Rohit Sharma Biography – बोरिवली ते Team India, यशस्वी कर्णधाराची यशस्वी कारकीर्द

हिटमॅन, मुंबईचा राजा, भारताचा कर्णधार, मुंबई इंडियन्सचा हुकूमी एक्का, षटकार किंग इ. टोपन नावांची यादी संपणार नाही. कारण रोहित (Rohit Sharma Biography) भाऊ नावाचं वादळ इथून पुढेही गोंगावत राहणार आहे. Team India ने रोहित शर्माच्या नेतृत्वात T-20 World Cup 2024 उंचावला आणि करोडो चाहत्यांचे स्वप्न पूर्ण झाले. मुंबईतील मरिन ड्राइव्हवर निळ्याशार समूद्राच्या साक्षीने सर्व खेळाडूंची विजयी मिरवणूक पार पडली. मुंबईच्या कुशीत वाढलेल्या रोहित शर्माचा थक्क करणारा संपूर्ण प्रवास जाणून घेण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत नक्की वाचा आणि जास्तीत जास्त शेअर करा.

मुंबई इंडियन्सच्या कर्णधार पदावरून हटवल्यानंतर चाहत्यांनी ज्या प्रकारे हार्दिक पंड्याची धुलाई केली होती. ते प्रेम पाहून क्रिकेट विश्वाला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसला होता. मुंबई इंडियन्सच्या या निर्णयाचा फटका मुंबईला बसला आणि साखळी फेरीतच संघाला बाहेर पडण्याची नामुष्की ओढावली. त्यामुळे रोहितचं MI शी असणारं नातं साऱ्या जगानं पाहिलं. पण तुम्हाला Rohit Sharma च बालपण कुठे गेले माहित आहे का? आपला रोहित कोणत्या शाळेत शिकला ते माहित आहे का? सर्व माहिती आपल्या ब्लॉगमध्ये आहे.

नागपूर ते बोरिवली Rohit Sharma family

रोहित सर्व सामान्य कुटुंबातून वर आलेला मुलगा आहे. रोहितच्या वागण्या बोलण्यातून त्याचा अंदाज तुम्हाला येत असेल. नागपूरमध्ये 30 एप्रिल 1987 रोजी आई पुर्णिमा शर्मा यांच्या पोटी रोहितचा जन्म झाला. घरची परिस्थिती बेताची होती. वडील गुरुनाथ शर्मा हे एका ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये कामाला होते. त्यामुळे तुटपूंज्या पगारात कुटुंबाचा सांभाळ करणे गुरुनाथ शर्मा यांना शक्य नव्हते. त्यामुळे रोहितला शिक्षणासाठी मुंबईतील बोरिवली येथे त्याच्या काकांच्या घरी पाठवण्यात आले. रोहित शर्माचे संपूर्ण शिक्षण मुंबईतच झाले. त्यामुळे मुंबईशी असणारी त्याची नाळ बालवयातच घट्ट झाली होती.

रोहितचे प्राथमिक शिक्षण मुंबईतील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलमध्ये पूर्ण झाले. शालेय जीवनात त्याला क्रिकेटची ओढ लागली आणि याच शाळेत त्याने क्रिकेटचे धडे घ्यायला सुरुवात केली. रोहितचा खेळ पाहून तेव्हा शाळेतील प्रशिक्षकांनी सुद्धा त्याचे कौतुक केले होते. त्यानंतर त्याच्या खऱ्या लढाईला सुरुवात झाली. दिंडोशी स्पोर्ट्स क्लबमध्ये प्रशिक्षक दिनेश लाड यांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थाने रोहितच्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात झाली. क्रिकेटमधील बारकावे त्याने दिनेश लाड यांच्या मार्गदर्शनाखाली शिकले, त्याचा सराव केला आणि त्याला कृतीची जोड देऊन टीम इंडियाचे दार ठोठावले.

दरम्यान, 2015 साली रोहित शर्माच्या आयुष्याला कलाटणी मिळाली कारण त्याचा विवाह रितिका सजदेह यांच्या सोबत झाला. रितिक सजदेह या एक स्पोर्ट्स मॅनेजर आहेत. तसेच रोहितच्या पाठिशी त्या ठामपणे उभ्या आहेत. भारताच्या प्रत्येक सामन्यात रोहितची खेळी चांगली असो अथवा वाईट रितिका या कायम रोहितला पाठिंबा द्यायला स्टेडियममध्ये उपस्थित असतात. रोहित आणि रितिका यांना एक गोड कन्या असून तिचे नाव समायरा असे आहे.

