स्वतंत्र पत्रकारितेच्या माध्यमातून शासनाच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करणाऱ्या पत्रकारांवर जीवघेणे हल्ले होत आहेत. मुकेश चंद्राकर यांची अशाच प्रकारे निर्घृण हत्या करण्यात आली. आता पुन्हा एकदा स्वतंत्र पत्रकार राजीव प्रताप (Rajiv Pratap Journalist) यांचा मृतदेह हाती लागल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस म्हणतायत की हा अपघात असू शकतो. मात्र, कुटुंबाने हा खून असल्याच दावा केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून राजीव यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचा आरोप त्यांच्या भावाने केला आहे.
राजीव प्रताप आपलं युट्यूब चॅनल ‘Delhi Uttarakhand Live’च्या माध्यमातून जनतेच्या समस्या सर्वांपर्यंत पोहचवत होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी उत्तराखंडमधील एका सरकारी रुग्णालयाच्या दुर्दशेचं वार्तांकन केलं होतं. रुग्णालयात अनेक दारूच्या बाटल्या आढळून आल्या होत्या. शासनाच्या भ्रष्टाचाराची एक प्रकारे पोलखोल राजीव प्रताप यांनी केली होती. मात्र, त्यानंतर त्यांच्यावर व्हिडीओ डिलिट करण्यासाठी दबाव आणला जात होता, असा दावा राजीवचा भाऊ प्रताप सिंगने इंडिया टुडेला दिलेल्या वृत्तात केला आहे. 16 सप्टेंबर 2025 रोजी राजीव प्रताप यांनी व्हिडीओ युट्यूब चॅनलवर प्रदर्शित केला आणि 18 सप्टेंबरच्या रात्री ते बेपत्ता झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजीव प्रताप मित्राच्या गाडीने ग्यानसूहुन गंगोरीला जात होते. पण ते घरी परतले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांची गाडी भागीरथी नदीजवळील सेउना येथे सापडली. गाडीजवळ फक्त चप्पल होती. त्यानंतर शोधाशोध केली असता दहा दिवसांनी 28 सप्टेंबर रोजी त्यांचा मृतदेह आढळून आला. राजीवचा मृत्यू छाती आणि पोटाला गंभीर दुखापतींमुळे झाल्याच पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये समोर आलं आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक सरिता डोवाल यांनी दिली.
कुटुंबाने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला असून कलम 403 अतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.