Ravan Puja – रावणाचं दहन नाही तर पूजा केली जाते; गावाची 300 वर्षांपूर्वीची परंपरा, अख्यायिका वाचून तुम्हीही थक्क व्हालं

विजयादशमी दसरा देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. याच दिवशी प्रभू श्री रामाने रावणाचा वध करून सत्यावर विजय मिळवला. त्यामुळे देशभरात रावणाचे पुतेळ उभारून त्यांच दहन केलं जातं. मोठ्या संख्येने नागरीक रावणांच दहण पाहण्यासाठी दरवर्षी गर्दी करत असतात. एकीकडे देशभरात रावणाचं दहन केलं जातं, तर दुसरीकडे अकोला जिल्ह्यातील सांगोळा गावात रावणाची (Ravan Puja) चक्क भक्तिभावाने पूजा केली जाते. संपूर्ण गाव रावणाची पूजा करण्यासाठी एकत्र येत. काय आहे या मागचा इतिहास? चला जाणून घेऊया.

देशभरात रावणाच्या दहनासाठी जय्यत तयारी केली जाते. दुसरीकडे अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील सांगोळा गावात मात्र, रावणाची पूजा करण्यासाठी गावकऱ्यांची लगबग सुरू असते. जवळपास दीड हजार लोकसंख्या असणाऱ्या या गावाने रावणाचं गाव म्हणून आपली आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे. 300 वर्षापूर्वी या ठिकाणी रावणाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली होती. रावण या गावाचे दैवत असून ही मूर्ती स्थापन केल्यापासून गावावरील संकटे दूर झाल्याचे ग्रामस्थ सांगतात.

शिल्पकाराने चुकून रावणाची मूर्ती घडवली

जवळपास 300 वर्षांपूर्वी गावात एक घटना घडली आणि तेव्हापासून रावणाची पूज करण्यास गावाने सुरुवात केली. या मागे प्रचलित असणारी कथा अशी की, गावातील ग्रामदैवतेसमोर झाडाची दगडी मूर्ती तयार करण्यास शिल्पकाराला सांगण्यात आले होते. मुर्तीकाराने मूर्ती घडवली. पण ती मूर्ती 10 तोंडे, 20 डोळे असणाऱ्या रावणाची होती. त्यामुळे गावकरी शिल्पकारावर नाराज झाले. मूर्ती घेऊन गावकरी गावाच्या दिशेने मार्गस्थ झाले. परंतु गावाची हद्द सुरू होताच बैल थांबले, बैल गावामध्ये प्रवेश करत नव्हते. त्यामुळे गावकऱ्यांना गावाच्या वेशीवरच नारळ फोडून मूर्तीची स्थापन केली. अशी अख्यायिका गावकऱ्यांकडून सांगितली जाते. तेव्हापासून गावात रावणाची पूजा करण्यास सुरुवात झाल्याचं, ग्रामस्थांनी ABP माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं. 

कशी आहे मूर्ती

दहा तोंडी रावणाची मर्ती युद्ध पेहरावात आहे. हातामध्ये तलवार आणि मस्तकावर मुकूट आहे. मूर्तीच्या इतर भुजांमध्ये आणखी शस्त्र आहेत.

दररोज पूजा केली जाते

 

 

दहा तोंडी रावणाची गावातीलच एका पुजारी दररोज नित्यनियमाने पूजा करतो. तर दसऱ्याला संपूर्ण गाव रावणाची पूजा करण्यासाठी एकवटतो. ही अनोखी परंपरा गावाने पूर्वापार जपली असून आजही मोठ्या उत्साहात रावणाची पूजा केली जाते. ही परंपरा अशीच निरंतर सुरू राहील असा विश्वास गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे.