Sant Dnyaneshwar Maharaj Reda Samadhi Mandir – चला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या रेडा समाधीचे दर्शन घेऊया…

> गणेश सुरेखा मारूती वाडकर 

येऊनिया उतरिले आळेचिये बनी।
पशु तये स्थानी शांत जाहला।।

असे संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी आळे येथील श्री रेडा संजीवन समाधीचे (Sant Dnyaneshwar Maharaj Reda Samadhi Mandir) वर्णन आपल्या अभंगामध्ये केलं आहे.

जुन्नर तालुक्यातील आळे गावात आपल्याला या श्री रेडा समाधीचे दर्शन घेता येते. ही श्री रेडा समाधी अशी एकमेव समाधी आहे, ज्या समाधीला श्री संत ज्ञानोबाराय, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव आणि संत मुक्ताबाई या चारही भावंडांचा हात लागला आहे.

ह. भ. प. उमेश महाराज अनारसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताबाई ही चारही भावंडे पैठणला आली होती. या ठिकाणी एका धर्ममार्तंडाने ज्ञानोबारायांना प्रश्न केला की, हा समोरून चाललेला रेडा त्याचे नाव देखील ज्ञाना आहे. तो देखील तुमच्यासारखी वेदवाक्ये बोलू शकतो का? तेव्हा ज्ञानोबारायांनी रेड्याच्या मस्तकी हात ठेवला आणि रेडा ऋग्वेदातील ऋचा म्हणून लागला. या प्रसंगांनंतर ज्ञानोंबासह चारही भावंडांना प्रचंड लोकप्रियता मिळाली.

फोटो सौजन्य – अमिता मोरे

ज्ञाना या रेड्याने ऋग्वेदातील ऋचा म्हणल्यानंतर रेड्याचा मालक वाकोबा आपल्या रेड्यासह ज्ञानोबांसोबत पुढील प्रवासाला निघाला. अनेक मैल अंतर पार करत नेवासामार्गे चारही भावंडे आणि रेडा पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील अकलापूर या गावी आले. अकलापूर गावातील संतवाडी येथील चौऱ्याच्या डोंगरवार त्यांनी वस्ती केली. विशेष म्हणजे या परिसराचं आळे असं नामकरण खुद्द ज्ञानोबारायांनी केले आहे. अलंकापूरी म्हणून ओळखली जाणारी ही भूमी आता ज्ञानोबारायांच्या आळे या नावाने ओळखली जाते. 

या ठिकाणी शके 1212 (इसवी सन 1290) माघ वद्य 13 (त्रयोदिसी) या दिवशी ज्ञानोबाराय, सोपानदेव, निवृत्तीनाथ आणि मुक्ताबाई यांनी स्वत:च्या हाताने वेदमंत्र म्हणणाऱ्या रेड्याला समाधी दिली. या पवित्र परिसरामध्ये माऊली स्वतः अदृश्य स्वरूपात वास करत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.

फोटो सौजन्य – अमिता मोरे

त्यामुळे दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी रेड्याच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. या ठिकाणी दरवर्षी चैत्र वद्य एकादशी द्वादशी आणि त्रयोदशीला मोठी यात्रा भरते. मंदिरात प्रवेश करताना हणुमंतरायाची मुर्ती लक्ष वेधून घेते. 

आळेफाटा बसस्थानकापासून 10 ते 15 मिनिटांच्या अंतरावर संत ज्ञानेश्वर महाराज रेडा समाधी मंदिर आहे. आम्ही दिनांक 22 नोव्हेंबर 2025 रोजी रेडा समाधीचे दर्शन घेतले. सध्या मंदिराच्या जिर्णोद्दराचे काम सुरू आहे. मंदिराचा परिसर बराच मोठा आहे. तसेच मंंदिर परिसरामध्ये लग्न सोहळे सुद्धा पार पडतात. त्यामुळे जुन्नर किंवा आळेफाटा परिसरामध्ये तुम्ही कधी गेलात तर, या आळेफाटा बस स्थानकापासून 4 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या रेडा समाधी मंदीराला आवर्जून भेट द्या.

रेडा समाधी मंदिर लोकेशन – संत ज्ञानेश्वर महाराज रेडा समाधी मंदिर

error: Content is protected !!