PSI Success Story in Marathi – आईने पाहिलेलं स्वप्न जेव्हा लेक सत्यात उतरवते, फौजदार शिवानी मोरे यांची यशोगाथा

>>गणेश सुरेखा मारूती वाडकर<<

आपल्या मुलीने किंवा मुलाने यशाच्या उत्तुंग शिखरावर जाऊन विराजमान व्हावं, ही सर्व आई-वडिलांची मनापासून इच्छा असते. एक काळ असा होता जेव्हा शिक्षणाची बोंब होती, शिक्षणाबद्दल उदासीनता होती, पुरुषांनी काम करायचं आणि महिलेने घर सांभाळायच ही परंपरा पूर्वापार चालत होती. याच परंपरेतून तुमचे आमचे आई-वडील पुढे आले. इच्छा असूनही त्यांना शिक्षण घेता आलं नाही. कारण तेव्हाची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती वेगळी होती. कालांतराणे आई-वडिलांनी पाहिलेली स्वप्न मागे पडत गेली. परंतु त्यांची त्या स्वप्नाप्रती असणारी धडपड थांबली नाही. आणि त्यांनी ते स्वप्न आपल्या मुलांमध्ये पाहिलं. फौजदार शिवानी स्वाती अशोक मोरे यांची यशोगाथा (PSI Success Story in Marathi) सुद्धा याच चक्राभोवती फिरणारी आहे. आईने स्वप्न पाहिलं आणि वडिलांनी पाठिंबा दिला आणि हे स्वप्न पोलीस उपनिरीक्षक (PSI) होऊन लेकीने सत्यात उतरवलं. तिच्या याच प्रेरणादायी प्रवासाची माहिती आपण या विशेष लेखामध्ये घेणार आहोत.

छोट्या गावात मोठ्या स्वप्नाची पालवी फुटली

शिवानी मोरे हिचे प्राथमिक शिक्षण मामाच्या गावी म्हणजे कराड तालुक्यातील आरेवाडी या गावात झालं. पहिले ते सहावीपर्यंतची शालेय जीवनाची पायरी तिने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पूर्ण केली. त्यानंतर पाचवीपासून ते दहावीपर्यंत शिक्षण आरेवाडी येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या कै. दत्तात्रय उत्तमराव यादव हायस्कूलमध्ये पूर्ण झालं. शालेय जीवनात असताना अभ्यासाची आवड आणि घरामध्ये असणारी शैक्षणिक पार्श्वभुमी त्यामुळे भविष्यात आपल्याला कोणत्या क्षेत्रात जायचं आहे, याची एक तुरळक कल्पना शिवानीला होती. कुटुंबातील काही सदस्य हे पोलीस उपअक्षिक्षक (Dysp), पोलीस निरीक्षक (PI) आणि पोलीस उपनिरीक्षक (PSI) या पदांवर कार्यरत असल्यामुळे कशापद्धतीने पुढचं पाऊल टाकायचं याचा एक अंदाज वयाच्या योग्य टप्प्यावर तिला आला होता.  

एसटी महामंडळामुळे मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू

दहवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी कराडमधील कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा होता. परंतु एसटी बसच्या अनियमीत फेऱ्या आणि गाव ते कराड असणारं जास्तीचं अंतर, या सर्व गोष्टींमुळे शिवानीने पुढील शिक्षणासाठी नवी मुंबई गाठली. अकरावी आणि बारावीचे शिक्षण कोपरखैरणेमधील RF Naik College कॉलेजमध्ये पूर्ण केलं. अकरावी बारावी यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर FG Naik कॉलेजमध्ये वाणिज्य शाखेतून पदवी पूर्ण केली. कॉलेजमध्ये असतानाच पेपर वाचन, अवांतर पुस्तकांचे वाचन करत शिवानीने एक प्रकारे स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला सुरुवात केली. अभ्यासाची ओढ होतीच. त्याला कुटुंबाचा सुद्धा पाठिंबा मिळाला आणि त्यानंतर शिवानीने मागे वळून पाहिलं नाही. छोट्या गावातून नवी मुंबईत आल्यानंतर शहर मोठं भासलं असलं तरी, उराशी बाळगलेलं स्वप्न त्याहून मोठं होतं. त्यामुळे MPSC चा खडतर प्रवासाला खऱ्या अर्थाने आता तिने सुरुवात केली होती. 