क्रिकेट कारकि‍र्दीचा श्री गणेशा

प्रशिक्षक दिनेश लाड यांच्या वर्गात क्रिकेटचे धडे घेतल्यानंतर 2006 साली रोहित शर्माच्या क्रिकेट कारकिर्दीचा श्री गणेशा झाला. 2006 साली रोहित शर्माची टीम इंडियाच्या 19 वर्षांखालील संघात निवड झाली. त्यानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे 2007 साली त्याला टीम इंडियाच्या वरिष्ठ संघातून मोठी संधी चालून आली. 2007 साली आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या ICC T-20 World Cup साठी रोहितची भारताच्या संघात निवड झाली. विशेष म्हणजे महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने हा विश्व चषक उंचावला आणि इतिहास रचला. या ऐतिहासिक कामगिरीचा भाग होण्याच भाग्य रोहित शर्माला आपल्या क्रिकेट कारकिर्दीच्या सुरुवातीलाच लाभले.

टी-20 वर्ल्ड कपमध्ये आपल्या खेळाने रोहित शर्माने सर्वांना प्रभावित केले होते. त्यामुळे 2007 मध्ये आयर्लंडविरुद्ध वनडे मालिकेसाठी त्याची भारतीय संघात निवड करण्यात आली. सुरुवातील अनुभव नसल्यामुळे रोहित शर्माचा खेळ अगदी सुमार राहिला. त्यामुळे बऱ्याच वेळा त्याला संघातून डावलण्यात सुद्धा आले. मात्र, त्याने हार मानली नाही आणि सराव सुरू ठेवला. सरावातील सातत्यामुळे 2013 साली टीम इंडियात सलामीवीर म्हणून त्याच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली. खऱ्या अर्थाने तेव्हापासून रोहित शर्माचा खेळ उंचावला आणि सलामीवीर म्हणून त्याने जबरदस्त कामगिरी करत गोलंदाजांना फोडून काढायला सुरुवात केली.

टी-20 आणि वनडेमध्ये रोहित शर्माने सलामीला येत भारताला बऱ्याच सामन्यांमध्ये दमदार सुरुवात करून दिली आहे. रोहित शर्माने आपल्या विस्फोटक फलंदाजीच्या जोरावर एकदिवसीय सामन्यांमध्ये आता पर्यंत तीन वेळा द्विशतक झळकावले आहे. त्याची सर्वोच्च धावसंख्या 264 ही आहे. क्रिकेट विश्वातील हा एक विक्रम असून रोहित शर्मा या विक्रमाचा बादशहा आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये सुद्धा रोहित शर्माचे आगमन 2013 साली झाले. सुरुवातीला रोहित शर्मावर मधल्या फळीची जबाबदारी होती. परंतु 2019 सालापासून त्याला कसोटी क्रिकेटमध्ये सुद्धा सलामीवीर म्हणून खेळण्याची संधी देण्यात आली. तेव्हापासून त्याने मागे वळून पाहिले नाही आणि कसोटी क्रिकेटमध्ये धावांचा डोंगर रचायला सुरुवात केली.

रोहित शर्माचे भाग्य म्हणजे त्याला सचिन तेंडूलकर, राहुल द्रविड, वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, महेंद्र सिंग धोनी, गौतम गंभीर सारख्या फलंदाजांचा सहवास लाभला. त्यामुळे त्याच्या फलंदाजीमध्ये धार येत गेली. हसरा, खोडकर बिंदास वृत्तीचा स्वभाव असल्यामुळे देशभरात करोडोंच्या संख्येने रोहितचा चाहता वर्ग आहे.

यशस्वी कर्णधार

रोहित शर्मा 2013 पासून ते 2023 पर्यंत मुंबई इंडियन्सचा कर्णधार होता. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईने एक दोन नाही, तर तब्बल 5 वेळा IPL च्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा विजेतेपद पटकावण्याचा बहूमान मुंबई इंडियन्सच्या नावावर आहे. मुंबईच्या या सर्वोच्च कामगिरीचे श्रेय जातं ते म्हणजे कर्णधार रोहित शर्माला. रोहित मुंबई कडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्यामुळे आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते.

आंतरराष्ट्रीय स्तरावर 2022 मध्ये भारताच्या वनडे आणि टी-20 कर्णधारपदाची माळ रोहितच्या गळ्यात पडली. रोहितच्या नेतृत्वात टीम इंडियाने दमदार कामगिरी केली. अनेक मालिका जिंकल्या, विक्रम रचले आणि 2024 मध्ये झालेला टी-20 वर्ल्ड कप सुद्धा उंचावला. त्यामुळेच रोहित शर्माकडे एक यशस्वी कर्णधार म्हणून पाहिले जाते.

