपाणी येथे ठेवले. घोडखिंडीत बाजीप्रभू देशपांडे आणि मावळ्यांची सिद्दी मसूदच्या सैन्याशी जोरदार लढाई झाली. भर पावसात तलवारींच्या खणखणत्या पात्या विजेप्रमाणे बरसत होत्या. माघार घेणं मराठ्यांच्या रक्तात नव्हतं. तीन ते चार तास तुंबळ युद्ध सुरू होतं. मावळ्यांनी आपल्या जीवाची बाजी लावत खिंड लढवली आणि शिवराय या काळात विशाळगडावर सुखरुप पोहचले. पंरतु या धुमश्चक्रीत राजाजी बांदल, विसोजी काटे, संभाजी जाधव, बाजीप्रभू देशपांडे यांच्यासह अनेक मावळ्यांना वीरमरण आले. मावळ्यांच्या रक्ताने उजळून निघालेल्या या घोडखिंडीला शिवरायांनी ‘पावनखिंड’ हे नाव दिले. याचबरोबर रायाजी बांदल व बाजीप्रभू देशपांडे व त्यांच्या साथीदारांच्या पराक्रम इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद झाली.

अन् पन्हाळगड पुन्हा स्वराज्यात आला

शिवरायांनी तह करून पन्हाळगडाचा ताबा आदिलशाहीला दिला होता. याच दरम्यान इ.स 1666 मध्ये मिर्झाराजे जयसिंग यांच्यावर शिवराय चाल करून गेले. परंतु, या लढाईत शिवरायांना पराभवाचा सामना करावा लागला. दुर्दैवाने स्वराज्याचे 1500 कणखर मावळ्यांना वीर मरण आले. इ.स 1673 मध्ये 60 मावळ्यांना घेऊन कोंडाजी फर्जंद यांनी पन्हाळगडावर हल्ला केला. आदिलशाही सैन्याला मराठ्यांनी चारिमुंड्या चित्त केलं आणि स्वराज्याचा भगवा पुन्हा एकदा पन्हाळ्यावर फडकला.

पन्हाळगड आणि ऐतिहासिक वास्तूंचा खजिना

पन्हाळगडावर प्रवेश करण्यासाठी चार दरवाजे आहेत. प्रत्येक दरवाजाचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. ज्या दरवाजाने वाहने गडावर प्रवेश करतात त्या दरवाजाला ‘चोर दरवाजा’ म्हणतात. या दरवाजाने वैशिष्ट्य म्हणजे शत्रुला गडावर प्रवेश करता येऊ नये, याची खबरदारी घेऊन एकामागे एक असे चार दरवाजे बांधण्यात आले होते.

कोकणी दरवाजा म्हणून प्रचलित असणारा आणि गडाच्या पश्चिमेस आजही सुस्थितीत ताठ मानेने उभा असणारा दरवाजा म्हणजे ‘तीन दरवाजा’. या ठिकाणी एकापाठोपाठ एक असे तीन दरवाजे आहेत. या दरवाजाचे वैशिष्ट्य म्हणजे इ.स 1673 मध्ये जेव्हा कोंडाजी फर्जंद यांनी पन्हाळगड जिंकला, तेव्हा याच तीन दरवाजाच्या मधल्या चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचे सुवर्णपुष्प उधळून स्वागत करण्यात आले होते.

या दोन दरवाजांव्यतिरिक्त गडावर वाघ दरवाजा, चोर दरवाजा, राजदिंडी दरवाजा आहे. यापैकी चोर आणि राजदिंडी दरवाजा हा आपत्कालीन दरवाजा म्हणून प्रसिद्ध आहे. ऐतिहासिक वैशिष्ट्य म्हणजे याच राजदिंडी दरवाजातून शिवराय सिद्दी जौहरच्या वेढ्यातून निसटून विशाळगडावर सुखरुप आले होते.

शिवरायांनी आपल्या बुद्धी चातुर्याने स्वराज्यातील सर्व गडांवर मावळ्यांना पाण्याची कसलीही कमतरता जाणवू नये यासाठी तलावांची निर्मिती केली होती. पन्हाळगडावर सुद्धा त्याची प्रचिती येते. गडावर जलतीर्थ नावाचं बारमाही पाणी असणारं पाण्याच एक कुंड आहे. तीन दरवाजातून आतमध्ये आल्यानंतर हे पाण्याचे कुंड निदर्शनास पडते. याचबरोबर अंधार बाव, नागझरी आणि कर्पूर बाव याठिकाणी सुद्धा पाण्याची व्यवस्था आहे.

गड राखायचा असेल तर बुरुज आणि त्याची तटबंदी मजबूत असावी लागते. शिवरायांनी या गोष्टीची वेळोवेळी काळजी घेतली होती. त्यामुळेच पन्हाळगडावर जवळपास 48 बुरुज आहेत. पन्हाळगडावर सध्या काळा टॉवर (काली बुरुज), उत्तर बुरुज, दुतोंडी बुरुज, पुसाची बुरुज इ. बुरुजांचा समावेश आहे. प्रत्येक बुरुजाचे गडाच्या संरक्षणामध्ये विशेष आणि महत्त्वाचे योगदान आहे.

पन्हाळगडावर लोकवस्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. असे असले तरी गडावर आजही अनेक ऐतिहासिक वास्तू निदर्शणास येतात. जसे की, अंबारखाना, यालाच बालेकिल्ला असेही म्हटल जात. सध्याच्या घडीला ही इमारत सर्वात मोठी आणि भक्कम आहे. त्याचबरोबर गडावर राजवाड्याचे अवशेष पहायला मिळतात. याव्यतिरिक्त गडावर धर्मकोठी, रेडेमहाल, कलावंतीण सज्जा ही इतर काही पाहण्यासारखी ठिकाणे गडावर आहेत. तसेच गडावर पन्हाळा वस्तुसंग्रहालय सुद्धा आहे. या संग्रहालयात ऐतिहासिक नाणी, मुर्ती, शस्त्र आणि अनेक दुर्मिळ वस्तू इथे पहायला मिळतात.

गडावर राहण्याची व्यवस्था आहे का?

पन्हाळगडावर सध्या लोकवस्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे गडावर राहण्याची, जेवणाची चांगली सोय आहे. अनेक हॉटेल्स गडावर आहेत, त्यामुळे कोणत्याही गोष्टीची कमतरता गडावर जाणवत नाही.

टीप – गडाचे पावित्र्य राखा, गडावर कोणत्याही पद्धतीची घाण करू नका. आपले दुर्ग हे आपलं वैभव आहे.

Irshalgad Fort; भूस्खलनामुळे प्रकाशझोतात आलेला गड, दुर्घटनेची वर्षपूर्ती


Discover more from मराठी चौक विशेष

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a comment