MPSC च्या वाटेवर

शिवानीचा MPSC च्या नागमोडी वळणांचा प्रवास 2017 साली सुरू झाला. तुरळक माहितीच्या आधारावर अभ्यासाला सुरुवात केली आणि अधिक चांगलं मार्गदर्शन मिळावं म्हणून क्लास लावला. परंतु क्लास लावला आणि भ्रमनिरास झाला. अपेक्षित असं योग्य मार्गदर्शन काही मिळालं नाही. याच दरम्यान क्लास सुरू असताना शिवानीने लायब्ररी लावली होती. दिवसभर लायब्ररीमध्ये विविध पुस्तकांच वाचन आणि अभ्यास सुरू होता. लायब्ररीमध्ये भेटलेले इतर उमेदवार खऱ्या अर्थाने मार्गदर्शक ठरल्याचं, शिवानीने स्वत: सांगितलं. त्यांनी दिलेलं मार्गदर्शन, सल्ले, अभ्यास करताना कोणत्या गोष्टी करायच्या आणि कोणत्या गोष्टी टाळायच्या, एकमेकांना मानसिक आधार, या सर्व गोष्टींमुळे तिच्या अभ्यासाला गती मिळाली. 

कुटुंबाचं प्रेरणास्थान

शिवानीच्या कुटुंबांतील काही सदस्य हे प्रशासकीय सेवेत कार्यरत आहेत. एक चुलती DYSP, एक बहीण PI, 2018 साली एक चुलत बहीण PSI झाली. अशा वातावरणात वाढल्याने सेवाभावाचं बीज तिच्या मनात आधीपासून होतं. त्याहून महत्त्वाचं म्हणजे – “माझ्या मुलीने PSI व्हावं” ही तिच्या आईची जिद्द. या आईच्या स्वप्नाने शिवानीला खऱ्या अर्थाने प्रेरणा दिली. आईच्या स्वप्नाला वडिलांनीही पाठिंबा दिला म्हणूनच यशाचं गोड फळ चाखण्याची संधी शिवानीने मेहनतीच्या जोरावर मिळवली. 

अन् तिसऱ्यांदा मैदान मारलचं

शिवानीला अभ्यास करताना आर्थिक अडचणींचा फार सामना करावा लागला नाही, असं तिने स्वत: सांगितलं. आई-वडिलांचा चांगला पाठिंबा होता. त्यामुळे अभ्यास अन् फक्त अभ्यास हा तिचा नियमीत दिनक्रम सुरू होता. अभ्यासात सातत्य होतं, पण थोडफार मनावर दडपण होतं. परंतु कुटुंबाचा पाठिंबा असल्यामुळे आत्मविश्वास टिकून होता. पहिल्या दोन वेळा पूर्व परीक्षा दिली. परंतु एक-दोन गुणांनी अपयश आलं. परंतु हार न मानता अभ्यास सुरूच ठेवला. या काळात कोविडने डोकं वर काढलं आणि सर्व परिस्थिती बदलली. लायब्ररी बंद झाल्याने वाट आणखी खडतर झाली. “PSI व्हायचचं” हा निर्धार मनाशी पक्का केला होता आणि हाच निर्धार कायम ठेवून सातत्याने अभ्यास सुरू ठेवला. 

कोविडची परिस्थिती निवळली आणि तिसऱ्या प्रयत्नान शिवानीने पूर्व परीक्षेत बाजी मारली. त्यानंतर सुरू झाला मुख्य परीक्षेचा टप्पा. त्यामुळे मुंबई-पुणे असा प्रवास आणि पुण्यात मॉक इंटरव्ह्यूची तयारी केली. या तयारीचा तिला चांगला फायदा झाला आणि शिवानीने अखेर यशाला गवसणी घातलीचं. 