रोहित शर्मा आणि विक्रम | Rohit Sharma record list

रोहित शर्मा त्याच्या विस्फोटक फलंदाजीमुळे ओळखला जातो. त्यामुळे कसोटी, वन डे आणि टी-20 मध्ये अनेक विक्रम त्याने आपल्या नावावर केले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये श्रीलंकेविरुद्ध 264 धावांची ऐतिहासिक खेळी त्याने केली होती. हा एक विश्वविक्रम असून तो आजपर्यंत कायम आहे. 2014 साली कोलकाताच्या इडन गार्डन मैदानात त्याने हा विक्रम केला होता.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक तीन वेळा द्विशतकं झळकावण्याचा विक्रम सुद्धा रोहित शर्माच्या नावावर आहे. रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2013 साली 209 धावा, श्रीलंकाविरुद्ध 2014 साली 264 धावा आणि पुन्हा श्रीलंकाविरुद्ध 2017 साली 208 धावा केल्या होत्या. तसेच वनडेमध्ये सर्वाधिक वेळा 150+ धावसंख्या करणारा तो फलंदाज आहे. त्याने 8 वेळा 150 हून अधिक धावसंख्या केली आहे.

रोहित शर्मा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4 शतकं करणारा पहिला फलंदाज आहे. तसेच सर्वात जलद शतक झळकवणारा भारतीय खेळाडूचा विक्रम सुद्धा त्याच्या नावावर आहे. त्याने 2017 साली श्रीलंकाविरुद्ध 35 चेंडूमध्ये शतक झळकावले होते.

कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून सलग 2 शतकं झळकवण्याचा विक्रम रोहितच्या नावावर आहे. 2019 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने हा पराक्रम केला होता. याबरोबर कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून सर्वाधिक वेळा षटकार मारण्याचा विक्रम सुद्धा रोहितच्या नावावर आहे.

विश्वचषकाचा विचार केला तर, रोहित एकाच विश्वचषकात सर्वाधिक 5 वेळा शतक झळकवणारा पहिला फलंदाज आहे. 2019 च्या विश्वचषकात त्याने 5 शतकं झळकवून गोलंदाजांचे कंबरडे मोडले होते.

आयपीएलमध्ये सर्वाधिक 5 वेळा विजेतेपद पटकावणारा कर्णधार म्हणून रोहितच्या नावावर विक्रम आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 साली विजेतेपद पटकावले आहे. रोहितच्या नावावर आयपीएलमध्ये 200 हून अधिक षटकार असून तो सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंपैकी एक खेळाडू आहे.

क्रिकेटच्या तीन्ही फॉरमॅटमध्ये रोहित शर्माने आपल्या नावाचा डंका वाजवला आहे. त्यामुळेच क्रिकेटच्या तिन्ही वनडे, टी-20 आणि कसोटी फॉरमॅटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा तो एकमेव खेळाडू आहे. त्यामुळेच रोहित शर्माची हिटमॅन ही एक ओळख निर्माण झाली आहे.

षटकार ‘किंग’चा पुरस्काराने सन्मान 

रोहित शर्माने आपली क्रिकेट कारकिर्द गाजवली. त्यामुळे देशाचं आणि महाराष्ट्राचं नाव जगभरात उंचावल. त्याच्या या कार्याचा गौरव म्हणून रोहित शर्माला भारतातील सर्वोच्च ‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार’ देऊन 2020 साली सन्मानित करण्यात आले. तत्पुर्वी, रोहितला 2015 साली खेळातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल अर्जुन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारांसोबतचं रोहितला 2019 साली ICC चा सर्वोत्कृष्ट वनडे खेळाडू म्हणून गौरव करण्यात आला आहे. तसेच अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांवर रोहितने आपल्या नावाची मोहर उमटवली आहे.

रोहित ज्या पद्धतीने क्रिकेटचे मैदान गाजवत आहे. त्याच पद्धतीने समाज कार्यात सुद्धा त्याने आपला ठसा उमटवला आहे. विविध सामाजिक उपक्रमांमध्ये तो सहभागी होत असतो. विशेष करून वन्यजीव आणि पर्यावरण संरक्षणासाठी त्याने विशेष उपाय योजना केल्या आहेत.


Discover more from मराठी चौक विशेष

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a comment