अखेर यश मिळालं

दोन प्रयत्नांमध्ये अपयश आणि तिसऱ्या प्रयत्नात शिवानीने PSI पदावर मोहोर उमटवली. आईचं स्वप्न पूर्ण झालं आणि वडिलांचा आनंदही गगनात मावत नव्हता. गावात आणि कुटुंबात आनंदाचा उत्सव साजरा झाला. जवळपास 8 ते 9 वर्षांची मेहनत फळाला आली. आरेवाडी गावात भव्य रॅली काढण्यात आली. ठिकठिकाणी सत्कार समारंभ पार पडले. हा आनंदाचा क्षण केवळ शिवानीसाठी नव्हे, तर आई-वडिलांसाठी, भावंडांसाठी आणि संपूर्ण गावासाठी अभिमानाचा होता. 

प्रशिक्षणाचा नवा अध्याय सुरू झाला

23 डिसेंबर 2024 रोजी प्रशिक्षणाचा पहिला दिवस उजाडला. तो दिवस शिवानीच्या आयुष्यात सुवर्णाक्षरांनी कोरला गेला. प्रशिक्षणादरम्यान रोज नवनवीन अनुभव, नवी शिकवण मिळत गेली. नवीन प्रवासाला सुरुवात झाली आणि गणशोत्सव काळात पहिल्या पोस्टिंगमध्ये पुण्यातील प्रसिद्ध दगडुशेठ गणपतीच्या सुरक्षेची जबाबदारी मिळाली. गणरायाच्या कृपेने सुरू केलेला प्रवास त्याच गणरायाच्या सेवेतून पहिल्यांदा साकार झाला.  

यशाचा आनंद पण…

PSI झाल्याचा आनंद शब्दांत व्यक्त होणारा नव्हता. संघर्ष, अपयश, मेहनत आणि चिकाटी – या सगळ्याचं सार्थक झालं. घणसोली ते वाशीपर्यंतच्या सायकल प्रवासाच्या आठवणी, लायब्ररीतल्या रात्री, मित्र-परिवाराचं पाठबळ, या सर्व अनुभवांनी तिचा प्रवास संस्मरणीय बनवला. दोन महिन्यांनी प्रशिक्षण संपवून नवा अध्याय सुरू होणार तोच शिवानीच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. शिवानीचे वडील अशोक भाऊ मोरे यांचे 21 सप्टेंबर 2025 रोजी दु:खद निधन झाले. लेकीच्या आनंदाचा सोहळा पाहण्यासाठी ते आता या जगात नाहीयेत. पंरतु लेकीने त्यांचं नाव पंचक्रोशित उज्ज्वल केलं आहे. ते जिथे कुठे असतील, तिथे ते अभिमानाने एक गोष्ट आवर्जून सांगतील की, “माझ्या पोरीने माझं नावं मोठं केलं”, मी धन्य झालो.

शिवानीच्या प्रवासातून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या उमेदवारांनी काय शिकलं पाहिजे

  • ध्येयवेड आणि अभ्यासात सातत्य असेल तर कोणतंही ध्येय साध्य करता येतं.
  • अपयश हे शेवट नसतं, तर पुढच्या यशाची पायरी असते.
  • योग्य मार्गदर्शन आणि कुटुंबाचा आधार – हिच यशाची गुरुकिल्ली आहे.
  • अडचणी कितीही आल्या तरी हार न मानणं हेच खरं यश आहे.

पोलीस उपनिरीक्षक शिवानी मोरे यांची यशोगाथा म्हणजे केवळ एका व्यक्तीची यशोगाथा नाही, तर अनेक तरुणांना प्रेरणा देणारा प्रवास आहे. ग्रामीण भागातून सुरू झालेला हा प्रवास चिकाटी, परिश्रम आणि आईच्या स्वप्नाला न्याय देण्याच्या जिद्दीमुळे PSI पदापर्यंत पोहोचला.